आषाढ महिना सुरु झाला की, अनेक सणांना सुरुवात होते. मागोमाग श्रावण येतचं असतो. आषाढ महिन्याचे महत्व हे आपण जाणतोच. या शिवाय श्रावण महिन्याची माहितीही अनेकांना असेल. हिंदू धर्मासाठी हा अत्यंत धार्मिक असा महिना आहे. या काळात अनेक सण येतात. जसे की, नागपंचमी, मंगळागौर, गणेशोत्सव असे विविध सण येतात. या काळात अनेक उपवासाचे पदार्थ तयार केले जातात. पण साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची पांढरी भाजी, बटाट्याचा किस असे काही करण्यापेक्षा थोडे चटपटीत आणि वेगळे काहीतरी खायचे असेल तर तुम्ही अशा काही मस्त रेसिपी बनवू शकता.
क्रिस्पी बटाटा पॅनकेक
खूप जणांना उपवसाच्या दिवशी काहीही करण्याची अजिबात इच्छा नसते. अशावेळी झटपट आणि पोटाची भूक भागवणारे असे काहीतरी खायचे असेल तर तुम्हाला असे जाळीदार पॅनकेक करता येतात. त्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागत नाही.
साहित्य:
सोललेला कच्चा बटाटा, किसणी, मीठ, तेल किंवा तूप
कृती :
- एका नॉनस्टिक पॅनवर तेल किंवा तूप गरम करुन ते गरम झाले की, आच थोडी कमी करुन त्यावर बटाटा किसायला घ्या.बटाटा किसताना तो एकावर एक थर नाही तर पॅन गोलाकार दिशेला भरेल इतके किसायचे आहे.
- बटाटा एका बाजूने चांगला शिजला की, मग त्यावर थोडे मीठ भुरभुरुन त्यानंतर तो दुसऱ्या बाजूने क्रिस्पी भाजायला ठेवायचा आहे. बटाटा कुरकुरीत घावण सारखा झाला त्यानंतर तो तुम्हाला दहीसोबत मस्त खाता येईल.
साबुदाण्याचे थालिपीठ
साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही मस्त साबुदाण्याचे थालिपीठ देखील खाऊ शकता. साबुदाण्याचे थालिपीठही मस्त कुरकुरीत लागते.
साहित्य:
१ वाटी साबुदाणा, २ मिरच्या, जीरं, शेंगदाण्याचा कूट, तूप, उकडलेला बटाटा, मीठ
कृती:
- मिक्सरच्या एका भांड्यातत कच्चा साबुदाणा घेऊन त्याची पूड करुन घ्या. ही पूड एका वाडग्यात काढून घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, वाटलेल्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट घालून सगळे एकजीव करा. चवीनुसार मीठ घाला. आता गोळा तयार करुन त्याचे थालिपीठ थापा.
- इतर कोणत्याही थालिपीठाप्रमाणे ते छान मस्त कुरकुरीत भाजा. उपवासाचे मस्त थालिपीठ तयार
उपवासाचा डोसा
नेमकं उपवासाच्या दिवशीच आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी खाण्याची इच्छा होऊ लागते. अशावेळी जर मस्त कुरकुरीत असा डोसा खायची इच्छा झाली असेल तर तुम्हाला असा मस्त उपवासाचा डोसा करता येईल.
साहित्य:
साबुदाणा पीठ, राजगिऱ्याचे पीठ, हिरव्या मिरच्या, जीरे,
कृती :
- हिरवी मिरची, जीरे याची एक पेस्ट करुन घ्या. एका भांड्यात साबुदाणा पीठ, राजगिऱ्याचे पीठ एकत्र करुन त्यात हिरवी मिरची आणि जिरे पेस्ट घाला.
- एकत्र करा. त्यात डोसा काढता येईल एवढे पाणी घालून तुम्ही मस्त नॉन स्टिक पॅनवर कुरकुरीत असे डोसे काढा.
- उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही याचा आस्वाद घ्या.
आता उपवासाच्या दिवशी या रेसिपी ट्राय करा आणि तुमचा उपवास मस्त टेस्टी करा.
अधिक वाचा : चहा चांगला होत नाही, मग ट्राय करा या चहाच्या फक्कड रेसिपी