#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत

#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत

बिग बॉसच्या घरात एका आठवड्यापूर्वी परतलेली शिवानी सुर्वे पुन्हा एकदा घरातल्या सदस्यांवर चीडचीड करताना दिसू लागली आहे. ज्या कारणामुळे तिला घराच्या बाहेर जावं लागलं होतं. तसंच पुन्हा एकदा तिच्या स्वभावातून दिसायला लागलं आहे.

एकला चालो रे टास्कमध्ये नेहा आणि शिवानीचा वाद

बिग बॉसच्या घरात काल नॉमिनेशनसाठी एकला चालो रे हे टास्क सदस्यांना दिलं होतं. ज्यामध्ये शिवानीला या टास्कची संचालिका नेमलं होतं. या टास्कदरम्यान सदस्यांना हातात पाण्याचा बाऊल घेऊन घरामध्ये तयार करण्यात आलेल्या वर्तुळात पाणी न सांडता चालायचं होतं. या टास्कमध्ये एकीकडे हिना आणि वीणा या पहिल्याच फेरीत बाद झाल्या तर अभिजीत, रूपाली आणि शिव शेवटपर्यंत टिकण्यात यशस्वी झाले. घरातील बाकी सगळे सदस्य नॉमिनेट झाले. या सगळ्या टास्कमध्ये शिवानी पहिल्यापासूनच सदस्यांवर आरडाओरडा करत होती. काही वेळानंतर टास्कमधील एका नियमावरून नेहाला बोलू लागली. संचालिकेचं न ऐकल्यास ती नेहाला नॉमिनेट करू शकते. पण नेहा नियमाबाबत ठाम राहिली. तिचा आणि शिवानीचा वाद वाढत असताना बिग बॉसने मधस्थी करत नियम पुन्हा एकदा समजावून सांगितले. तेव्हा कुठे शिवानी शांत झाली. त्यामुळे पुन्हा एकदा शिवानीच्या रागाचा पारा चढू लागलाय. या टास्कआधी शिवानीने हिनाशीही गिझर आणि पाण्याच्या वापरावरून वाद घातला.  

आरोहची खुमासदार कॉमेंट्री

याच टास्कमध्ये एकीकडे शिवानी आणि नेहाचा वाद सुरू होता. तर दुसरीकडे लक्ष वेधलं ते आरोहच्या खुमासदार आणि विनोदी कॉमेंट्रीने. चांगली गोष्ट म्हणजे आरोहने शिवानीचा वाढता पारा तिला कमी करण्यास सांगितलं. तसंच ती चांगली खेळत असल्याचंही तो बोलला. त्यामुळे आरोहसुद्धा घरात हळूहळू त्याची जागा बनवत असल्याचं चित्र दिसतंय.

पुन्हा एकदा त्याच मार्गावर शिवानी?

शिवानी सध्या बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनली आहे. शिवानीचा घरात प्रवेश होताना बिग बॉसने तिला ‘पाहुणी’ म्हणून घरात पाठवले होते. पण शिवानी सुर्वेने केलेली उत्तम कामगिरी पाहता बिग बॉसने शिवानीला घराचे सदस्यत्व बहालकेले. या संधीचं सोनं करत ‘शेरनी’ शिवानी सुर्वेने कॅप्टनपद पटकावलं. शिवानीला पुन्हा एकदा सदस्यत्व बहाल करताना बिग बॉस म्हणाले होते की, “गेल्या आठवड्याभरात तिचा घरच्या कार्यात दिसलेला सकारात्मक वावर, उत्साहपूर्ण सहभाग आणि कार्यातील कामगिरी या बाबी लक्षात घेता बिग बॉसच्या घरातल्या सदस्यत्वाचा दर्जा शिवानीला दिला जात आहे.” पण आता बिग बॉसकडून वाहवा मिळवल्यानंतर शिवानी असं का वागतेय, असा प्रश्न प्रेक्षकांच्या आणि तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण होणं साहजिक आहे.

सूत्रांनुसार, बिग बॉसमध्ये पहिलं पाऊल ठेवतानाच शिवानीने ती एक स्ट्राँग कंटेस्टंट असल्याचेच सर्वांना दाखवून दिलं होतं. तब्येतीच्या कारणास्तव तिला 21 दिवसांमध्येच घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडावे लागले होतं. पण परत आल्यावर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट होऊन 28 दिवसांनी परतलेल्या शिवानीने पहिल्या दहाच दिवसांत पून्हा एकदा चांगल्या परफॉर्मन्सने बिग बॉसची वाहवा मिळवली. सध्या शिवानीवर तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय पण एकीकडे तिच्याबद्दल टिकेचा सूरही दिसून येत आहे. आता शिवानी तिच्या स्वभावातील बदल कायम ठेवणार की पुन्हा रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.