संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

संजीवनी टेलीव्हिजन मालिका 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका डॉक्टरांच्या जीवनावर आधारित होती. मेडिकल करिअर, डॉक्टरांचं जीवन, प्रेमकथा, संघर्ष अशा अनेक गोष्टी या मालिकेत दाखविण्यात आल्या होत्या.  या मालिकेला त्या काळी फार लोकप्रियता मिळाली होती. संजीवनी मालिका जवळजवळ चार वर्षे टेलीव्हिजनवर सुरू होती. या मालिकेतून गुरूदीप कोहली, अर्जून पुंज, मिहीर मिश्रा, संजीत बेदी, मोहनिश बहल, इरावती हर्षे, शिल्पा शिंदे यांनी प्रमूख भूमिका साकारल्या होत्या.

Instagram

संजीवनी मालिकेच्या चाहत्यांसाठी खूशखबर

संजीवनी मालिकेच्या  चाहत्यांसाठी आता एक खूशखबर आहे. या मालिकेचा दुसरा भाग पुन्हा टेलीव्हिजनवर सुरू होणार आहे. तब्बल सतरा वर्षांनी या मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने या मालिकेच्या दुसऱ्या भागाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला.

संजीवनी 2 मधील कलाकार

संजीवनी मालिकेमध्ये अनेक नवीन कलाकार झळकले होते. गुरुदीप कोहली आणि अर्जून पुंज सारख्या कलाकारांना या मालिकेने जगासमोर आणलं होतं. आता नव्या भागात कोणकोणते कलाकार असणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. संजीवनी 2 च्या नव्या भागात सुरभी चंदना, सयंतनी घोष आणि नमित खन्ना हे नवे चेहरे दिसणार आहेत. यासोबतच पहिल्या भागातील मोहनिश बहल आणि गुरूप्रीत कोहली देखील या मालिकेत असणार आहे. 

Instagram

नवीन मालिकेबाबत जुन्या कलाकारांची प्रतिक्रिया

संजीवनी मालिकेतून पदार्पण केलेली गुरूप्रीत कोहली या मालिकेच्या दुसऱ्या भागाबाबत फारच उत्सुक आहे. तिच्या मते संजीवनी मालिकेला युवा प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेकडून प्रेरणा घेऊन त्या काळी अनेक युवांनी मेडिकल करिअर निवडण्याचा निर्णय घेतला होता. आज त्यापैकी अनेकजण आपल्या जीवनात यशस्वी डॉक्टरदेखील झाले आहेत. लोकांच्या मनात या मालिकेमुळे डॉक्टरांबद्दलचा आदर आणि सन्मान अधिकच वाढला होता. गुरुप्रीतने असं शेअर केलं आहे की, “ तुमची संजीवनी मधील डॉ. जुही तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे. जे प्रेम तुम्ही पहिल्या भागात दिलं तेच प्रेम आम्हाला या दुसऱ्या भागात देखील मिळेल अशी आशा आहे.”

संजीवनीमधील सिनिअर डॉक्टरची भूमिका साकारलेल्या अभिनेता मोहनिश बहलने शेअर केलं आहे की, “ मी संजीवनी सिरिअलच्या माध्यमातून टेलीव्हिजन माध्यमात पदार्पण केलं होतं. या मालिकेने मला बरंच काही दिलं आहे. आता सतरा वर्षांनी मी पुन्हा एकदा या मालिकेत काम करत आहे. पहिल्या भागापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी आम्ही या भागात प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करू.

संजीवनी मालिकेनंतरही डॉक्टरांच्या जीवनावर आधारित अनेक मालिका टेलीव्हिजनवर आल्या होत्या. ज्यामधून मेडिकल विश्व जगासमोर दाखविण्यात आलं होतं. मात्र संजीवनी मालिकेची सर त्या मालिकांना नक्कीच नव्हती. आता संजीवनी मालिकेचा दुसरा भाग पुन्हा प्रदर्शित होत असल्यामुळे चाहत्यांच्या जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळू शकेल. शिवाय संजीवनी 2 मालिका बिग बजेट असल्याने त्यामध्ये अनेक नवीन गोष्टींचा समावेश केला जाण्याची  शक्यता आहे. नवीन संजीवनी मालिकेचे कथानक आणि कलाकार पाहण्यासाठी चाहतावर्ग उत्सुक आहे.

अधिक वाचा

जुन्या मालिकांमधील स्टार्स आता दिसतात असे, पाहा फोटो

'ये है मोहबतें' फेम विवेक दहिया झळकणार नागिन 4 च्या प्रमुख भूमिकेत

टेलीव्हिजनवर पुन्हा सुरू होणार ‘हम पांच’ हिंदी मालिका

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम