दिवाळी शॉपिंग, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्याचा सुंदर मेळ असणारी ग्राहक पेठ

दिवाळी शॉपिंग, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्याचा सुंदर मेळ असणारी ग्राहक पेठ

दिवाळीच्या निमित्ताने तुमचीही फराळाची तयारी, घरातली साफसफाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शॉपिंगची लगबग सुरू झाली असेलच. या सर्व गोष्टी एकट्या गृहिणीने करायच्या म्हणजे जणू संकटच. पण तुमच्या दिवाळीच्या कामाच्या यादीतील काही कामंही कमी होतील आणि तुमचंही शॉपिंगही होईल, अशा ठिकाणी तुम्हाला भेट द्यायला आवडेल का? नक्कीच ना. मग तुमच्यासाठी गोरेगाव महिला मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आणली आहे दिवाळीनिमित्त भव्य ग्राहक पेठ. पण ही फक्त ग्राहक पेठ नसून यामध्ये सामाजिक उपक्रमांचाही सहभाग असतो. जाणून घ्या काय काय आहे या ग्राहक पेठेत.

महिला मंडळ आयोजित ग्राहक पेठेचं वेगळेपण 

  • शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन्स 
  • तु्म्हीही करू शकता सामाजिक योगदान
  • या स्टॉलला नक्की भेट द्या

शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन्स

गोरेगाव पूर्वेतील जिमखान्याजवळच्या मातृमंदिरमध्ये दरवर्षी ही ग्राहक पेठ भरते. या ग्राहक पेठेत तुम्हाला दिवाळीचा फराळ, दिवाळीला देण्याच्या भेटवस्तू, पूजेचं साहित्य, विविध प्रकारची ज्वेलरी, सणावारासाठी साड्या आणि कुर्तीज, गृहपयोगी वस्तू, केक्स आणि अगदी तोंडावर आलेल्या थंडीला दूर ठेवण्यासाठी चादरी, शॉल आणि इतर हँडलूम उत्पादनंही घेता येतील. तसंच इथे अनेक स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेली उत्पादनं असणारे स्टॉल्सही असतात. त्यामुळे तुम्हाला शॉपिंगसोबतच समाजकार्यालाही हातभार लावता येईल.

ग्राहक पेठेचं वैशिष्ट्यं

बरेचदा आपण ग्राहक पेठेला भेट देतो. पण या ग्राहक पेठेचं वैशिष्ट्य म्हणजे हे त्यांचं 27 वं वर्ष आहे. त्यामुळे खरेदी करताना तुम्हाला चांगल्या वस्तूच मिळतील, याची खात्री बाळगा. मुख्य म्हणजे या ग्राहक पेठेत मुख्यतः महिला उद्योजिकांना प्राधान्य दिलं जातं. तसंच या ग्राहक पेठेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक समाजोपयोगी उपक्रम आणि देणग्या दिल्या जातात.

ग्राहक पेठेचं सामाजिक योगदान

समाजाचा पैसा समाजाला देणे या कल्पनेतून महिला मंडळातर्फे ग्राहक पेठेदरम्यान अनेक सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यासाठी देणगीही दिली जाते. यंदाही मंडळातर्फे भारतीय सैन्याला, अनेक रूग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या राजहंस प्रतिष्ठानला आणि कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी काम करणाऱ्या दुहीता फाऊंडेशनला देणगी देण्यात आली. त्यामुळे इथे भेट देऊन आणि खरेदी करून तुम्हीही या समाजकार्याचा भाग होऊ शकता.

या स्टॉलला नक्की भेट द्या

यंदा मंडळातर्फे बोरिवलीतील अस्मिता या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेला मोफत स्टॉल देण्यात आला आहे. या संस्थेत अंध आणि दिव्यांग मुलांना रोजगार देऊन आणि त्यांचं भविष्य घडवण्याचं काम केलं जातं. या संस्थेतील मुलांनी बनवलेल्या अनेक वस्तू इथे विकण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तेही अगदीच माफक दरात.

गोरेगाव महिला मंडळ आयोजित ग्राहक पेठेचा सुवर्ण इतिहास

मंडळाच्या अध्यक्ष असलेल्या विद्या परूळेकर यांनी सांगितले की, या ग्राहक पेठेची सुरूवात ही आता सल्लागार असलेल्या मालती गुप्ते यांनी केली होती. या मागील मुख्य उद्देश म्हणजे महिलांना रोजगार मिळवून देणे आणि त्यांची उत्पादनं लोकांपर्यंत पोचवणे. दोन वर्षापूर्वी या ग्राहक पेठेचं 25 वं वर्ष मोठ्या थाटामाटात साजरा केलं होतं. मुख्य म्हणजे ग्राहक पेठेत विविध उत्पादनं असलेल्या स्टॉल्स ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं. या ग्राहक पेठेची ख्याती म्हणजे गोरेगावकर या पेठेची वर्षभर वाट पाहतात आणि आवर्जून इथेच खरेदी करतात.  

या ग्राहक पेठेची मुहूर्तमेढ ठेवणाऱ्या मालतीताई गुप्ते यांची प्रतिक्रिया : सामाजिक कार्यकर्त्या मृणालताईंनी दिलेल्या प्रोत्साहनाने या ग्राहक पेठेला सुरूवात झाली. या ग्राहक पेठेचा हेतू म्हणजे महिला सक्षमीकरण हा होता. पहिल्या ग्राहक पेठेत केवळ 12 स्टॉल मांडण्यात आली. अगदी रस्त्यावर उभे राहून याची पत्रकं वाटून प्रसिद्धी करण्यात आली. तेव्हापासून या पेठेत एक ते दोन स्टॉल सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाना मोफत दिले जातात. आजही ही परंपरा कायम आहे. 

मग तुम्हीही या गोरेगावातील वैविध्यपूर्ण ग्राहक पेठेला नक्की भेट द्या.