बॉलीवूडच्या शिरपेचात सुपरहिट चित्रपटांची मालिका रोवणाऱ्या यशराज फिल्म्सला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या यशराज बॅनरने या क्षेत्रात आपली हाफ सेंचूरी पूर्ण केली आहे. यंदा या कंपनीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. काही दिवसांपासून यशराज फिल्म्सच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र कोरोना, लॉकडाऊनमुळे यंदा हा महोत्सव पुढे ढकलण्यात येईल अशी चर्चा होती. कदाचित या वर्षी यशराज बॅनरखाली फक्त काही बिग बजेट चित्रपटांची घोषणा केली जाईल आणि महोत्सवाचे रूप साधेच ठेवण्यात येईल असं अनेकांना वाटत होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच यशराज फिल्मचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार अशी चिन्ह आहेत. एवढंच नाही तर अनेक देशांमधील भाषांमध्ये त्यांच्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा कंपनीचा मानस आहे. सर्वात महत्ताचं म्हणजे यंदा यशराज फिल्म्सचा नवा लोगो लॉंच केला जाणार आहे. हा लोगो देशभरातील एकूण 22 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. यशराज फिल्म्सने या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली असून लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
It’s the fearless Shivani Shivaji Roy vs Evil. #6YearsOfMardaani pic.twitter.com/b3J3xRAM17
— Yash Raj Films (@yrf) August 22, 2020
यशराज फिल्म्सच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कंपनीने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. कंपनीचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा यांनी या कार्यक्रमासाठी एक खास प्लॅन केला होता. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या सर्व प्लॅनिंगवर पाणी फिरले. आता हा महोत्सव या कंपनीचे संस्थापक आणि दिवगंत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या जंयतीच्या दिवशी केले जाणार आहे. यश चोप्रा यांची जयंती 27 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी मोठमोठ्या सेलिब्रेटीजच्या उपस्थितीमध्ये या बॅनरच्या बिग बजेट चित्रपटांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. शिवाय या दिवशीच कंपनीचा नवीन लोगो सर्वांसमोर प्रदर्शित केला जाईल.
यशराज फिल्म्सने आतापर्यंत या पन्नास वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये फक्त हिंदीच नाही तर इतरही अनेक भाषांचा समावेश आहे. सर्व भाषांमध्ये काम करून या कंपनीने कलेला भाषेचे बंधन नसते हे सिद्ध केलं आहे. म्हणूनच यावर्षी यशराज फिल्म्सला या सर्व भाषांमध्ये आपला लोगो प्रदर्शित करायचा आहे. ज्यामुळे सर्व देशांमधील सर्व भाषांमध्ये यशराज फिल्म्सला ओळख आणि प्रेम मिळेल.मागच्यावर्षी यशराजने बॉलीवूडमध्ये वॉर आणि मर्दानी 2 या चित्रपटांची निर्मिती केली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान हिट ठरले होते. या वर्षी बॅनर खाली पाच मोठे चित्रपट निर्माण केले जात आहेत. ज्यामध्ये बंटी और बबली 2, शमशेरा, जयेशभाई जोरदार, संदीप और पिंकी फरार आणि पृथ्वीराज या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक महिने शूटिंग बंद असल्यामुळे यातील किती चित्रपट यावर्षी पाहायला मिळतील हे काळच सांगू शकेल.