जेव्हा नीतू कपूर 38 वर्षांनी डेटवर जाते…

जेव्हा नीतू कपूर 38 वर्षांनी डेटवर जाते…

लग्नाला कितीही वर्ष होऊ दे पण आपल्या आवडत्या माणसाबरोबर वेळ घालवणं हे कोणाला आवडत नाही. बॉलीवूडमधील कपूर घराणंही याला अपवाद नाही. ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलीवूडमधील नावाजलेलं कपल आहे. बॉलीवूडमधील एव्हरग्रीन असणारे ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या गंभीर आजारावर उपचार घेत आहेत. मात्र अजूनही त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे याची कोणालाही कल्पना नाही. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी नीतूही कायम असते. नीतू कपूर या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या पाहायला मिळतात. शिवाय आपल्या कुटुंबासह अनेक फोटोही त्या पोस्ट करत असतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. नीतू कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून ऋषी कपूरबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोपेक्षाही अधिक याच्या कॅप्शनला पसंती मिळत असल्याचं दिसतंय.


neetu rishi lunch date
काय आहे कॅप्शन


नीतू आणि ऋषी न्यूयॉर्कमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असता नीतूने हा सेल्फी काढला आहे. यामध्ये ऋषी कपूर आपल्या फोनमध्ये गुंतले असून नीतू कपूर सेल्फी घेत आहे. लंच डेटवर गेलल्या नीतूने या फोटोला अगदी साजेसं असं कॅप्शन दिलं आहे. ‘लग्नानंतर 38 वर्षाने जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर लंच डेटवर जाता, तर त्यावेळी असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं.मी ऋषीबरोबर फोटो घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते मात्र फोनमध्ये गुंतले आहेत आणि मी मात्र सेल्फी काढण्यात व्यग्र असून त्यांना माझ्याकडे बघायला वेळही नाही,’ असं मजेशीर कॅप्शन नीतूने दिलं आहे. सध्या प्रत्येक जण अशाच प्रकारे वागताना दिसत असल्यामुळे या फोटोशी सगळेच अगदी पटकन जोडले गेले असून या फोटोखाली बरेच जण प्रतिक्रियादेखील देत आहेत.


kapoor family
नीतूने नेहमीच दिली ऋषीला साथ


नीतू आणि ऋषी कपूरने अनेक चित्रपट एकत्र केले. त्यांची जोडी प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर नीतूने चित्रपटात काम करणं सोडून दिलं. पण नीतूने ऋषी कपूरला नेहमीच साथ दिली. ऋषी कपूर आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मनात एक बाहेर एक असं ऋषी कधीही करत नाही. पण नीतूने नेहमीच ऋषी कपूर यांना सांभाळून घेतलं असून आता ऋषीच्या आजारपणातही नीतू खंबीरपणे त्यांच्याबरोबर उभ्या आहेत. नुकतंच नव्या वर्षातही नीतूने आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर या दोन्ही मुलांनाही नीतूने घराशी चांगलंच जोडून ठेवलं असल्याचंही नेहमी दिसून येतं. दरम्यान नीतू आणि ऋषीची मुलगी रिद्धीमा ही दिल्लीमध्ये स्थायिक असून मुलगा रणबीर कपूरनेही बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. अभिनेत्री आलिया भटला सध्या रणबीर डेट करत असून लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आलं आहे. आलियादेखील बऱ्याचदा रणबीरबरोबर ऋषी कपूरला न्यूयॉर्कला भेटायला जात असल्याचं दिसून आलं आहे. आता नीतूने पोस्ट केलेल्या या फोटोनंतर ऋषी कपूर यांची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता नक्कीच त्यांच्या चाहत्यांना असेल. कारण ऋषी कपूरदेखील नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असेलेलं पाहायला मिळालं आहे. 


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम