पैठणी साडी आणि मोत्याची नथ पाहिला का कंगनाचा महाराष्ट्रीयन लुक

पैठणी साडी आणि मोत्याची नथ पाहिला का कंगनाचा महाराष्ट्रीयन लुक

पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान आहे. म्हणूनच महाराष्ट्रीयन लुक करताना पैठणी साडी आणि मोत्याच्या नथीला पहिला मान मिळतो. सर्वसामान्याप्रमाणेच या साडीची भूरळ सेलिब्रेटीजनांही पडत असते. महाराष्ट्रातील खास कार्यक्रमात अभिनेत्री पैठणी साडीचा पेहराव करणं पसंत करतात. मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्यांवरून झालेला वाद संपुष्टात आणण्यासाठी मंगळवारी अभिनेत्री कंगणा रणौतही मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेली होती. यावेळी कंगणाने खास महाराष्ट्रीयन वेषभूषाही केली होती. हिरव्या कंच रंगाची पैठणी, नाकात मोत्याची नथ आणि केसात माळलेला गजरा पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या होत्या. 

कंगणाने का निवडला महाराष्ट्रीयन लुक -

गेल्या काही महिन्यांपासून कंगणा रणौत आणि तिने केलेल्या मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. ज्यामुळे राजकीय वादविवादांना कंगणाला सामोरं जावं लागलं होतं. कंगणा राणावत आणि वादविवाद यांचं जणू साटंलोटंच आहे. एकातून बाहेर पडत नाही तोवर कंगणाचा दुसरा वाद तयारच असतो. शिवाय अशा चर्चांना उधाण आणण्यासाठी ती नेहमीच तत्पर असते. म्हणूनच की काय ती वादविवादात कोणालाही सोडत नाही किंबहुना एखादा वाद चांगलाच चिघळेल याची पुरेपुर काळजी घेते. आता तिने याच वादाला चिघळवण्यासाठी किंवा त्याला संपवण्यासाठी नक्कीच कशासाठी ते कंगणाच जाणो… मात्र या वादाला खतपाणी घालण्यासाठी हा खास महाराष्ट्रीयन लुक केला होता. शिवाय बाप्पाच्या दर्शनानंतर या वादाच्या आगीत तेल ओतत “मुंबईत राहण्यासाठी फक्त गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे” असा टोलाही लगावला. सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर कंगणाने एक खास ट्विटही केलं ज्यात तिने मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर सुरक्षित वाटत आहे असं शेअर केलं आहे. कंगनाचा हा वाद आता किती दिवस धगधगता राहील हे माहीत नाही. मात्र तिने यासाठी निवडलेला लुक मात्र तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडला आहे. 

Instagram

महाराष्ट्रीयन लुकची खास बात

कंगणाने यासाठी खास महाराष्ट्रातील पैठण, येवला या ठिकाणी हातमागावर विणून तयार करण्यात येणारी पैठणी साडी निवडली. कंगणाने नेसलेली पैठणी हिरव्या कंच रंगाची होती. ज्यावर लाल आणि गोल्डन रंगाचा पारंपरिक जरतारीचा काठ आणि नाचणारे मोर असलेला पदर होता. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावर तिने खास बाप्पाचे पिवळ्या रंगाचे उपरणे खांद्यावर घेतले होते. ज्यामुळे तिची हिरवी कंच पैठणी बाप्पाच्या आर्शीवादाने न्हावून निघाली होती. कंगणाने गळ्यात सोन्याची ठुशी घातली होती. महाराष्ट्रातील खास पारंपरिक दागिन्यांपैकी हा दागिना आहे. महाराष्ट्रीयन लुकला पूर्ण करण्यासाठी तिने नाकात मोत्याची नथ घातली होती. खरंतर आजकाल बाजारात नथीचे अनेक प्रकार मिळतात. मात्र मोत्याच्या नथीची गोष्टच निराळी आहे. हिरव्या रंगाच्या साडीवर मोती रंगाच्या या नथीचा जणू साजच चढवला आहे असं यामुळे वाटत होतं. तिचा हा ट्रेडिशनल लुक तिने माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्यामुळे अधिकच खुलून आला होता. कानातील कुडी आणि संपूर्ण लुक पाहून सर्वांच्याच नजरा कंगणावर खिळून राहिल्या होत्या. विशेष म्हणजे कंगनाने या लुकसाठी मुळीच मेकअप केला नव्हता. कपाळावर लाल रंगाची टिकली आणि मंदीरात पूजेनंतर थोडंसं कुंकू लावलं होतं. ज्यामुळे या सर्व पेहरावात ती एक सुंदर महाराष्ट्रीयन मुलगी आहे असं भासत होतं. तुम्हालाही असा खास महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल तर कंगनाच्या या लुकला तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. 

Instagram