हार्दिकचं केलं कौतुक, रणवीर आला अडचणीत

हार्दिकचं केलं कौतुक, रणवीर आला अडचणीत

रणवीर सिंह हा बॉलीवूडमधील असा कलाकार आहे जो स्वतः तर कौतुकाला पात्र आहेच. पण दुसऱ्यांचं कौतुक करतानाही तो थकत नाही. भारत - पाकिस्तानच्या सामन्यात रणवीर सिंह कॉमेन्ट्री करायला पोहचला होता. भारत जिंकल्यानंतर संपूर्ण टीममधील काही खेळाडूंबरोबर कौतुकाच्या कॅप्शन लिहित रणवीरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. त्यामध्ये सौरव गांगुली, भारताचा कप्तान विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह या सगळ्यांबरोबर रणवीरने फोटो पोस्ट केले आहेत. पण यापैकी अजून एकाबरोबर फोटो पोस्ट करून त्याखालील कॅप्शन लिहिणं रणवीरला चांगलंच महागात पडणार असल्याचं सध्या चित्र आहे. रणवीरने हार्दिक पांड्याबरोबर एक फोटो पोस्ट केला आणि त्याखाली लिहिलेली कॅप्शन त्याला अडचणीत आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे नक्की कॅप्शन?

रणवीर सिंह नेहमीच आपल्या मनात जे येईल ते करतो. दुसऱ्यांचंही तो भरभरून कौतुक करतो. भारत - पाकिस्तान सामना भारताने जिंकल्यानंतर रणवीरने हार्दिक पांड्याबरोबर एक फोटो पोस्ट केला आणि त्याखाली एक कॅप्शन लिहिली ज्यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. या फोटोखाली रणवीरने लिहिलं आहे, ‘Eas, Sleep, Dominate, Repeat’. पण यामुळे रणवीरला WWE स्टार ब्रॉक लेन्सरच्या मॅनेजर आणि वकील हेमॅनने त्याचं स्लोगन चोरल्याचा आरोप केला आहे. या कॅप्शनवर त्याने रणवीरला विचारलं ‘तू मस्करी करत आहेस का? हे इट, स्लीप, कॉन्कर, रिपीट असं असतं आणि यावर ब्रॉक लेन्सरचा कॉपीराईट आहे. मी याविरोधात तुझ्याविरुद्ध कारवाई करणार आहे.’ वास्तविक WWE च्या मॅच सुरु होण्यापूर्वी ब्रॉकचं हे स्लोगन आहे. जेव्हा तो रिंगमध्ये उतरतो तेव्हा तो हेच वाक्य म्हणतो. 2014 मध्ये अंडरटेकरला हरवल्यापासून ब्रॉक हेच स्लोगन वापरत आहे. त्यामुळे रणवीरला आता ही स्लोगन वापरणं खरंच महागात पडणार का? हे आता पाहावं लागेल. WWE मध्ये जेव्हापासून तो परत आला आहे तेव्हापासून तो ही स्लोगन वापरत आहे आणि त्याच्या कपड्यांच्या मागेही हे स्लोगन लिहिलेलं आहे. इतकंच नाही त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही धोनीची प्रशंसा केली होती. ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं, ‘इट, स्लीप, मॅच संपव, रिपीट. एम. एस. धोनीचं आयुष्य’.

Instagram

रणवीरची प्रतिक्रिया नाही

या सगळ्यानंतर अजूनही रणवीर सिंहने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वीदेखील ‘गली बॉय’ चित्रपटाच्या वेळी रणवीर सिंह अडचणीत आला होता. त्याने हॉस्पिटलमधील मुडदेसुद्धा आता जागे होतील अशा तऱ्हेचं वक्तव्य करून त्यावेळी अडचण ओढवून घेतली होती. पण त्यानंतरही रणवीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता जर त्याच्यावर खरंच कारवाई झाली तर नक्की रणवीर काय करणार? त्याची उत्सुकता आता प्रेक्षक आणि चाहत्यांना लागली आहे.

रणवीर सध्या 83 च्या चित्रीकरणात व्यग्र

रणवीर सध्या लंडनमध्ये 83 या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. कबीर खान दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटामध्ये रणवीरबरोबर दीपिकादेखील दिसणार आहे. हा चित्रपट 83 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारित असून रणवीर यामध्ये कपिल देवची भूमिका साकारत आहे. यासाठी सध्या रणवीर खूपच मेहनत घेत असून त्याच्याबरोबर अनेक कलाकार या चित्रपटात अन्य खेळाडूंची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.