भारतीय संस्कृतीमध्ये चंदनाचे झाड हे पवित्र मानले जाते. धार्मिक विधी अथवा देवपूजेसाठी चंदन वापरण्यात येते. चंदनाच्या खोड आणि पावडरला आयुर्वेदिक शास्त्रातदेखील महत्त्वाचे स्थान आहे.शिवाय चंदनामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात ज्यामुळे चंदन अनेक आरोग्य समस्यांवर उपयुक्त आहे. चंदनाचे झाड कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. मात्र चंदनाचे झाड दुर्मिळ असल्यामुळे या झाडाची मोठा प्रमाणावर तस्करी करण्यात येते. चंदन थंड गुणधर्माचे असल्यामुळे शरीरातील दाह चंदनाच्या लेपामुळे कमी होतो. शिवाय चंदनाला एक सुंदर सुंगध असतो. ज्यामुळे चंदनाचा वापर अत्तर, अगरबत्ती, परफ्युम, साबण तयार करण्यासाठी केला जातो. चंदन अगदी प्राचीन काळापासून सौंदर्य खुलविण्यासाठीदेखील वापरण्यात येते. पूर्वीच्या काळी महाराजे आणि महाराण्यांना चंदनाचा लेप लावून शाहीस्नान घालण्यात येत असे. चंदनाच्या लेपामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. शिवाय चंदनाचा लेप लावल्यामुळे अनेक त्वचा समस्यादेखील हळूहळू कमी होतात. उन्हाळा सुरू झाला की त्वचेवर पुरळ, घामोळे, इनफेक्शन अशा अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी उन्हाळ्यात होणाऱ्या या त्वचा समस्या आणि त्वचेचा दाह कमी करण्यासाठी तुम्ही चंदनाचा लेप अथवा फेसपॅक जरूर लावू शकता.
चंदनाचा फेसपॅक कसा तयार करावा-
चंदनाचे खोड दगडावर अथवा सहानेवर उगाळून त्याचा लेप काढा अथवा एक चमचा चंदन पावडर घ्या. चंदन पावडरमध्ये एक चिमुट हळद मिसळा आणि दूध अथवा गुलाबपाण्याने त्याची एक पेस्ट तयार करा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर गुलाबपाणी वापरा आणि जर तुमची त्वचा कोरडी असेल तर दूध वापरा. चेहऱ्यावर हा फेसपॅक ब्रश अथवा हाताच्या मदतीने एकसमान लावा. वीस मिनीटांनी फेसपॅक सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. चेहरा सुती कापडाने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील काळे डाग, पुरळ, पिंपल्स कमी होतात.
उन्हाळ्यात चंदनाचा वापर कसा कराल-
- उन्हाळ्यात अंगाला घाम आल्यामुळे येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी चंदनाच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्याने अंगोळ करू शकता.
- ताप आल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावल्यास अंगामधील उष्णता कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ताप लवकर उतरू शकतो.
- उन्हात घराबाहेर पडल्यामुळे डोके दुखत असेल तर डोक्यावर चंदनाचा लेप लावल्यामुळे डोकेदुखी कमी होते.
- चेहऱ्यावरील सनटॅन, पुरळ, घामोळे दूर करण्यासाठी चंदनाचा लेप लावू शकता.
- भाजलेल्या जखमेवरील दाह कमी करण्यासाठी त्यावर चंदनाचा लेप लावू शकता.
- डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावा.
- दररोज सकाळी चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यामुळे दिवस प्रसन्न जाऊ शकतो.
- चंदनाचा लेप अथवा टिळा दोन भुवयांच्या मध्ये लावल्यामुळे एकाग्रता वाढते.
- निद्रानाशाच्या समस्येवर डोक्यावर चंदनाचा लेप लावल्यामुळे झोप लागण्यास मदत होते.
- मानसिक ताण अथवा नैराश्याची समस्या असल्यास घरात चंदनाचा धुप लावल्यास मन प्रसन्न होण्यास मदत होते.
- केसांच्या समस्या दूर करण्यासाठी चंदनाचे तेल केसांमध्ये लावल्यामुळे थंडावा मिळू शकतो.
त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती
घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर
फोटोसौजन्य – इस्टाग्राम