'पौलोमी देवी' साकारण्यासाठी सारा खान सज्ज, संतोषी मॉं मालिकेत घेणार दमदार एन्ट्री

'पौलोमी देवी' साकारण्यासाठी सारा खान सज्ज, संतोषी मॉं मालिकेत घेणार दमदार एन्ट्री

टेलिव्हिजनवर जशा सासू-सुनांच्या अथवा कौटुंबिक मालिका लोकप्रिय ठरतात तशा पौराणिक मालिकांनी चांगला प्रतिसाद मिळत असतो. लॉकडाऊनच्या काळात तर नव्वदीच्या दशकातील रामायण आणि महाभारत या मालिकांना सर्वात जास्त मागणी होती. यासाठीच आता पौराणिक मालिकांमध्ये काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक आहेत. अभिनेत्री सारा खान देखील लवकरच एका पौराणिक मालिकेतून दमदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. जाणून घेऊ या मालिका आणि सारा खानच्या भूमिकेबाबत...

'संतोषी मॉं सुनाए व्रत कथाए'मध्ये सारा खानची दमदार एन्ट्री

श्रावण आणि व्रतवैकल्याचे दिवस सध्या सुरू आहेत. अशा पवित्र काळात घरोघरी पौराणिक मालिका आवर्जून बघितल्या जातात. पौराणिक मालिकांचा एक खास चाहता वर्ग असतो. 'भक्‍त व भगवान' यांच्‍यामधील निर्मळ नाते दाखवणारी एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं' नवीन एपिसोड्ससह पुन्हा सुरू झाली आहे. ही मालिका छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्‍ये प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खान नकारात्‍मक भूमिकेत भव्‍य प्रवेश करणार आहे. ती मालिकेमधील सर्वात मोठी शत्रू पौलोमी देवीची भूमिका साकारणार आहे, जी संतोषी माँ (ग्रेसी सिंग) आणि तिची निस्‍सीम भक्‍त स्‍वाती (तन्‍वी डोगरा) यांच्‍या जीवनांमध्‍ये अनेक अडथळे निर्माण करत असते.

सारा खानला आवडतात गुढ भूमिका

'संतोषी मॉं सुनाए व्रत कथाए'मध्ये पौलमी साकारण्याबाबत सारा खानने शेअर केलं की,''मी नेहमीच गुढ भूमिका साकारण्‍यास उत्‍सुक असते. दैवी भूमिका पडद्यावर आणणा-या शोभा व पवित्राने मला नेहमीच आकर्षून घेतले आहे. प्रेक्षकांना मालिकेमधील पौलोमी भूमिकेबाबत माहीत आहेच. पण माझ्या एन्ट्रीतून येत्या नवीन एपिसोड्समध्‍ये कशाप्रकारे यापूर्वी न दिसलेला ड्रामा घडणार आहे हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रोमांचक असणार आहे. माझी भूमिका पौलोमी स्‍वाती व तिच्‍या पतीला हानी पोहोचवण्‍यासाठी जीवनास धोकादायक अशी कृत्‍ये करणारी आहे आणि संतोषी माँच्‍या सर्व शक्‍ती काढून घेण्‍यासाठी कटकारस्‍थान देखील या भूमिकेत रचले जाणार आहे. तेव्हा कोणतीच शक्‍ती नसलेल्‍या संतोषी माँवर मोठा दबाव येणार आहे. स्‍वातीला संकटामधून बाहेर काढण्‍यामध्‍ये मदत करणं माँला जवळजवळ अशक्‍य होणार आहे. मी माझ्या भूमिकेसाठी उत्‍सुक असून एण्‍ड टीव्‍ही आणि 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'च्‍या कलाकारांसोबत असलेला हा अद्भुत प्रवास आता सुरू झाला आहे. नवीन नियमांशी जुळवून घेण्‍याबाबत विचारले असता सारा म्‍हणाली, ''नवीन नियम लागू होत असताना मला वाटतं की, आपण सर्वांनी या नवीन नियमांशी जुळवून घेतले पाहिजे. आम्‍ही सर्वांनी शूटिंगसाठी आखण्‍यात आलेल्‍या या नवीन नियमांशी जुळवून घेतलंच पाहिजे. हे आपल्‍या आणि आपल्‍या सभोवती असलेल्‍या इतरांच्‍या सुरक्षिततेसाठी आहे. प्रॉडक्‍शन हाऊस प्रत्‍येकाच्‍या सुरक्षिततेसाठी अधिक खबरदारी व सॅनिटायझेशन उपाय घेत आहे. मी देखील आवश्‍यक खबरदारी घेण्‍यासाठी सोबत माझे सेफ्टी व मेकअप किट ठेवते.''