प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून नवीन विषय, नवीन जोडी पाहायला मिळाल्यावर ‘आपलं मनोरंजन नक्की होणार याची खात्री पटते. हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अर्बन रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेला मराठी सिनेमा ‘ती अँड ती’ लवकरच येतोय.मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमात प्रेक्षकांना नवीन विषयासह कलाकारांची युनिक निवड, सोबतीला मजेशीर डायलॉग्स, सुंदर गाणी आणि लंडनमध्ये पूर्ण सिनेमा शूट झाल्यामुळे तेथील सुंदर लोकेशन्स पाहायला मिळणार आहेत.
धम्माल कल्पना असलेला ‘ती अँड ती’
ही कहाणी आहे ‘अनय‘ची जो एक स्वप्नाळू मुलगा आहे. चौथीत असताना शाळेतल्या एका मुलीवर त्याचा जीव जडतो आणि ‘ती’ शाळा सोडून गेल्यावरही तो ‘तिला’ कधीच विसरू शकत नाही. तिच्यासोबत रोमान्सची त्याची कल्पना मनातच राहते. पण एके दिवशी जणू देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याची ‘ती’ त्याला भेटते… पण प्रॉब्लेम एवढाच असतो की, तेव्हा तो त्याच्या बायकोबरोबर हनिमूनसाठी गेलेला असतो.
इंग्लंडच्या निसर्ग सुंदर लोकेशन्सवर चित्रित झालेल्या ‘ती आणि ती’ च्या कथानकात जेवढी गंमत आहे हे आपल्याला या ‘रॉम-कॉम’ मध्ये बघायला मिळणार आहे.
पुष्कर जोगकडे दुहेरी जवाबदारी
निर्माता आणि प्रमुख भूमिका अशा दोन्ही जबाबदाऱ्या अभिनेत्रा पुष्कर जोग या चित्रपटाच्या निमित्ताने यशस्वीरित्या सांभाळत आहे. चित्रपटातल्या “ती” आणि “ती” च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांनी सुरेख रंग भरले आहेत. तर चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर ही एका विशेष भूमिकेत आपल्याला या चित्रपटात भेटणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मुंबईतील पत्रकारांसोबत मनमोकळा संवाद साधण्यासाठी ‘ती अँड ती’ च्या टीमने नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, कलाकार पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, सिध्दार्थ चांदेकर, निर्माते वैशाल शाह, मोहन नादर, लेखक विराजस कुलकर्णी उपस्थित होते. तसेच संगीतकार साई-पियुष, गायक अवधूत गुप्ते आणि गायिका महालक्ष्मी अय्यर यांची देखील उपस्थिती होती.
दिग्दर्शिकेच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी
प्रत्येक चित्रपटात नेहमीच काहीतरी नवीन करणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी आपल्या कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवणार आहेत. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे इंग्लंडमध्ये झालेलं आहे आणि गंमत म्हणजे या चित्रपटाची कथा, पटकथा विराजस कुलकर्णी यांनी लिहीली आहे. संवादलेखक आहेत मर्मबंधा आणि विराजस कुलकर्णी.
‘ती अँड ती’ चं संगीत
चित्रपटाला संगीत नव्या दमाच्या साई-पियुष या जोडीने दिलं आहे आणि चित्रपटातील धमाल गाण्यांना आवाज अवधूत गुप्ते, महालक्ष्मी अय्यर, रोहित राउत, जुईली जोगळेकर, गौरव बुरसे आणि अर्पिता चक्रवर्ती यांनी दिला आहे. छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे हर्षवर्धन पाटील यांनी तर संकलन आहे अर्जुन मोगरे यांचं, ध्वनी लेखक आहेत स्वराधीश स्टुडियोचे स्वरूप जोशी तर प्रमुख सहायक दिग्दर्शक आहेत जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी.
आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. वैषल शाह, पुष्कर जोग आणि मोहन नदार यांची निर्मिती असलेला “ती & ती ” ८ मार्च २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.