सुनिल शेट्टीचा नवा उपक्रम, गरजू लोकांसाठी करणार योग्य औषधांचा पुरवठा

सुनिल शेट्टीचा नवा उपक्रम, गरजू लोकांसाठी करणार योग्य औषधांचा पुरवठा

कोरोना महामारीच्या  काळात समाजातील अनेक स्तरांमधून मदतीचा हात पुढे आलेला आहे. बॉलीवूड कलाकारही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या परिने सहकार्य करत आहे. अनेक कलाकारांनी यासाठी मोफत भोजन आणि देणगी स्वरूपात मदत केली आहे. बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीने या काळात एक नवा उपक्रम सुरु केला आहे. त्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली आहे. या माध्यमातून सुनिल शेट्टी गरजू लोकांपर्यंत योग्य औषधांचा पुरवठा करणार आहे. एवढंच नाही तर या उपक्रमांचा फायदा योग्य व्यक्तीला व्हावा यासाठी सुनिलने सोशल मीडियावर चाहत्यांना पुढे येण्याचं आवाहनही केलं आहे. 

काय आहे सुनिल शेट्टीचा नवा उपक्रम

सुनिल शेट्टीने सोशल मीडियावर या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे नाव सुनिल शेट्टीच्या मते दवा भी दुवा भी असं असेल. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं आहे की, "मी आणि बीडीआर फार्मास्यूटिकल्स, एफटीसी टॅलेंट मिळून हा दवा भी दुवा भी हा उपक्रम सुरू करत आहोत. कारण आज लोकांना जितकी प्रार्थनेची गरज आहे तितकीच योग्य औषधांची गरज देखील आहे. समाजात बदल घडवून आणण्याची एक मोठी ताकद असते. त्यामुळे या उपक्रमाचा एक भाग होताना मला खूप आनंद होत आहे. या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत योग्य औषधांचा पुरवठा करणं शक्य होणार आहे"  सुनिल शेट्टीच्या मते सध्या कोरोनाचा कठीण काळ सुरु आहे ज्या काळात लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबातील लोकांनना औषधांची गरज असेल आणि ती खरेदी करण्यात तुम्हाला अडचण येत असेल तर चिंता करू नका. यासाठी तुम्ही सुनिल शेट्टी, बीडीआर फार्मास्यूटिकल्सशी संपर्क साधा तुमच्यापर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण हा काळ एकमेकांना मदत करण्याचा आहे, एकमेकांचा हात हातात पकडत पुढे जाण्याचा आहे. 

यापूर्वीदेखील केली होती सुनिल शेट्टीने मदत

कोरोनाच्या काळात सुनिल शेट्टीच्या दिलदारपणाची झलक अनेक वेळा पाहायला मिळाली. तो एक उत्तम अभिनेता आहेच पण तो एक चांगला नागरिक आणि माणूसही आहे. यापूर्वी त्याने लोकांना मोफत ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स पुरवण्याची मोहीम हाती घेतली होती. या उपक्रमाबाबतही त्याने सोशल मीडियावरून लोकांना आवाहन आणि मदतीचा हात पुढे केला होता. त्याने तेव्हा सर्व मित्र आणि चाहत्यांना आवाहन केलं होतं की जर तुमच्या ओळखीत कोणालाही मदतीची गरज असेल तर तुम्ही या मिशनसोबत जोडले जाऊ शकता. ज्यामुळे त्या व्यक्तीला थेट मदत करणं सोपं होईल. यासाठी त्याने सोशल मीडियावर शेअर केलेले मेजेस जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते. आताही सुनिल शेट्टीने लोकांना या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना औषधांची व्यवस्था पुरवली जाईल आणि परिस्थिती आटोक्यात आणणं सोपं जाईल. शिवाय या आधीही इतर कलाकारांसोबत मिळून त्याने लोकांना मोफत अन्नवाटपच्या मोहिमेतही सहभाग घेतलेला होता.