शाहरूख खानने का दिला या मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना नकार

शाहरूख खानने का दिला या मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना नकार

शाहरूख खान गेली दोन वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर आहे असंच म्हणावं लागेल. कारण 2018 मध्ये आनंद एल राय यांच्या झिरो या चित्रपटाच्या अपयशानंतर तो कोणत्याच चित्रपटात पुन्हा दिसला नाही. गेली काही वर्ष त्याच्या वाट्याला एका पाठोपाठ अपयश येत आहे. ज्यामुळे तो आता चित्रपटाच्या निवडीबाबत फारच जागरूक झाला आहे. त्याला आता एखाद्या अशा हिट चित्रपटाची गरज आहे जो त्याला पुन्हा यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. यासाठीच त्याने चित्रपटात पुन्हा काम करण्यासाठी बराच वेळ घेतला आहे. मात्र शाहरूखचे फॅन फॉलोव्हर्स भरपूर आहेत. ज्यामुळे शाहरूखला त्याचे चाहते लवकर चित्रपटांमधून पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. 

शाहरूखचे स्टारडम अजूनही कायम

शाहरूखसोबत काम करण्यासाठी मोठमोठे दिग्दर्शक आजही तयार आहेत. त्याला गेल्या काही महिन्यांपासून 50 चित्रपट ऑफर झाले आहेत. मात्र शाहरूखने त्यातील 20 चित्रपटांमध्ये रस दाखवला आणि त्यातूनही फक्त चारच चित्रपटांची निवड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूखने आतापर्यंत संजय लीला भन्साली, अली अब्बास जफर, मधुर भंडारकर, सलमान खान यांच्या चित्रपटांना नकार दिलेला आहे. यावरून शाहरूखचे कितीही चित्रपट फ्लॉप झाले तरी त्याचा स्टारडम कमी झालेला नाही हेच दिसून येत आहे.  मोठमोठ्या दिग्दर्शकांना आजही शाहरूखसोबत काम करण्याची नक्कीच इच्छा आहे. मात्र शाहरूखला आता त्याच्या करिअरमध्ये कोणतीही रिस्क घ्यायची नाही. कारण त्याचा आणखी एक फ्लॉप चित्रपट त्याच्या करिअरमध्ये बाधा घालू शकतो. ज्यामुळे त्याला आता फक्त हिट ठरेल अशाच चित्रपटामध्ये काम करण्याची गरज आहे.

Instagram

शाहरूखने या कारणांसाठी नाकारले हे चित्रपट

झिरो चित्रपटानंतर शाहरूख अंतरिश यात्रीच्या बायोपिक 'सॅल्युट'मध्ये झळकणार होता. मात्र शूटिंग सुरू होताच शाहरूखने त्यातून काढता पाय घेतला. त्यानंतर त्याच्याकडे मधुर भंडारकर याचा 'इनस्पेक्टर गालिब' हा देसी अॅक्शन चित्रपट आला. शाहरूखला या चित्रपटाची कॉन्सेप्ट आणि त्याची भूमिका आवडली होती मात्र या चित्रपटातून त्याला यश मिळेल असं वाटलं नाही म्हणून त्याने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर त्याने संजय लीला भन्सालीचा प्रोजेक्ट नाकारला. साहिर लुधयानवीची बायोपिक संजयला शाहरूखसोबत करायची होती. मात्र शाहरूखला ही भूमिका फारच गंभीर वाटू लागली आणि त्याला अशी भूमिका आता करण्यात काहीच रस नाही. शाहरूखच्या करिअचा ग्राफ पाहता त्याचा जवळचा मित्र आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननेही त्याला एक चित्रपट ऑफर केला होता. मात्र सलमान खान प्रॉडक्शनच्या 'गन्स ऑफ नॉर्थ'लाही शाहरूखने नम्रपणे नाही सांगितलं याचं कारण यात शाहरूख मुख्य भूमिकेत नव्हता. अली अब्बास जफरच्या 'मिस्टर इंडिया'लाही किंग खानने नाकारलं. कारण यात त्याला  नकारात्मक भूमिका ऑफर करण्यात आली होती. शाहरूखला आता नकारात्मक भूमिका करून चाहत्यांचा रोष ओढावून घ्यायचा नाही त्यामुळे त्याने या चित्रपटालाही नकार दिला. असं  करत करत त्याने आतापर्यंत वीस चित्रपट नाकारले आहेत. कबीर खान, आदित्य चोप्रा, करण जोहर यांनाही शाहरूखसोबत काम करायचं आहे मात्र शाहरूखने अजून त्यांना त्याचा होकार अथवा नकार कळवलेला नाही. 

शाहरूखने या चार चित्रपटांची केली निवड

मोठमोठ्या दिग्दर्शकांना आणि चांगल्या भूमिकांना नकार दिल्यावर शाहरूखने काही चित्रपट निवडले आहेत. ज्यामध्ये राजकुमार हिरानीचा सोशल कॉमेडी ड्रामा, सिद्धार्थ आनंदचा अॅक्शन ड्रामा पठाण, राज अॅंड डिके याचा क्वर्की कॉमेडी ड्रामा आणि एटली कुमार याच्या कमर्शिअल अॅक्शन चित्रपटांचा समावेश आहे. शाहरूखने वीसपैकी हे चार चित्रपट का निवडले हे येणारा काळच सांगू शकेल. कारण काही असलं तरी चाहत्यांना पुन्हा एकदा शाहरूखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे.