जेव्हा चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व किंवा सुरकुत्या दिसू लागतात किंवा त्वचा टॅन होऊन त्वचेचा रंग गडद होऊ लागतो. तेव्हा हे समजून जावे तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावण्याची आवश्यकता आहे. त्वचेशी संबंधित या समस्या टाळण्यासाठी तुम्ही एखादे चांगले UV क्रीम म्हणजेच सनस्क्रीन क्रीम वापरले पाहिजे. खास करून भारतात जिथे उष्णकटिबंधीय हवामान आहे आणि वर्षाचे जवळजवळ सगळेच महिने आपल्याकडे मुबलक सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे आपण वर्षाचे बाराही महिने सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावले पाहिजे. खरं तर सूर्याची किरणे आणि खास करून UV किरणे तर ढगांमधूनही आरपार जाऊ शकतात आणि त्वचेचे नुकसान करू शकतात, म्हणून वर्षाचे सगळे दिवस आपण बाहेर जाताना केवळ चेहेऱ्यालाच नव्हे तर सर्व दृश्य भागाला सनस्क्रीन लावले पाहिजे. याच्या वापराने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण तर होतेच, पण त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. वास्तविक, बहुतेक समस्या सूर्याच्या UVA आणि UVB किरणांमुळे होतात. त्यामुळे जर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण केले तर तुमची त्वचा निरोगी आणि तरुण राहण्यास मदत होईल. तसेच त्वचेच्या कर्करोगासारख्या अनेक त्वचेच्या आजारांपासूनही ते तुमचे रक्षण करण्यास उपयुक्त आहे. उन्हाळ्यात त्वचा घामामुळे अधिक चिकट व तेलकट होऊ लागते, अशा वेळी सनस्क्रीन लावण्याचा अनेक लोक कंटाळा करतात किंवा सनस्क्रीन लावून उन्हाळ्यात मेकअप कसा करावा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.
Table of Contents
- सनस्क्रीन म्हणजे काय?
- सनस्क्रीन नेमकं कसं उपयोगी ठरतं?
- सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत
- सनस्क्रीन लावण्याचे फायदे
- सनस्क्रीन लावण्याचे साईड इफेक्ट्स
- कशी ओळखाल तुमच्या सनस्क्रीन एक्सपायरी डेट
- सनस्क्रीन स्टोर करण्याची पद्धत
- सनस्क्रीन खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
- सनस्क्रीन वापरण्यासाठी काही टिप्स
- सनस्क्रीनसंबंधी पडणारे काही प्रश्न- FAQ
सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करणारे क्रीम किंवा प्रोटेक्शन तुम्ही वापरत नसल्यास तुमची त्वचा नक्कीच कोरडी होऊन खराब होईल. उन्हाळ्यात सुद्धा त्वचेची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. सकाळी घरातून बाहेर पडताना त्वचेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून दिवसभर पर्यावरणाच्या हानीपासून तुमची त्वचा सुरक्षित ठेवता येईल. सनस्क्रीन लावल्याने त्वचेचा बाहेरील थर सुरक्षित राहतो आणि चेहऱ्यावर आरोग्यदायी चमक येते.जर तुम्हाला चेहऱ्यावर वारंवार मुरूम येत असतील आणि ते बरे झाल्यानंतर, त्यांचे डाग पडत असतील, तर या समस्येमध्ये सनस्क्रीन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, या समस्येला पोस्ट-एक्ने हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. चेहऱ्यावर नियमितपणे सनस्क्रीन लावत राहिल्यास मुरुमांच्या डागांपासून सुटका करणे सोपे होईल. त्यामुळे लहान असो की मोठे, स्त्री असो की पुरुष सर्वांनीच सनस्क्रीन क्रीमचा नियमित वापर करावा.
सनस्क्रीन म्हणजे काय?
सनस्क्रीन, ज्याला सनब्लॉक, सन क्रीम किंवा सनटॅन लोशन म्हणूनही ओळखले जाते, हे त्वचेसाठी एक फोटोप्रोटेक्टिव्ह टॉपिकल उत्पादन आहे जे सूर्याची काही अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणे शोषून घेते किंवा परावर्तित करते आणि त्वचेचे सनबर्नपासून संरक्षण करते. सनस्क्रीनचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ते त्वचेचा कर्करोग टाळण्यास मदत करते. सनस्क्रीन हे लोशन स्प्रे, जेल, फोम्स (फोम लोशन, व्हीप्ड लोशन), स्टिक्स, पावडर आणि इतर स्वरूपात टॉपिकल उत्पादन म्हणून वापरण्यात येते. सनग्लासेस, सनहॅट्स आणि विशेष सॅन प्रोटेक्टिव्ह कपडे, आणि छत्री सारखे इतर फोटोप्रोटेक्शनबरोबरच उन्हापासून संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर होतो.
जगातील पहिल्या सनस्क्रीनचा शोध ऑस्ट्रेलियातील रसायनशास्त्रज्ञ एच.ए. मिल्टन ब्लेक यांनी 1932 साली लावला. ते यूव्ही फिल्टर salol (Phenyl salicylate) चा 10% कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला तयार करत होते. हा फॉर्म्युला ऍडलेड विद्यापीठाने व्हेरिफाय केला होता आणि हॅमिल्टन लॅबोरेटरीज या ब्लेक यांच्या कंपनीने त्याचे व्यावसायिक उत्पादन देखील केले होते. सनस्क्रीन तुलनेने नवीन असूनही, सूर्यापासून संरक्षणासाठी प्राचीन इजिप्शियन लोक देखील तांदळाचा कोंडा, चमेली आणि ल्युपिन सारख्या घटकांचा वापर करत होते. म्हणजेच प्राचीन काळापासून पासून सूर्याच्या किरणांपासून संरक्षणासाठी विविध प्रकार वापरले जात आहेत.
सनस्क्रीनचे वर्गीकरण इनऑरगॅनिक किंवा फिजिकल सनस्क्रीन म्हणजे, झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड आणि ऑरगॅनिक किंवा केमिकल सनस्क्रीन अशा दोन प्रकारांमध्ये केले जाते. हे दोन्ही प्रकारचे सनस्क्रीन प्रामुख्याने अतिनील प्रकाश शोषून कार्य करतात. नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की इनऑरगॅनिक सनस्क्रीन 95% पर्यंत अतिनील प्रकाश शोषू शकतात, तर त्याची विक्षेपित करण्याची क्षमता केवळ 5% (SPF 2 पेक्षा कमी) असू शकते. अमेरिकन कॅन्सर सोसायटी सारख्या वैद्यकीय संस्था सनस्क्रीन वापरण्याची शिफारस करतात कारण ते स्क्वॅमस सेल कार्सिनोमास प्रतिबंध करण्यास मदत करते. सनस्क्रीनचा नियमित वापर मेलेनोमाचा धोका देखील कमी करू शकतो.जरी अनेक सनस्क्रीन अल्ट्राव्हायोलेट ए (यूव्हीए) किरणोत्सर्ग ब्लॉक करत नाहीत, तरीही त्वचेच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी UVA पासून संरक्षण महत्वाचे आहे. त्वचेचा कर्करोग आणि UVA किरणोत्सर्ग जसे की फायटोफोटोडर्माटायटिसशी संबंधित इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी त्वचातज्ज्ञ ब्रॉड-स्पेक्ट्रम (UVA/UVB) सनस्क्रीन वापरण्याची शिफारस करतात. सनस्क्रीनचा नियमित वापर केल्याने सुरकुत्या, काळे डाग आणि त्वचा निस्तेज होण्यास प्रतिबंध होण्यास मदत होते.
सनस्क्रीन नेमकं कसं उपयोगी ठरतं?
आपल्या त्वचेचे अतिनील प्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन आवश्यक आहे परंतु हे लोशन नेमके कसे कार्य करते? सनस्क्रीन हे फिजिकल आणि केमिकल कणांच्या (Physical and Chemical Particles) मिश्रणाद्वारे अतिनील किरणांना अवरोधित करते आणि शोषून घेते. झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड सारख्या फिजिकल पार्टिकल्सचा वापर त्वचेतून अतिनील किरणे परावर्तित करण्यासाठी केला जातो. तर सनस्क्रीनमधील जटिल रासायनिक घटक (Complex Chemical Components) त्वचेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किरणोत्सर्गाशी रिऍक्ट होतात, किरण शोषून घेतात आणि त्यातील ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर सोडतात.
UVB आणि UVA किरणांचा सामना करण्यासाठी अतिनील किरणे अवरोधित करणे आणि शोषून घेणे यांचे संयोजन करणे महत्वाचे आहे. UVB रेडिएशन हे सूर्यप्रकाशाने होणारे सनबर्न आणि त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. तर UVA किरण त्वचेत अधिक खोलवर प्रवेश करतात. पूर्वी अशी मान्यता होती की UVA किरणांमुळे केवळ त्वचा अकाली वृद्ध दिसू लागणे आणि सुरकुत्या निर्माण होणे या त्वचेच्या समस्या होतात. पण अलीकडील संशोधनात तज्ज्ञांना असे आढळले आहे की त्वचेच्या कर्करोगाच्या विकासामध्ये UVA किरण देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. बाजारातील अनेक सनस्क्रीनमध्ये असे घटक असतात जे केवळ UVB किरणांना अवरोधित करतात, त्यामुळे ते हानिकारक UVA किरणांपासून अपुरे संरक्षण प्रदान करतात. सनस्क्रीनची निवड करताना आणखी एक घटक लक्षात घेणे आवश्यक आहे तो म्हणजे सूर्य संरक्षण घटक किंवा एसपीएफ होय. कमीत कमी 15 किंवा त्याहून अधिक SPF सह UVA आणि UVB दोन्ही संरक्षण देणारे सनस्क्रीन निवडले पाहिजे जेणे करून तीव्र उन्हात तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही.
सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत
आपल्याला माहितीच आहे की सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात आल्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनाच सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. सनस्क्रीन न लावल्याने किंवा ते योग्यरित्या न लावल्याने तुम्हाला अकाली वृद्धत्व आणि कर्करोगजन्य रोगांचा सामना करावा लागू शकतो, सनस्क्रीन योग्य प्रकारे लावल्याने तुमच्या त्वचेचा बचाव करण्यात मदत होईल. जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत-
- आपली त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येण्यापूर्वी आपण सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे. कारण आपली त्वचा संरक्षित होण्याआधी बहुतेक सनस्क्रीन शोषून घेण्यासाठी वेळ लागतो. म्हणूनच बाहेर जाण्यापूर्वी 20-30 मिनिटे आधी सनस्क्रीन लावण्याची शिफारस केली जाते.
- सनस्क्रीन चेहऱ्यावर आणि शरीरावर लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आधी छोटे छोटे थेंब लावणे आणि मग ते सगळीकडे व्यवस्थितपणे पसरवणे. तुम्ही स्प्रे वापरत असाल, तर तुमच्या सर्व उघड्या भागावर त्याची समान लेयर तयार होईपर्यंत स्प्रे करा. तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अशा प्रकारे सनस्क्रीन लावल्याने तुमच्या त्वचेला ते सहजपणे शोषून घेण्यास मदत होते, तसेच अधिक कव्हरेज देखील होते.
- वर म्हटल्याप्रमाणे आपल्याला वर्षाचे सगळे दिवस बाहेर जाताना सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ढगाळ वातावरणात सुद्धा सूर्याची अतिनील किरणे आपल्या त्वचेचे नुकसान करू शकतात.
- बाहेर असताना जास्त घाम आल्यावर लगेच पुन्हा सनस्क्रीन लावा कारण घाम आल्यावर सनस्क्रीन निघून जाते तुमचे संरक्षण संपुष्टात येऊ शकते.
- पोहणे किंवा पाण्यात गेल्यानंतरही लगेच पुन्हा सनस्क्रीन लावा. कोणतेही सनस्क्रीन 100% वॉटरप्रूफ नसते त्यामुळे पाण्यातून बाहेर पडल्यानंतर लगेचच तुमचे सनस्क्रीन पुन्हा लावा.
- जेव्हा आपण पहिल्यांदा सूर्यप्रकाशात जातो तेव्हा आपल्यापैकी बरेच जण सनस्क्रीन लावण्याविषयी जागरूक असतात, परंतु आपल्यापैकी किती जण दिवसभर सतत सूर्याच्या किरणांपासूनस्वतःच्या त्वचेचे संरक्षण करतात? योग्य संरक्षणाशिवाय तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणून तुम्ही घराबाहेर काम करत असाल तर दिवसभर अनेकदा सनस्क्रीन लावा आणि टोपी व संरक्षणात्मक कपडे घाला.
- सनस्क्रीन लावण्याआधी त्याची बाटली किंवा पॅक चांगला हलवून घ्या जेणे करून त्यातील कण एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळले जातील. तुम्ही स्प्रे-ऑन किंवा स्टिक प्रकारचे सनस्क्रीन देखील वापरून बघू शकता.
- त्वचेला आवश्यक इतके सनस्क्रीन लावा. त्वचेवर जर सनस्क्रीनचा थर तयार झाला नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही.
- कान, पाठ, खांदे, गुडघे आणि पाय यांच्या मागील भागासह तुमच्या त्वचेच्या सर्व उघड्या भागांवर सनस्क्रीन लावा.
- सनस्क्रीनचा जाड थर लावा.
- डोळ्याभोवती सनस्क्रीन लावताना काळजी घ्या.
- सनस्क्रीनचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे क्रीम. बहुतेक भारतीय स्त्रिया अशाच प्रकारचे सनस्क्रीन वापरतात. पण सनस्क्रीन जेल, लोशन आणि स्टिकच्या स्वरूपातही उपलब्ध आहे.
- जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्रीम स्वरूपात उपलब्ध असलेले सनस्क्रीन वापरावे. चेहऱ्यावर शक्यतोवर फक्त क्रीम स्वरूपातले सनस्क्रीन लावावे.
- नेहमी शरीराच्या पाय, पाठ, कंबर आणि हात या भागांवर सनस्क्रीन लोशन लावावे. याचे कारण असे की, लोशन हे क्रीमपेक्षा खूप पातळ असते आणि ते सहज पसरते. याव्यतिरिक्त, ते क्रीमपेक्षा खूपच कमी ग्रीसी असते.
- तसेच सनस्क्रीन जेल शरीराच्या ज्या भागात जास्त केस आहेत त्या भागांवर कडक सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी वापरावे.
- स्टिक स्वरूपात उपलब्ध असलेले सनस्क्रीन विशेषतः डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागावर लावणे फायदेशीर आहे.
- सनस्क्रीन स्प्रे सर्व वयोगटातील लोक वापरू शकतात. परंतु ते मुलांसाठी वापरणे उत्तम आहे कारण मुलांना जास्त वेळ पाण्यात आणि सूर्यप्रकाशात राहायला आवडते. आणि त्यांच्या त्वचेवर सनस्क्रीन पुन्हा पुन्हा समान स्वरूपात लावणे सोपे नाही.म्हणूनच लहान मुलांसाठी स्प्रे सर्वोत्तम आहे. कारण ते संपूर्ण शरीरावर सनस्क्रीनचा एक समान थर बनवते. पण मुलांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर स्प्रे करू नका कारण त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे मान आणि चेहऱ्यावर क्रीम वापरावे.
सनस्क्रीन लावण्याचे फायदे
उन्हाळा असो की हिवाळा आपण दररोज बाहेर जाताना सनस्क्रीन लावून आपल्या त्वचेचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण केले पाहिजे. सनस्क्रीन मध्ये असणारे SPF हे करण्यास मदत करते. सनस्क्रीन वापरण्याचे पुढील फायदे वाचल्यावर तर तुम्हाला नक्कीच नियमितपणे सनस्क्रीन लावण्याची प्रेरणा मिळेल.
हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण
सतत कमी होत असलेल्या ओझोनच्या थरामुळे आपल्याला सूर्याच्या हानिकारक किरणांचा त्रास होण्याचा धोका जास्त आहे. व्हिटॅमिन डीच्या डोससाठी आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज असली तरी, त्यासाठी आपण आपल्या त्वचेचे आरोग्य धोक्यात घालू शकत नाही. सनस्क्रीन हे अत्यंत आहे कारण ते आपल्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते.
अकाली वृद्धत्व प्रतिबंधित करते
आपल्या सर्वांनाच तरुण,तेजस्वी आणि निरोगी त्वचा हवी असते. सनस्क्रीन वापरणे सुरू करण्याचे हे सर्वात महत्वाचे कारण आहे कारण ते सुरकुत्या आणि बारीक रेषा, सनस्पॉट्स, पिगमेंटेशन, फोटोडॅमेज आणि कोरडी त्वचा यासारख्या वृद्धत्वाच्या लक्षणांपासून त्वचेचे संरक्षण करते. तज्ज्ञांनी केलेल्या अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की सनस्क्रीन वापरणाऱ्या 55 वर्षांखालील लोकांमध्ये सनस्क्रीन वापरत नसलेल्यांच्या तुलनेत अधूनमधून सनस्क्रीन वापरणाऱ्यांमध्ये अकाली वृद्धत्वाची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता 24% कमी आहे.
त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो
लोक मुख्यत्वे सौंदर्याच्या कारणांसाठी सनस्क्रीन वापरण्यास सुरुवात करतात. सनस्क्रीन वापरण्याचा आपल्या आरोग्यासाठीही फायदा होतो. सनस्क्रीन वापरल्यास त्वचेचे विविध प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगाच्या जोखमीपासून संरक्षण होते.
चेहऱ्यावरील डाग कमी होतात
त्रासदायक डाग आणि पिगमेंटेशन टाळण्यासाठी नियमितपणे चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा. यामुळे पुरळ आणि सूर्यकिरणांमुळे होणारे इतर नुकसान टाळता येऊ शकते.
सनबर्न प्रतिबंधित करते
सनबर्नमुळे त्वचा पातळ होऊ शकते, ती अधिक पारदर्शक बनते आणि जखमा अधिक ठळकपणे दिसतात. तसेच त्वचेची साले निघणे, सूज येणे, लालसरपणा, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी आणि खाज सुटणे असे त्रास वारंवार होऊ शकतात. हे त्रास UVB किरणांमुळे होते, जे सनबर्नसाठी जबाबदार असतात. उष्णतेमुळे, उन्हामुळे येणारे फोड त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. ऑगस्ट 2008 मध्ये ‘Annals of Epidemiology’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की वारंवार सनबर्न झाल्यामुळे प्राणघातक मेलेनोमाचा धोका जास्त असतो. म्हणूनच कायम सनस्क्रीन लावा आणि सुरक्षित रहा.
टॅनिंग प्रतिबंधित करते
तीव्र UVB किरणांमुळे त्वचेला इजा होण्याचा धोका असतो. UVB मुळे होणारे टॅनिंग टाळण्यासाठी किमान SPF 30 असलेले सनस्क्रीन निवडा. तसेच दर दोन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा.
त्वचेचे आरोग्य सुधारते
त्वचेसाठी आवश्यक असलेली प्रथिने, जसे की कोलेजन, केराटिन आणि इलास्टिन त्वचेमध्ये सुरक्षित व मेंटेन ठेवण्यासाठी सनस्क्रीन फायदेशीर आहे. हे इसेन्शियल प्रोटिन्स त्वचा ,मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तुमच्या सनब्लॉकमध्ये टायटॅनियम डायऑक्साइड असेल असेच सनस्क्रीन निवडा. हे त्वचेपासून अतिनील किरण परावर्तित करण्यात मदत करेल आणि या प्रथिनांचे संरक्षण होईल.
सनस्क्रीन फुल-स्लीव्ह ड्रेसपेक्षा चांगले संरक्षण देते
पूर्ण बाह्यांचा पोशाख घालून तुम्ही उन्हापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही. तुम्हाला माहित आहे का की सुती पोशाख, विशेषतः घामामुळे ओलसर झाला असताना, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देत नाही. म्हणूनच पूर्ण बाह्यांचा ड्रेस घातला तरीही सनस्क्रीन लावा.
प्राइमर म्हणून काम करेल
सनस्क्रीन हे प्राइमर म्हणूनही काम करते आणि ते चेहऱ्यावरील बारीक रेषा, कोरडेपणा आणि डाग काढून टाकण्यास मदत करते. त्वचेच्या विविध समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला SPF आवश्यक आहे, त्यामुळे सनस्क्रीन वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
अधिक वाचा – उन्हाळ्यात जास्त घाम येत असेल तर असा करा स्वेट-प्रूफ मेकअप
सनस्क्रीन लावण्याचे साईड इफेक्ट्स
काही सनस्क्रीन उत्पादनांमुळे जसे की एमिनोबेंझोइक ऍसिड किंवा पॅरा-अमीनोबेंझोइक ऍसिड /पीएबीए असलेल्या उत्पादनांमुळे कपड्यांवर डाग पडू शकतात. सनस्क्रीनच्या काही घटकांमुळे त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते. सनस्क्रीन लावल्यावर तुम्हाला त्वचेवर लालसरपणा किंवा जळजळ होत असल्यास, ते लगेच धुवा आणि वापरणे थांबवा. तुमच्या डॉक्टरांना विचारून भिन्न घटक असलेले दुसरे सनस्क्रीन उत्पादन वापरा. खरं तर सनस्क्रीन वापरणाऱ्या अनेकांना गंभीर साईड इफेक्ट्स होत नाहीत. संस्क्रीनवर अतिशय गंभीर साईड इफेक्ट्स होणे दुर्मिळ आहे.पण तरीही जर तुम्हाला पुरळ, खाज सुटणे/सूज विशेषतः चेहरा/जीभ/घसा यांवर सूज येणे, तीव्र चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रियेची लक्षणे दिसली तर तत्काळ वैद्यकीय मदत घ्या.
- सनस्क्रीनमध्ये काही रसायने असतात ज्यामुळे त्वचेला लालसरपणा, सूज, दाहआणि खाज सुटणे यासारखे त्रास होऊ शकतात. काही लोकांना पुरळ आणि तीव्र खाज यांसह तीव्र ऍलर्जीक प्रतिक्रिया निर्माण होतात. ही ऍलर्जीक प्रतिक्रिया सनस्क्रीनमधील सुगंध आणि प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरलेल्या रसायनांचा परिणाम असू शकते. PABA अनेक व्यावसायिक सनस्क्रीनमध्ये वापरला जातो ज्यामुळे ऍलर्जी होऊ शकते. म्हणून शक्यतोवर PABA नसलेले सनस्क्रीन वापरावे.
- तुम्ही ‘हायपोअलर्जेनिक’ लेबल असलेले सनस्क्रीन देखील खरेदी करू शकता. PABA नसलेल्या सनस्क्रीनवर अनेकदा लेबल लावले जाते, परंतु काही इतर रसायनांमुळे ऍलर्जीची समस्या उद्भवू शकते. तुम्ही झिंक ऑक्साईड असलेले सनस्क्रीन वापरू शकता, कारण त्यामुळे ऍलर्जी होण्याची शक्यता कमी असते.
- जर तुम्हाला मुरुमांचा त्रास असेल तर सनस्क्रीन उत्पादनातील काही रसायने तुमची समस्या वाढवू शकतात. सनस्क्रीनच्या या दुष्परिणामापासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही नॉन-कॉमेडोजेनिक आणि नॉन-ऑइली सनस्क्रीन निवडू शकता. आपल्या त्वचेसाठी ज्या प्रकारचे सनस्क्रीन योग्य आहे तेच सनस्क्रीन वापरा. चेहऱ्यावर बॉडी सनस्क्रीन वापरणे टाळा.
- चुकून डोळ्यात सनस्क्रीन गेले तर त्यामुळे वेदना आणि जळजळ होऊ शकते. जर सनस्क्रीन चुकून डोळ्यांमध्ये गेले तर डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवा किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटा.
- सनस्क्रीनमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींवर इस्ट्रोजेनिक प्रभाव पाडणारे घटक समाविष्ट असतात. काही सनस्क्रीनचा रक्तातील इस्ट्रोजेनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.
- जर तुम्ही सनस्क्रीनचा लिप बाम वापरत असाल तर ते फक्त ओठांच्या भागावरच लावा.
- तुमच्या मुलांसाठी सनस्क्रीन अतिशय काळजीपूर्वक निवडा. 6 महिन्यांहून लहान मुलांसाठी सनस्क्रीन वापरणे टाळा.
- तुमची त्वचा तेलकट असल्यास तेलमुक्त आणि नॉन-कॉमेडोजेनिक सनस्क्रीन निवडा.
वर नमूद केल्याप्रमाणे, सनस्क्रीनचे काही दुष्परिणाम आहेत. अशा समस्यांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रसायनमुक्त नैसर्गिक उत्पादने वापरणे. ऍलर्जीक प्रतिक्रिया किंवा इस्ट्रोजेनिक प्रभाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही टायटॅनियम ऑक्साईड किंवा झिंक ऑक्साईड-आधारित सनस्क्रीन निवडू शकता.
अधिक वाचा – उन्हाळा येतोय, अशी घ्या तुमच्या बाळांच्या नाजूक त्वचेची काळजी
कशी ओळखाल तुमच्या सनस्क्रीन एक्सपायरी डेट
हे खरे आहे तुमचे सनस्क्रीन एक्स्पायर होऊ शकते. खरं तर, बहुतेक सौंदर्य उत्पादनांच्या लेबलवर कुठेतरी एक्स्पायरी डेट दिलेली असतात, परंतु त्या कधी कधी त्या अन्नपदार्थांच्या पाकिटाप्रमाणे दिलेल्या नसतात आणि आपल्या सवयीच्या एक्स्पायरी डेटपेक्षा थोड्या वेगळ्या दिसू शकतात. म्हणूनच तुमच्याकडे आधीपासून असलेले सनस्क्रीन तपासणेच महत्त्वाचे आहेच आणि ते फॉर्म्युले अजूनही काम करत आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्ही ते खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांवरील लेबल शोधणे देखील महत्त्वाचे आहे.
सनस्क्रीनच्या एक्स्पायरी डेट्स वेगवेगळ्या स्वरूपात येतात आणि काहीवेळा त्या कळणे थोडे कठीण असते. काही एरोसोल कॅनच्या तळासारख्या ठिकाणी सरळ आणि थेट टाईप केले जातात, तर काही प्लास्टिकच्या बाटल्यांच्या वरच्या भागावर संख्यां प्रिंट केलेल्या असतात. FDA च्या नियमाप्रमाणे सर्व सनस्क्रीन हे 3 वर्षांपर्यंत चांगले राहतात.
इनऑरगॅनिक सनस्क्रीन हे रासायनिक सनस्क्रीनच्या तुलनेत अधिक स्थिर असतात आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य जास्त असते. दोघांमधील मुख्य फरक असा आहे की इनऑरगॅनिक सनस्क्रीन UVA आणि UVB किरणांना परावर्तित करण्यासाठी त्वचेच्या वर थर तयार करते, तर रासायनिक सनस्क्रीन अतिनील किरणांचे उष्णतेमध्ये रूपांतरित करते. रासायनिक सनस्क्रीनमध्ये अस्थिर रेणू असतात, परंतु गेल्या काही वर्षांत उत्पादकांनी त्यात ऑक्टोक्रायलीन सारखे स्टेबलायझर मिसळण्यास सुरुवात केली आहे. तर इनऑरगॅनिक /फिजिकल सनस्क्रीनमध्ये प्रामुख्याने झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड असते. ते किती काळ टिकेल हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीनच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट पाहू शकता.
एकदा सनस्क्रीनची एक्स्पायरी डेट निघून गेल्यानंतर, ते अतिनील किरणांना अवरोधित करण्यात कमी प्रभावी होते, त्यामुळे सनबर्न आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त, थेट सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानामुळे सनस्क्रीन कालांतराने कमी प्रभावी होऊ शकते. उष्णता आणि सूर्य सनस्क्रीनमधील रसायने नष्ट करू शकतात आणि ते कुचकामी आणि त्वचेला त्रासदायक ठरू शकतात. सनस्क्रीन खराब झाले आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी, पॅकेजिंगवर स्टँप केलेली तारीख पहा. जर विशिष्ट एक्स्पायरी डेट दिलेली नसेल, तर तुम्ही FDA नुसार, त्याच्या उत्पादनाच्या तारखेपासून पुढील तीन वर्षे सनस्क्रीन चांगले आहे असे गृहीत धरू शकता. या तारखेनंतर न वापरलेले सनस्क्रीन टाकून द्या कारण ते यापुढे सनबर्न टाळण्यासाठी प्रभावी ठरणार नाही. दुसरे सूचक म्हणजे कोणतेही स्पष्ट बदल, जसे की त्याचा वास कसा येतो किंवा त्ते अधिक घट्ट किंवा पातळ झाले असल्यास त्यात बदल झाले आहेत हे स्पष्टपणे कळतेच. सनस्क्रीनचा वास खराब येऊ लागल्यास किंवा त्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये बदल झाल्यास ते टाकून द्या.
सनस्क्रीन स्टोर करण्याची पद्धत
सनस्क्रीन थंड,शक्यतोवर अंधाऱ्या ठिकाणी साठवले तर . कंटेनरला जास्त उएक्स्पायरी डेट पर्यंत टिकते. ते शक्यतोवर बंद कपाटात जिथे थेट सूर्यप्रकाश व उष्णता येणार नाही अशा ठिकाणी ठेवा. थेट सूर्यप्रकाशामुळे त्यातील घटक कमी प्रभावी होऊ शकतात. घराबाहेर असताना, तुम्ही बाटली टॉवेलमध्ये गुंडाळून किंवा सावलीत ठेवून सनस्क्रीनचे संरक्षण करू शकता. त्याचे झाकण नेहमी घट्ट लावून ठेवा. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात राहणार असाल तर तुम्ही सनस्क्रीन कूलरमध्ये ठेवू शकता. दुसरी कल्पना म्हणजे घरामध्येच सनस्क्रीन लावून बाहेर जाणे म्हणजे तुम्ही ते बाहेर उन्हात नेणे टाळू शकता.
सनस्क्रीन खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
तुमच्या त्वचेला वर्षभर सूर्यापासून संरक्षणाची गरज असते, त्यामुळे योग्य सनस्क्रीन खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.खालील टिप्स तुम्हाला योग्य प्रकारचे सनस्क्रीन निवडण्यास मदत करतील.
उत्पादनाची तारीख काळजीपूर्वक वाचा
सनस्क्रीन घेताना ते ताज्या स्टॉकमधून सनस्क्रीन निवडणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सनस्क्रीन जितके ताजे असेल तितकी त्याची कार्यक्षमता चांगली असेल.
SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन घ्या
UVA किरणांमुळे टॅनिंग आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या समस्या निर्माण होतात, तर UVB किरणांमुळे त्वचेच्या कर्करोगासारखी गंभीर स्थिती निर्माण होते. तुमच्या सनस्क्रीनवरील SPF क्रमांक तुम्हाला सांगतो की सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तुमची त्वचा लाल होण्यास किती वेळ लागेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या सनस्क्रीनमध्ये SPF 30 असेल, तर तुम्ही कोणतेही सनस्क्रीन लावले नसताना जितका वेळ लागेल त्यापेक्षा हे सनस्क्रीन लावल्यावर तुमची त्वचा जळण्यास 30 पट जास्त वेळ लागेल. त्यामुळे जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन खरेदी करणे योग्य आहे.
सनस्क्रीन स्प्रे वापरणे टाळा
सनस्क्रीन स्प्रे मुळे भरपूर प्रॉडक्ट वाया जाते आणि त्याच वेळी, ते श्वासाद्वारे आपल्या शरीरात जाण्याची शक्यता जास्त असते.
तुमची त्वचा तेलकट असल्यास वॉटर बेस्ड सनस्क्रीन निवडा
तेलकट, ऍक्ने प्रोन त्वचा असलेल्या सर्वांसाठी ही एक महत्वाची टीप आहे. तुमची त्वचा तेलकट असल्यामुळे तुम्ही सनस्क्रीन पूर्णपणे वगळू शकत नसले तरी, तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जास्त तेलकटपणा दूर ठेवण्यासाठी, ऑइल बेस्ड सनस्क्रीनऐवजी वॉटर बेस्ड सनस्क्रीन घ्या. वॉटर बेस्ड सनस्क्रीन हलके असते आणि त्यामुळे त्वचेवर मुरूम व पुरळ येणार नाही. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे.
अधिक वाचा – तुमच्या तेलकट चेहऱ्यावर घरगुती उपाय
सनस्क्रीन वापरण्यासाठी काही टिप्स
- दररोजच सनस्क्रीन लावले पाहिजे. आपण घरात की बाहेर, सनस्क्रीन लावणे हा आपल्या स्किनकेअर रुटीनचा नियमित भाग असला पाहिजे.
- सनस्क्रीन चेहऱ्यावर तसेच इतर भागांवर देखील लावावे. संपूर्ण चेहऱ्यावर, कानाच्या पाळ्यांना, मान, हात आणि पाय उघडे राहणार असतील तर पायांना देखील दररोज सनस्क्रीन लावले पाहिजे.
- अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी नेहमी SPF 30 असलेले सनस्क्रीन लावण्याची शिफारस करते, कारण हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे की सूर्यप्रकाशाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी हे पुरेसे संरक्षण आहे.
- आदर्शपणे, दर दोन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावावे, किंवा जर तुम्ही पोहत असाल किंवा खूप घाम येत असाल तर जास्तवेळा सनस्क्रीन लावले पाहिजे. सनस्क्रीन लावण्याची सर्वोत्तम वेळ तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी आहे.
- त्वचातज्ज्ञ मिनरल सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देतात. कारण खनिज सूत्रे संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी अधिक योग्य आहेत, कारण ते त्वचेला त्रास देत नाहीत.
- तुमचे कपडे देखील SPF म्हणून मोजले जाऊ शकतात. सूर्याच्या संरक्षणामध्ये फक्त सनस्क्रीन लावणे समाविष्ट नाही. खास करून उन्हाळ्यात सूर्य-संरक्षणात्मक कपडे, टोपी आणि सनग्लासेस वापरा.
- . तुमच्या ओठांना देखील संरक्षण आवश्यक आहे. लोक त्यांच्या ओठांचे संरक्षण करण्यास विसरतात आणि या भागात होणारा त्वचेचा कर्करोग विशेष धोकादायक असू शकतो. प्रत्येकाने SPF असलेले लिप बाम लावले पाहिजे.
सनस्क्रीनसंबंधी पडणारे काही प्रश्न- FAQ
प्र.सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्हाला 20 मिनिटे थांबण्याची गरज का आहे?
उ.अपेक्षित संरक्षणात्मक अडथळा निर्माण करण्यासाठी UV च्या संपर्कात येण्याच्या 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे. ते स्वच्छ आणि कोरड्या त्वचेवर उदारपणे आणि समान रीतीने लागू केले पाहिजे.
प्र.सनस्क्रीनचे नियम काय आहेत?
उ. सर्वसाधारणपणे, FDA शिफारस करतो की तुम्ही 15 किंवा त्याहून अधिक SPF सह ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा, अगदी ढगाळ दिवसांमध्येही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. त्वचेच्या दृश्य भागावर उदारपणे सनस्क्रीन लावा, विशेषत: तुमचे नाक, कान, मान, हात, पाय आणि ओठांनाही सनस्क्रीन लावले पाहिजे. परंतु ते तुमच्या तोंडात आणि डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. किमान दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा.
प्र. तुम्हाला दर 2 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावावे लागते का?
उ. तुम्हाला जर फार घाम येत नसेल आणि तुम्ही पाण्यात जाणार नसाल तसेच दिवसभर घराबाहेर राहणार नसाल तर दर दोन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावण्याची गरज नाही. उन्हात जास्त काळ राहायचे नसेल तर सकाळी लावलेले सनस्क्रीन दिवसाच्या शेवटीही पुरेसे संरक्षण देईल.
प्र. दररोज सनस्क्रीन खरोखर आवश्यक आहे का?
उ. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचा कर्करोग आणि त्वचा अकाली वृद्ध दिसण्याचा धोका वाढतो आणि आपण दररोजच या किरणांच्या संपर्कात येतो. कालांतराने, सूर्यप्रकाशामुळे होणारे हे नुकसान वाढू लागते. दररोज सनस्क्रीन वापरल्याने त्वचेचा कर्करोग आणि त्वचेतील बदलांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.
प्र. मी मॉइश्चरायझर सोडून केवळ सनस्क्रीन वापरू शकतो का?
उ. नाही, मॉइश्चरायझर वगळणे त्वचेसाठी फायदेशीर नाहो. मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते तर सनस्क्रीन त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते, त्यांची कार्ये भिन्न आहेत, म्हणून मॉइश्चरायझरनंतर सनस्क्रीन वापरणे अधिक फायदेशीर ठरेल.
सनस्क्रीन वापरणे ही दात घासणे, अंघोळ करणे यासारखी रोजची सवय असली पाहिजे. नियमितपणे सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे त्वचेच्या कर्करोगापासून तसेच अकाली वृद्ध होण्यापासून रक्षण होते. वातावरण कसेही असले तरी सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये.
अधिक वाचा – उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी