एप्रिल महिन्यातच इतकं उकडायला लागलं आहे की, अंगाची लाही लाही व्हायला लागली आहे. बाहेरुन आल्यानंतर तहान लागते म्हणून अनेक जण फ्रिजमधील थंडगार पाणी गटागटा पित तहान भागवतात. पण फ्रिजमधील थंडगार पाणी तुमची तात्पुरती तहान भागवू शकते. पण तुम्हाला हवा असलेला थंडावा देऊ शकत नाही. म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत 5 अशी थंडपेयं शेअर करणार आहोत जी तुम्हाला या जीवघेण्या उन्हाळ्यात ठेवतील थंड
-
कोकम सरबत
कोकणातील प्रत्येक घरात तुम्हाला कोकम सरबत मिळणारच. हल्ली बाजारात रेडी टू मेक कोकम सरबत मिळते ज्यात तुम्हाला नुसते पाणी घालायचे असते. तुम्ही कधीही आणि कुठेही असे कोकम सरबत पिऊ शकता. यामुळे तुमची तहान तर भागतेच. शिवाय उन्हाळ्यात तुम्हाला उन्हाळे लागण्याचा त्रास (अर्धवट लघवीला होण्याचा त्रास) होत असेल तर तुमच्यासाठी कोकम सरबत अगदीच मस्त आहे.
आता या सरबतासाठी लागणारे रातांबे कोकणाशिवाय मिळत नाहीत. शिवाय त्याचा अर्क बनवणे फार कठीण असते त्यामुळे तुम्ही बाजारात मिळणारा रेडिमेड ज्युस चा अर्क आणून त्यात छान पाणी घालून हे सरबत प्या आणि घरी आलेल्या पाहुण्यांनाही द्या.
उन्हाळ्यात ही 5 फळे ठेवतील तुम्हाला हायड्रेट
-
पानक
आम्ही एका कारवारी फूड फेस्टिव्हलला गेलो होतो.त्यावेळी आम्ही हा प्रकार प्यायलो. एक घोट घेतल्यानंतर आम्ही हे तर पन्ह असे म्हटले. त्यावर तेथील कारवारी महिला म्हणाली हे पन्ह नाही तर पानक आहे. आमच्या कारवारी लोकांची स्पेशालिटी. तर यात कैरी नसते तर हा लिंबाचाच रस असतो. फक्त तो वेगळ्या पद्धतीने बनवण्यात येतो.
तुम्हाला काय लागेल ?
लिंबाचा रस, गूळ, आलं , काळीमिरी आणि पांढरी मिरी आणि वेलची पावडर
कसे कराल पानक ?
तुम्ही साधारण चार ग्लास पानक तयार करत असाल तर तुम्हाला साऱ्या गोष्टी तुमच्या चवीनुसार घ्यायच्या आहेत. पाण्यात किसलेले गूळ घाला. ते विरघळल्यानंतर त्यात वेलची पूड, किसलेलं आलं, काळीमिरी आणि पांढरीमिरी किंचिंत घालून मिश्रण एकजीव करा. फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा आणि प्या थंडगार कारवारी स्पेशल पानक
-
कैरी पन्हे
कैरीचं पन्ह ही उन्हाळ्याची खासियत आहे. बाजारात कैरी आल्यानंतर त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यापैकीच एक आहे ‘पन्ह’. कैरीच्या पन्हाचे खूपच चांगले फायदे आहेत कैरीचे पन्हे प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. आंबट असल्यामुळे यामध्ये व्हिटॅमिन c भरपूर असते जे तुम्हाला उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
कसे तयार कराल पन्ह?
कैरी उकडून घ्या. त्याची साल काढून ती स्मॅश करुन घ्यायची. कैरीच्या गरात गूळ आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करावे यात खूप पाणी घालू नका. तुम्ही तयार चटणी पाहुणे आल्यानंतर थंड पाण्यात घालून थंडगार पन्हे तयार करु शकता. फ्रिजमध्ये पन्हे 15 ते 20 दिवस राहते.
फ्रिजचं थंड पाणी पिताय मग सावधान, तुम्हाला होऊ शकतो हा त्रास
-
शिकंजी
उन्हाळ्यात तुम्हाला गारेगार ठेवणारा आणखी एक प्रकार म्हणजे शिकंजी. आता शिकंजी घरच्या घरी बनवणे अगदीच शक्य आहे. पण यासाठी थोडी तयारी करावी लागेल म्हणजे शॉर्टकट घेऊन चालणार नाही. शिकंजीमधील पाचक पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या पोटाला आराम देतात.
कशी तयार कराल शिकंजी ?
शिकंजीसाठी तुम्हाला लागेल लिंबू, आलं, साखर आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड इतके साहित्य लागेल. आता तुम्हाला सगळ्यात आधी आलं किसून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. एका भांड्यात पाणी घेऊन तुम्हाला त्यात लिंबाचा आणि आल्याचा रस एकत्र करायचा आहे.(आल्याचा अगदी अर्धाच तुकडा घ्या.) त्यात साखर किंवा मध घ्यायची आहे. वरुन जिऱ्याची पावडर भुरभुरायची आहे.
कच्च्या कैरीपासून बनवा या मस्त रेसिपीज
-
आवळा सरबत
उन्हाळ्यात आणखी एक पेय तुम्हाला थंड ठेवू शकते ते म्हणजे आवळा सरबत. नुसता साखरेत मुरवलेला आवळा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आवळा सरबत आणून पिऊ शकता. आवळ्यामध्ये देखील भरपूर व्हिटॅमिन c असते. पण तुम्हाला शक्य असेल तर आवळा सरबताचा अर्क तुम्ही विकत आणू शकता.
(सौजन्य- Instagram,shutterstock)