ADVERTISEMENT
home / मनोरंजन
2018 मधले दर्जेदार मराठी चित्रपट – जाणून घ्या कोणते चित्रपट ठरले अप्रतिम

2018 मधले दर्जेदार मराठी चित्रपट – जाणून घ्या कोणते चित्रपट ठरले अप्रतिम

2018 या वर्षात प्रेक्षकांना मराठी चित्रपटांची मेजवानी मिळाली आहे. एकापेक्षा एक मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनतात तेव्हा चित्रपटसृष्टीचा दर्जा उंचावत जातो. आता आम्ही तुम्हाला असेच 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या निवडक चित्रपटांची यादी देत आहोत. तुम्ही जर हे चित्रपट पाहिले नसतील तर नक्कीच पहा…

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

जेव्हा तो रंगमंचावर यायचा तेव्हा त्याच्या एंट्रीलाच टाळ्यांच्या कडकडात अवघं नाट्यगृह दणाणून जायचं. ज्यांच्या नावावर तिकीट बुथवर हाऊसफुल्लचा बोर्ड लागायचा. ज्यांचे नाव प्रत्येक मराठी रसिकांच्या ओठांवर रुळलं होतं. असाच मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार म्हणजे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर.  रुपेरी पडद्यावर सुबोध भावेच्या रुपात डॉ. काशिनाथ घाणेकर जेव्हा रुपेरी पडद्यावर अवतरले तेव्हा मराठी रसिकांनी परत एकदा त्यांना डोक्यावर घेतलं.

 

ADVERTISEMENT

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीच्या इतिहासातलं ते सोनेरी पान आहे. त्यांनी कलाक्षेत्रात दिलेलं योगदान हे खरंच अनन्यसाधारण आहे. हेच ओळखून वायकॉम 18 ने आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा चित्रपट बनवला. या चित्रपटात 1960 च्या दशकातल्या नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या आयुष्यातला चढता काळ आणि उतरता काळ पडद्यावर मांडलाय. चित्रपटात प्रत्येक कलाकाराने जीव ओतून त्यांच्या वाटेला आलेल्या सगळ्या भूमिका जिवंत केल्या आहेत. हेच या सिनेमाचं यश आहे. एकूणच काय तर साठच्या दशकात डॉ. काशीनाथ घाणेकरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं… 21व्या शतकातही त्यांची जादू कमी झाली नाही. उलट नव्या पिढीपर्यंत हा ठेवा पोहचता झाला, असचं म्हणावं लागेल.

मुळशी पॅटर्न

लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा आजपर्यंत हाताळल्या गेलेल्या गुन्हेगारी विश्वातल्या इतर चित्रपटांच्या पॅटर्न पेक्षा नक्कीच वेगळा आहे. विनाशावर उभा राहिलेला विकास आपल्याला काय वर्तमान दाखवतो हे पाहायचं असेल तर मुळशी पॅटर्न नक्की पहा.

वडिलोपार्जित सोन्यासारख्या जमिनी विकून, मिळालेला पैसा संपल्यावर 7 पिढ्या श्रीमंती उपभोगलेले शेतकरी जेव्हा शहरातल्या झोपडपट्टीच्या वळचळणीला राहायला येतात तेव्हा त्यांची झालेली दुर्दशा… त्याच्या पुढच्या पिढीलाही शिक्षण आणि योग्य मार्गदर्शना अभावी सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात आणि गुन्हेगारीची सोपी वाट त्यांना आपली वाटते. बाप काही करु शकत नाही, तो नाकर्ता आहे हे शल्य त्याच्या मुलाला बोचत राहतं त्यातूनच मी बापापेक्षा किती पटीनं धैर्यवान, ताकदवान आणि हिंमतवाला आहे हे दाखवताना त्याची कार दुरावस्ता होते, हेच सत्य तुम्हाला मुळशी पॅटर्नमधून पाहायला मिळेल. यात प्रत्येक कलाकाराने अप्रतिम काम केलं. मुळशी पॅटर्नमधलं प्रत्येक पात्र हे समाजातल्या प्रत्येक घटकाचे प्रतिनिधीत्व करतो. दिग्दर्शक आणि लेखकाने विकासाचं झणझणीत अंजन प्रेक्षकांच्या डोळ्यात भरलं आहे.

ADVERTISEMENT

नाळ

नागराज मंजुळे यांचं नाव ज्या चित्रपटात येतं तो चित्रपट हा ग्रामीण पार्श्वभूमी असलेला आपल्या मातीतला चित्रपट असतो असं समीकरणचं झालंय.  सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ हा चित्रपटही असाच आहे. नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, सेवा चव्हाण, ओम भूतकर आणि श्रीनिवास पोकळे यांच्या भूमिकांनी नटलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहतो. यात बाल कलाकार असलेल्या श्रीनिवास पोकळेने तर प्रेक्षकांच्या मनावर मोहिनीच घातली आहे असं म्हणावं लागेल.

वाचा मूव्हीज ब्रेकअप नंतर पाहण्यासाठी

नाळ हा चित्रपट अर्थातच टिपिकल ‘फिल्मी’  कॅटेगरीत बसत नाही. हा चित्रपट म्हणजे एका लहान मुलाचं भावविश्वच आहे. आई आणि 8 वर्षांचा चैतन्यची ही गोष्ट आहे. त्या दोघांमधला भावबंध अलगद उलगडणारी गोष्ट फक्त चैतन्यची राहात नाही तर लहानांसोबत मोठेही या गोष्टीत गुंततात. त्याच्या भावविश्वात हरवून जातात. लेखक-दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी एक अतिशय सुंदरपद्धतीत हा चित्रपट आपल्यापुढं सादर केला आहे. मुळात याची गोष्टच खुप सशक्त आहे, त्यातली ग्रामीण बोली भाषा, पार्श्वसंगीत, नयनरम्य दृष्य याच्या जोरावर पडद्यावर प्रभावी ठरतो.

ADVERTISEMENT

गुलाबजाम

गुलाबजामची कथाही छान जमून आली आहे. आदित्य लंडनमध्ये नोकरी करत असतो. पण नोकरीऐवजी लंडनमध्ये मराठमोळ रेस्तराँकाढण्याचं अदित्यचं स्वप्नं असतं. त्यामुळे अगदी एअरपोर्टवरुन लंडनची फ्लाईट पकडण्याऐवजी तो पुण्याचा रस्ता पकडतो. त्याच्या मित्रासोबत त्याची बॅचलर लाईफ सुरु होते. अदित्य एका चांगल्या गुरुच्या शोधात असतो आणि एकदा मित्राच्या डब्यातला गुलाबजाम खाल्ल्यावर त्याचा शोध संपतो.

त्याला राधा सापडते पण ती त्याला भेटायला तयार नसते. शिकवायलाही नाही. खडूस राधा कशीबशी शिकवायला तयार होते तेव्हा अदित्यला तिचा भूतकाळ आणि तिच्या तुसडेपणाची कारणं सापडतात. तो तिला सगळ्यावर कशाप्रकारे मात करायला शिकवतो. त्याचबरोबर त्याच्या आयुष्यातलं ध्येय तो कसं साध्य करतो. काळाचा हिशेब जेव्हा चुकतो तेव्हा खरं जगण राहून जातं… ते जगण शिकवणारा हा टेस्टी गुलाबजाम एकदा तरी पाहायला हवा.

सविता दामोदर परांजपे

ADVERTISEMENT

मराठी प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळंवेगळ्या विषयांवर चित्रपट पाहायला आवडतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी निर्माते-दिग्दर्शकही काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. हीच मेख ओळखून बॉलिवूडमध्ये अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात स्वतःची मोहर उमटवलेल्या जॉन अब्राहमची पावलं मराठीकडे वळली आणि सविता दामोदर परांजपे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात त्याने पदार्पण केलं. आणि  दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांच्या कलेचा वारसा लाभलेली त्यांची मुलगी तृप्ती, हिने या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 80च्या दशकात ‘सविता दामोदर परांजपे’ हे थ्रिलर नाटक प्रेक्षकांनी उचलून धरलं होतं. आजच्या पिढीतल्या प्रेक्षकांना तो थ्रिल अनुभवता यावा म्हणून दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी ‘सविता दामोदर परांजपे’ यांना चिटपट बनवण्याचं शिवधनुष्य पेललं.

ही कथा आहे ती लेखक शरद आणि त्याची आर्किटेक्ट बायको कुसुम अभ्यंकर यांची. एका सुखी कुटुंबात अचानक काही विचित्र घटना घडू लागतात. त्याची बायको सतत आजारी असते पण या आजाराचं निदान होत नसतं. मग शरद ज्योतिषाची मदत घ्यायची असं ठरवतो. त्यानंतर सत्य समोर येतं की कुसूमला सविता दामोदर परांजपेने झपाटलं आहे. मग सुरु होतो थरार-भय यांचा खेळ. या चित्रपटात प्रत्येकानेच प्रामाणिकपणे काम केलं आहे.

फर्जंद

अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महारांजांच्या दरबारात एकापेक्षा एक हिऱ्यासारखे मावळे होते. महाराजांचा कुठलाच शब्द खाली पडू देत नव्हते. त्यांनी पाहिलेली स्वप्नं प्रत्येक मावळा जगत होता. फर्जंद हाही असाच मावळा… पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर कशी यशस्वी चढाई केली होती? याचा रोमांचकारी इतिहास ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आला. इतिहास प्रेमींसाठी हा चित्रपट पर्वणीच ठरला.

ADVERTISEMENT

या चित्रपटाचं मध्यवर्ती भूमिका साकारणारा कोंडाजी फर्जंद म्हणजेच अंकित मोहनचं काम अफलातून झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमावर आधारलेला ‘कोंडाजी फर्जंद’ प्रेक्षकांना अक्षरशः उचलून घेतला. बऱ्याच शहरांमध्ये तर प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे ‘फर्जंद’चे शोज् वाढवले गेले. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर व समीक्षकांनीही ‘फर्जंद’ला पसंतीची पावती दिली. फर्जंदमध्ये महारांजांची रणनीती आणि त्यांच्या शिलेदारांचा गनिमी कावा या सगळ्या गोष्टी अचूकपणे दाखवल्या आहेत. जबरदस्त अॅक्शन सीन, ताल धरायला लावणारं संगीत, व्हीएफक्स (थोडं कमी पडलं असलं तरी)  अशा अनेक गोष्टी फर्जंदच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत.

सायकल

खरंतर एक सायकल आणि तिच्याभोवती फिरणारे कथानक घेऊन दोन तासांचा चित्रपट बनविणे खरे तर कठीण बाब. परंतु दिग्दर्शक प्रकाश कुंटेने अप्रतिमरित्या हे संपूर्ण कथानक सायकलभोवती गुंफले. एकोणिसाव्या शतकातील काळ या चित्रपटात दाखवला आहे. त्यावेळचे माणसांचे स्वभाव… त्यांच्यामध्ये असलेली आपुलकी आणि प्रेम हे सगळं खूप सहजरित्या दाखवण्यात आलं. कथा साधी सोपी होती म्हणूनच ती प्रेक्षकांपर्यंत भिडली. त्यात ऋषिकेश जोशी, मैथिली पटवर्धन, मनोज कोल्हटकर, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, दीप्ती लेले, विद्याधर जोशी या कलाकारांनी छान अभिनय केला.

केशवचे सायकलवर असलेले प्रेम, ती चोरीला गेल्यानंतर होणारी त्याची अवस्था… दिग्दर्शकाने या सगळ्या गोष्टी छान टिपल्या आहेत. केशव हा सरळ आणि साध्या स्वभावाचा माणूस. केशवच्या आजोबांना एका इंग्रज अधिकाऱ्याने सुंदर अशी सायकल भेट म्हणून दिलेली असते. त्याचे आजोबा ती सायकल आपल्या मुलाला न देता नातवाला म्हणजेच केशवला भेट देतात. केशव या सायकलवरून नेहमीच गावची रपेट करत असतो. त्याचे या सायकलवर खूप प्रेम जडलेले असते. अगदी जीवाच्या पलीकडे जाऊन तो सायकलला जपत असतो. आणि एकदा ही सायकल चोरीला जाते. त्यानंतर जे काही चित्रपटात घडतं ते कमाल आहे.

ADVERTISEMENT

आम्ही दोघी

‘आम्ही दोघी’या चित्रपटामधील भावनांचं नाट्य म्हणजे जगण्याची गोष्ट आहे. सावी आणि अम्मी या दोघींची ही कथा. दोघीही परस्परविरोधी स्वभावाच्या, मात्र केवळ नशीबानं या दोघींची गाठ पडलेली असते. पण म्हणून आपण ही गोष्ट या दोघींचीच आहे असं म्हणू शकतं नाही ती गोष्ट फक्त या दोघींचीच नाही तर बापलेकीतली, पती-पत्नी, आई- मुलगी आणि प्रेयसी-प्रियकर अशा बऱ्याच नातेसंबंधांवर हा चित्रपट भाष्य करतो.

या चित्रपटाची सकारात्मक बाजू अशी की तो शेवटपर्यंत कथेशी जोडून राहतो. मध्यांतरानंतर काही काळासाठी अमला जरी दिसेनाशी झाली तरी त्यावेळेत सावित्रीच्या प्रेमकथेचे विविध पैलू पाहायला मिळतात आणि इथेसुद्धा पुन्हा एकदा स्वतंत्र विचारांची, प्रेमसंबंधात असूनही स्वत:चं वेगळेपण जपणारी सावी अधोरेखित होते. आजच्या तरुणींना त्यांच्या नात्यांमध्ये जे संबंध अपेक्षित असतात त्यांच्या जवळ जाणारी ही कथा आहे. त्यामुळे संवेदनशीलरित्या कथेशी जोडून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो.

आपला मानूस

ADVERTISEMENT

अभिनेता अजय देवगण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार हे कळल्यापासून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अजय देवगणने ‘आपला मानूस’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतल्या निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा साहजिकच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या आणि हा संस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहून त्या पूर्णही झाल्या असंच म्हणावं लागेल. विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकावर हा सिनेमा आधारित आहे.

एकत्र राहूनही एकमेकांमधला संवाद कमी होतो तेव्हा नाती कोरडी होऊ लागतात यावरच हा सिनेमा बेतला आहे. राहुल आणि भक्ती हे जोडपं आयुष्याचा वाढत जाणारा वेग आणि गरजा यांच्याशी झुंज असतानाच, सोबत राहणाऱ्या राहुलच्या बाबांसोबत शक्य तितकं तेवढे जुळवून घेण्याच्या प्रयत्न करत असतात. राहुल हा वकील असतो तर भक्तीही कॉलेजमध्ये शिक्षिका असते. आजकालची पिढी ही करिअरलाच प्राधान्य देत असल्यामुळे घराकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही. हे सगळं जाणीवपूर्वक असं काही नसतं पण या स्पर्धात्मक युगात टिकाव करण्यासाठी ते गरजेचं असतं. अर्थातच जुन्या पिढीला या गोष्टी उमजून घेण्यास वेळ लागतो, पण आजकालच्या पिढीकडे वेळ कुठे असतो. यातूनच वाद- प्रतिवाद आणि सूडाचा खेळ सुरू होतो .

न्यूड

‘न्यूड’ हा मराठी चित्रपट म्हणजे तथाकथित दांभिक संस्कृती रक्षकांना दिलेलं चोख उत्तर आहे. हा चित्रपट अशाच तथाकथित संस्कृती रक्षकांच्या मेहेरबानीमुळे कचाट्यात सापडला होता खरा… खरं तर या सगळ्याची काहीच गरज नव्हती हे या चित्रपट पाहिल्यानंतर कळतं. कारण चित्रकलेचं शिक्षण घेताना नग्न देहाचं रेखाटन हा एक विषयच असतो आणि त्याचं शिक्षण समोर एक नग्न मानवी देह बसवूनच दिलं जातं मग ते शरीर पुरुषाचं असो किंवा स्त्रीचं… चित्र रेखाटताना विद्यार्थ्यांची कसोटी असते खरी, मनावर ताबा ठेवण्याची.

ADVERTISEMENT

परिस्थितीमुळे चित्रशाळेत न्यूड मॉडेल म्हणून जाणाऱ्या चंद्राक्का आणि यमुना यांची ही कथा आहे. आपल्या मुलाला लहान्यालाही चित्रकलेची आवड आहे हे कळल्यावर, यमुना त्याला औरंगाबादला कलाशिक्षण घ्यायला पाठवते.  या चित्रपटात यमुनाच्या तोंडी एक वाक्य येतं, ती चंद्राक्काला म्हणते- याला जर कलेचं मर्म कळलं, तर मी काय करते ते ठाऊक झाल्यावरही हा माझ्या पायावर डोकं ठेवून माझी पूजा करेल. पण त्याला ते नाहीच उमगलं तर..? खरचं माणसाच्या मनाचं ‘उघडं’ सत्य सगळ्यांसमोर येतं.

मुंबई पुणे मुंबई 3

मराठीच काय पण हिंदीतही मूळ कथेला धरुन तिसऱ्या भागाचा चित्रपट अजून आला नाही. पण मुंबई पुणे मुंबई याला अपवाद आहे. बरोब्बर आठ वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट प्रदर्शित केला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. नंतर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 ला मुंबई पुणे मुंबई 2 प्रदर्शित झाला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. प्रेक्षकांनी तुफान प्रेम केलं या चित्रपटावर आणि म्हणूनच दिग्दर्शक सतीश राजवाडे हे ‘मुंबई पुणे मुंबई- ३’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. याचा प्रोमो बघूनच प्रेक्षकांना कधी एकदा हा चित्रपट पाहतोय असं वाटू लागलं.

मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटातले गौरी आणि गौतम आता आई बाबा होणार याची तर चाहूल प्रत्येकालाच लागली आहे… त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडते हे पाहण्याची उत्कंठा सिनेरसिकांना लागून राहिली आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीची प्रमुख भुमिका असलेल्या या चित्रपटाशी घट्ट जोडल्या गेलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई ३’मध्ये  आणखीही दिग्गज कलाकार जोडले गेले आहेत. रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे.

ADVERTISEMENT

सौजन्य – YouTube

 

20 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT