शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुट्ट्या आता सुरु झाल्या आहेत. या दोन महिन्यात मुलं इतकी मजा मस्ती करतात की, ते पाहून नक्कीच आपल्याला आपले बालपणीचे दिवस आठवतात.विशेषत: खाऊच्या बाबतीत. कारण भाजीपोळीच्या डब्यापासून या काळात थोडे स्वातंत्र्य मिळते आणि वेगवेगळा खाऊ चाखण्याची संधी मिळते. आज आपण असेच काही खाऊचे प्रकार पाहणार पाहोत जे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुम्हीही हमखास खाल्ले असतील. मग करायची का सुरुवात….
उन्हाळ्यात ही 5 थंडपेय तुम्हाला ठेवतील सुपर कूल
-
पेप्सीकोला (Pepsi cola)
साधारण एक रुपयाला मिळणारा पेप्सीकोला खूप जणांनाी आतापर्यंत चाखला असेल. पेप्सीकोला खाऊ नकोस त्यात कसले पाणी वापरले असेल माहीत नाही, असे आईने कितीही बजावले तरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळणारा पेप्सीकोला सगळ्यांनी चाखला असेल. तसं पाहायला गेलं तर बर्फाच्या गोळ्याचाच हा एक प्रकार असे आपण म्हणायला हवे. यात काला खट्टा,ऑरेंज,रोझ असे फ्लेवर मिळायचे आणि यात आणखी एक पेप्सीकोला असायचा तो दुधाचा.. पांढराशुभ्र पेप्सीकोला मस्त लागायचा. आताही अनेक ठिकाणी पेप्सी मिळतो. त्याचा आकार आणि त्याची पॅकिंग बदलली असली. तर उन्हाळ्यातील सुट्टीचा हा बेस्ट खाऊ होता.
-
ओली बडिशेप (Badishep)
शाळांच्या बाहेर चिंचा- बोर विकायला बसणाऱ्यांकडे हा पदार्थ नक्कीच असतो. बडिशेप इतरवेळी आपण फक्त जेवणानंतर मुखवास म्हणून खाल्ली असतील पण झाडावरुन काढलेली ओली बडिशेप म्हणजे वेगळीच मजा असायची. चिंच- बोरं आणि कैरीपेक्षाही ही गोष्ट महाग असायची. लहानपणी कितीवेळी ती बडिशेप दुडकत दुडकत खाल्ली आहे आठवतयं का तुम्हाला? अजूनही शाळांबाहेर अशाप्रकारची ओली हिरवीगार बडिशेप नक्कीच दिसते. जर तुम्ही अजूनही खाल्ली नसेल तर शाळांबाहेर असणारी ती गाडी शोधा आणि ओल्या बडिशेपचा आस्वाद घ्या. सोबत तेथे मिळणाऱ्या चिंचा- बोरं, कैरी हे देखील खाऊन बघा. आणि हो तो खाऊन तुमचा फोटो काढायला विसरु नका.
उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर करा या रेसिपी
-
जिरा बिस्किट (Jeera biscuits)
जिऱ्याची बिस्किट आताही मिळतात. पण त्यावेळी लहान लहान आकारांची जिऱ्याची बिस्किट मिळायची. कुत्र्याची बिस्किट असे त्याला त्यावेळी म्हटले जायचे. पंचकोनी लहान लहान आकाराची ही बिस्कीटे मस्त खिसा भरुन खेळता खेळता खाता यायची. खिश्यात ही बिस्किट भरपूर भरायची आणि खेळायला जायचे. मुली या जिरा बिस्किट घेऊन भांडीकुंडी खेळायला मजा यायची. आताही ही जिरा बिस्किट फार मिळत नाही. पण जर तुमच्या आजुबाजूला जुन्या बेकरी असतील तर तुम्हाला ही बिस्किट कदाचित मिळू शकतील.
-
चिंचेच्या गोळ्या (Tamarind pops)
साखरेत घोळवलेली आंबट गोड चिंच अजूनही मिळते. फक्त आता त्यांचे वेगळे स्वरुप पाहायला मिळते. पण पूर्वी काचेच्या बरणीत या चिंचेच्या गोळ्या ठेवलेल्या असायच्या. पेपरमध्ये या गोळ्या बांधून दिल्या जायच्या. त्यावेळी दोन रुपये जरी कोणी हातावर टेकवले तरी यात भरपूर गोळ्या यायच्या या गोळ्या मस्त लागायच्या.
तुमचा जन्म 90च्या दशकातील असेल तर तुम्हाला या जुन्या मालिका माहीतच असतील
-
कुल्फी (Kulfi)
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणानंतरचा ठरलेला गोड आणि थंड पदार्थ असायचा तो म्हणजे कुल्फी. त्या कुल्फीची चव कोणत्याही कुल्फीला नाही. असे आमचे मत आहे. त्यावेळी 1 रुपया आणि 2 रुपयाला ही कुल्फी मिळायची. कुल्फीवाला भैया कुल्फी कुल्फी करत गल्लोगल्ली फिरायचा. तो आला की, सगळ्या लहानमुलांचा गराडा त्याच्याभोवती असायचा तो. त्याच्या गोल मोठ्य़ा भांड्यात हात घालायचा आणि त्यातून कुल्फी काढायचा झाकणावरचा काळा रबर काढून त्यात काढी घालून कुल्फी त्या मोल्ड बाहेर काढण्यासाठी दोन हातांमध्ये घेऊन घासायचा. कुल्फी थोडी गरम झाली की, मग ती मोल्डमधून बाहेर पडायची. या कुल्फीची चव एकदम वेगळी होती कारण आटवलेल्या दुधात छान साखर आणि वेलची पूड घातली जायची ही कुल्फी मस्तच लागायची.
(फोटो सौजन्य- Instagram)