ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
importance-of-shravan-in-marathi

श्रावण महिन्याचे महत्व | Importance Of Shravan In Marathi

पावसाळा सुरू झाला की, अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. मराठी श्रावण महिना म्हटलं की, सर्व सणांचा राजा मानला जातो. श्रावण महिन्याचे महत्व आपल्याकडे अधिक आहे. श्रावण महिना हा कोणत्या ऋतूत येतो हे वेगळं सांगायची गरज नाही. पावसाळा ऋतूमध्ये येणारा हा श्रावण सण प्रत्येकाला हवाहवासा असतो. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन दिसून येते. अशा या मनाला ऊभारी आणणाऱ्या श्रावण महिन्याचे महत्व, श्रावण महिना मराठी माहिती या लेखातून आम्ही देत आहोत. यावर्षी मराठी कॅलेंडरप्रमाणे 29 जुलै, 2022 रोजी श्रावण सुरू होत असून 26 ऑगस्ट, 2022 रोजी श्रावण समाप्ती होईल. श्रावण महिन्यातील सण मात्र या संपूर्ण महिन्यात अगदी हौशीने साजरे केले जातात. श्रावण महिन्याच्या हार्दिंक शुभेच्छा तुम्हा सर्वांना देत जाणून घेऊया इतर माहिती.  

सणांचा राजा श्रावण

सणांचा राजा श्रावण
Shravan Paus

आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व आहे. चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे. आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरूवात करण्यात येते. यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन – पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो. श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात. कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात. विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहांसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते. श्रावण महिना (Shrawan 2022) म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना. महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी आमावस्येपर्यंत अनेक सण या महिन्यात असतात आणि त्यामुळे याला सणांचा राजा म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरत नाही. 

श्रावण महिन्याचे महत्त्व 

श्रावण महिन्याचे महत्व नक्की काय आहे (Importance of Shravan Month) असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर श्रावण सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांना महत्व आहे. भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असाही समज आहे. त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते असे समजण्यात येते. महादेवाची इत्यंभूत पूजाअर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं. तसंच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात असाही समज आहे. सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे, देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्ये केली आणि उपवास – साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे. 

श्रावण महिना का साजरा करण्यात येतो 

श्रावण महिना का साजरा करण्यात येतो
श्रावण महिना का साजरा करण्यात येतो 

श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की, प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असत आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असे. त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो. तसंच देवी पार्वती यांनी या महिन्यात युवावस्थेत असताना केवळ शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला आणि त्यांच्या या कठोर तपस्येला याच महिन्यात शंकर भगवान यांनी फळ दिले. या महिन्यात करण्यात आलेल्या तपस्येचे चांगले फळ मिळते असा समज असल्याने श्रावण महिना साजरा करण्यात येतो. 

ADVERTISEMENT

श्रावण महिन्यात येणारे सण

श्रावण महिन्यात येणारे सण
श्रावण महिन्यात येणारे सण

श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची एक यादीच करता येईल. मराठी महिना असणाऱ्या श्रावणात अनेक हिंदू सण साजरे करण्यात येतात. 

श्रावणी सोमवार – या महिन्याच्या सणाची सुरूवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार अर्थात शिवामूठीने. दर श्रावणी सोमवारी (Shravan Somvar) तीळ, तांदूळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते. नवविवाहित महिला श्रावणी सोमवाराचे हे व्रत पहिले पाच वर्ष करतात आणि काही महिला तर आयुष्यभर हे व्रत करतात. 

श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौर – त्यानंतर नवविवाहितांसाठी खास सण ठरतो तो म्हणजे मंगळवार. श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत करण्यात येते. पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवाष्णींना बोलावून हे व्रत पूजण्यात येते. पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचे असते. मंगळागौरीची पूजा, ओव्या, उखाणे, फुगडी, ओटी भरणे, रात्री जागरण करणे आणि पारंपरिक खेळ असे याचे मोठे स्वरूप असते. जेणेकरून सासर आणि माहेरच्या दोन्हीकडील प्रेम नवविवाहितेला मिळते. 

नागपंचमी – यानंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो, त्यामुळे नागदेवतेची यादिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते. यादिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली वा नांगरली जात नाही. तसंच वारूळ असेल तिथे जाऊन पूजा करण्याचीही गावागावात पद्धत आहे. 

ADVERTISEMENT

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन – यानंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात. कोळी समाजासाठी महत्त्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा सण जल्लोषात साजरा होतो. तर या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होडी पुन्हा समुद्रात सोडली जाते आणि मासेमारीला सुरूवात होते. तर भावाबहिणीचा खास सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाची माहिती आणि भावाबहिणीच्या नात्याची महती तर सर्वांनाच माहीत आहे. अगदी सामाजिक ऋणानुबंध जपण्याचा हा दिवस आहे. 

कृष्ण जन्माष्टमी आणि दहिकाला – या सणानंतर महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही तितक्याच उत्साहात साजरा करण्यात येतो. दहिकाल्याला आता उत्सवाचे आणि अगदी व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले असले तरीही हा सण जगभरात अगदी दणक्यात साजरा करण्यात येतो. 

पिठोरी अमावास्या – श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावास्या. लहान मुलांची तर या दिवशी चंगळ असते. तर यादिवशीच साजरा केला जाणारा पोळा म्हणजे शेतकऱ्याचा जीवाभावाचा मित्र असणाऱ्या बेलाच्या जोडीला दिली जाणारी विश्रांती. गावागावांमध्ये हा सण खूपच जोमात साजरा करण्यात येतो.  

भगवान शंकराला श्रावण का आहे प्रिय?

भगवान शंकराला श्रावण का आहे प्रिय?

श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकर देवाना कडक उपवास करून प्रसन्न केले होते. तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे असे समजण्यात येते. या काळादरम्यान शंकर देवाकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं. तसंच श्रावण महिन्यात शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्यामुळेच शिवभक्ती या काळात अधिक करण्यात येते. या महिन्यात शिवभक्त कावड घेऊन येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करतात. भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यात प्रसन्न होतात. तसंच हा महिना प्रिय असल्याने भक्तांचे सर्व त्रास भगवान शिव दूर करताना असाही आपल्याकडे समज आहे. 

ADVERTISEMENT

श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये

श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये
श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये

खरं तर श्रावणातील पावसाची विविध रूपे असतात आणि हेच श्रावणातील पावसाचे वैशिष्टय समजण्यात येते. श्रावण सुरू झाल्यावर पावसाची रिमझिम सुरू होते. त्याआधी आषाढात धो धो कोसळणारा पाऊस जरा सौम्य होतो. लहान मुलांना हा पाऊस अधिक आवडतो. तर कधी अचानक पाऊस वाऱ्यासह बरसतो. जो रोमँटिक जोड्यांना हवाहवासा असतो. याशिवाय कधीतरी मुसळधार पाऊसही पडतो. तर क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस हेदेखील श्रावणातील पावसाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अशा या पावसाळामुळे निसर्गातही अनेक बदल होतात आणि संपूर्ण सृष्टी हिरवीगार दिसू लागते. मात्र श्रावणातील पाऊस हा सहसा निसर्गाला हानी पोहचवले असा कधीही बरसत नाही. 

अधिक श्रावण

साधारण अनेक वर्षांच्या कालावधीनंतर अधिक श्रावण महिना येतो असे समजण्यात येते. मात्र शिवभक्तांसाठी हा अत्यंत मोठा उत्सव असतो. भक्तांसाठी शिवकृपा मिळविण्याचा आणि शिवभक्ती करण्याचा हा अधिक काळ असतो असं मानण्यात येते. 1985 मध्ये अधिक श्रावणमास होता त्यानंतर दहा वर्षाने अर्थात 2004 मध्ये आला तर त्यानंतर गेल्या 19 वर्षांपासून अधिक श्रावण महिना आलाच नाही, जो आता पुढच्या वर्षी अर्थात 2023 मध्ये अधिक श्रावण महिना येईल असे सांगण्यात येते आहे. श्रावण अधिक मासामध्ये दानधर्म, पुण्य मिळवणे, रूद्र याग, अतिरूद्र याग अशा अनेक गोष्टींनाही महत्त्व प्राप्त होते. यावेळी अधिक व्रतवैकल्ये आणि पूजाअर्चा करण्यात येते.

श्रावण महिन्यातील व्रते 

श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्ये करण्यात येतात. त्यापैकी तीन व्रते अधिक महत्त्वाची मानण्यात येतात. 

श्रावणी सोमवार – शिवामूठ वाहून शिवलिंगाची दर सोमवारी पूजा करण्यात येते आणि या दिवशी महिला आणि पुरूष दोघेही शिवाचा उपवास करतात. काही जण तर निर्जला उपवास अर्थात पाणीही न पिता शिवाची उपासना करण्याचा उपवास करतात. 

ADVERTISEMENT

मंगळागौर – आपल्या पतीला दीर्षायुष्य मिळावे आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी मंगळागौरीचे व्रत करण्यात येते. नवविवाहिता हे व्रत आपल्या पतीसह करते. त्याशिवाय ही पूजा पाच वर्ष करून या दिवशी काही महिला उपवास करतात. तर काही केवळ पूजा करतात आणि पाचव्या वर्षी या व्रताची सांगता करतात. भटजी बोलावून याची विधीवत पूजा करण्यात येते. 

श्रावणी शनिवार – सोमवारप्रमाणेच काही जण श्रावणातल्या शनिवारी उपवास ठेवतात आणि यादिवशी शनिदेवतेचे उपासक शनि मंदिरात जाऊन तीळाचे तेल वाहून आपल्यावर कधीही संकंटं येऊ नयेत यासाठी उपासना करतात. 

पौराणिक तथ्य

श्रावण महिन्याची काही पौराणिक तथ्यही सांगितली जातात. त्यापैकी आम्ही तुम्हाला काही तथ्य सांगत आहोत – 

  • मरकंडू ऋषीचे पुत्र मार्कंडेय याच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात त्यांनी शिवशंकराची घोर उपासना केली होती, ज्यामुळे त्यांना जी शक्ती प्राप्त झाली त्यापुढे यमराजही नतमस्तक झाले होते असा समज आहे
  • भगवान शंकर श्रावणात आपल्या सासरी येतात आणि तिथे त्यांचा अभिषेक होतो असाही समज आहे
  • पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे श्रावण महिन्यात समुद्र मंथन झाले होते. त्याचवेळी समुद्रातून निघालेले विष पिऊन शंकराने सृष्टीची रक्षा केली होती. त्यामुळेच शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे 
  • शिवपुराणातील उल्लेखाप्रमाणे भगवान शिव हे स्वयं जल असून शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास श्रावण महिन्यात फळाची प्राप्ती मिळते 
  • शास्त्रात सांगण्यात आल्याप्रमाणे भगवान विष्णू हे श्रावण महिन्यात योगनिद्रेत निघून जातात. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे उत्तरदायित्व यावेळी भगवान शिव करतात. त्यामुळे श्रावणात शिवशंकराला अधिक प्राधान्य देण्यात येते 

प्रश्नोत्तरे (FAQs)

प्रश्न – श्रावण हा महिना कोणत्या ऋतूत येतो?
उत्तर – श्रावण महिना पावसाळा ऋतूमध्ये येतो. हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो आणि म्हणूनच या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. 

ADVERTISEMENT

प्रश्न – श्रावणातील शनिवारला काय म्हणतात?
उत्तर – श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनिपीडेचा त्रास होऊ नये म्हणून श्रावणी शनिवार हे व्रत केले जाते. श्रावण महिन्यातील शनिवाराला संपत शनिवार असेही म्हणतात. तसेच श्रावणी शनिवारी अश्वत्थाची आणि नृसिंहाची पूजा करण्याचीही काही ठिकाणी प्रथा आहे. 

प्रश्न – श्रावणात काय खावे?
उत्तर – श्रावण महिना हा सहसा पावसाळी भाज्या खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या महिन्यात चांगल्या आणि पौष्टिक अशा हिरव्या पालेभाज्या मिळतात, ज्याने आरोग्याला फायदा मिळतो. त्यामुळे अशा भाज्यांचा आस्वाद अधिक घ्यावा. सहसा या काळात मांसाहार करण्यात येत नाही.  

निष्कर्ष – श्रावण महिन्याचे महत्व हे धार्मिक, पौराणिक आणि आरोग्यदृष्ट्याही अधिक मानण्यात येते. श्रावण महिना मराठी माहिती आम्ही या लेखातून तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. श्रावण हा पावसाळा ऋतूमध्ये येणारा महिना आहे आणि निसर्गातही यावेळी अत्यंत उत्साह असतो. सणांचा राजा म्हणून श्रावण ओळखण्यात येतो आणि हा आल्हाददायक श्रावण सगळ्यांना हवाहवासा वाटतो. 

08 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT