तुला पाहते रे फेम 'इशा'चा डान्स जलवा

तुला पाहते रे फेम 'इशा'चा डान्स जलवा

‘तुला पाहते रे’ ही टेलिव्हिजन मालिका काही महिन्यांपूर्वी फारच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून एक नवं नाव घराघरात पोचलेलं ते म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार. या मालिकेत तिने इशाची भूमिका साकारली होती. गायत्रीने साकारलेली इशा प्रेक्षकांना फारच आवडली होती. ज्यामुळे तिचा एक चाहता वर्ग तयार झाला आहे. आता या मालिकेतून मिळालेल्या यशानंतर गायत्री आता तिचं नशीब एका वेगळ्या माध्यमात आजमावत आहे. गायत्रीने मराठी टेलिव्हिजनवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या डान्सशोमध्ये भाग घेतलेला आहे. या शोमधून सध्या अनेक अभिनेत्री आपल्या नृत्यकलेचं दर्शन घडवत आहेत. गायत्रीला अभिनय कलेचे उत्तम ज्ञान असलं तरी ती आजवर नृत्य शिकलेली नाही. त्यामुळे सहाजिकच ही स्पर्धा गायत्रीसाठी एखाद्या आव्हानाप्रमाणेच आहे. ज्यामुळे गायत्रीचे चाहते आता तिचं नृत्यकौशल्य पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. 

गायत्रीच्या चाहत्यांसाठी खुशखबर

गायत्रीने या शोसाठी सर्वप्रथम 'मला वेड लागले प्रेमाचे' या गाण्यावर नृत्य केलं होतं. नृत्यकलेचं रितसर शिक्षण घेतलेलं नसतानाही तिने या गाण्यावरील नृत्य उत्तमप्रकारे सादर केलं. शिवाय हा  परफॉर्मन्स देताना तिने नृत्याचा आनंदही घेतला. त्यानंतर ती आता विविध शैलीतील डान्स या शोमध्ये सादर करत आहे. या स्पर्धेआधी तिने फक्त एका अवॉर्ड शोमध्ये एक ग्रुप डान्स केला होता. सगळ्या मालिकांच्या मुख्य पात्रांचा मिळून तो डान्स होता. मात्र तो ग्रूप डान्स असल्यामुळे त्याबद्दल तिला फार भिती वाटली नाही. आता मात्र पहिल्यांदाच एका मोठ्या मंचावर सोलो डान्स सादर करताना तिच्या मनात उत्सुकता आणि भीती अशी संमिश्र भावना निर्माण होत आहेत. डान्सिंग क्वीन या शोसाठी कोरिओग्राफर मयुर वैद्य आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे दोन परिक्षकांची भूमिका निभावत आहेत. या दोन्ही परिक्षकांबद्दल तिला प्रचंड आदर आहे. गायत्रीसाठी तिचे प्रेक्षक फार महत्त्वाचं  असल्याचं तिचं म्हणणं आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी असं आगळंवेगळं आव्हान तिने स्वीकारलं आहे.

गायत्री दातारला काय वाटतं या स्पर्धेबाबत

गायत्री दातारने तिच्या नृत्यविषयक अनुभवांविषयी काही खास गोष्टी तिच्या चाहत्यांसाठी शेअर केल्या आहेत. गायत्रीने शेअर केलं आहे, “मला लहानपणापासूनच 'स्टेज फिअर' नाही. मंचावर जाऊन अभिनय सादर करणं, मी लहानपणापासून करत आले आहे. पण, डान्सच्या बाबतीत स्थिती थोडी निराळी होती. मनात थोडी धाकधूक होती. अभिनयाच्या बाबतीत जेवढी सहजता माझ्याकडे आहे, तेवढा आत्मविश्वास नृत्याविषयी नसल्याने भीती वाटणं साहजिक होतं. मी स्वतः नृत्यकला शिकलेली नसल्यामुळे, मला डान्सबद्दल फारसं काही ठाऊक नाही. पण, मला माधुरी दीक्षित खूपच आवडते. माधुरी दीक्षित माझी नृत्य क्षेत्रातील आदर्श आहे. या डान्स शोबद्दल सांगायचं झालं तर आम्ही कुणीही एकमेकांना याआधी फार ओळखत नव्हतो. पण, 'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने आमची सगळ्यांची छान मैत्री झालेली आहे. एकमेकांना मदत करणे, काळजी घेणं, या गोष्टी ऑफस्क्रीन सुद्धा घडत असतात. थट्टामस्करी, चिडवाचिडवी, मजामस्ती हा सगळा सुद्धा या मंचावरील नेहमीचा भाग झालेला आहे. ओंकार हा या शोसाठी एक चांगला गुरू आम्हाला लाभला आहे. त्याची टीम सुद्धा फार छान आहे. सगळ्यांकडून उत्तमरित्या रिहर्सल करून घेण्याचं काम ते करत असतात. एकूणच, भरपूर धमाल असलेल्या वातावरणात आमची ही स्पर्धा सुरू आहे. ज्यामुळे स्पर्धेपेक्षा हा समृद्ध अनुभव माझ्यासाठी  जास्त महत्त्वाच आहे.