मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर

मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर

लग्न सोहळ्यातील महत्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने. विशेषत: महाराष्ट्रीयन लग्नात दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पण मध्यंतरीच्या काळात कुंदन, अमेरिकन डायमंड या दागिन्यांची क्रेझ आली आणि मग सोन्याचेही दागिने अनेकांना नकोसे होऊ लागले. अनेक महाराष्ट्रीयन लग्नात तुम्ही अशा प्रकारचे दागिने नववधूने देखील घातलेले पाहिले असतील.पण आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढली आहे. इतर कोणत्याही नव्या डिझाईनच्या वेस्टनाईज दागिन्यांपेक्षा वेगवेगळ्या पेहरावावर पारंपरिक दागिने घालण्याचा एक ट्रेंड आला आहे.विशेष म्हणजे हुबेहूब पारंपरिक दागिन्यांचे खोटे दागिने बाजारात मिळू लागले आहेत. तेही अगदी माफक दरात. आता तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी  दागिने घ्यायचे तर तुम्हाला लगेच सोन्याचे दागिने म्हणजे किती खर्च असा विचार करायची गरज नाही. तर तुम्ही आम्ही दाखवलेले हे प्रकार सहज बाजारातून घेऊ शकता तेही अगदी परवडणाऱ्या दरात...मग करुया सुरुवात


लग्नाचा सीझन आला आणा नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावर ग्लो


 • ठुशी
thushi


गळ्यालगत घातला जाणारा हा प्रकार. आता तुम्हाला माहीत आहे याला ‘ठुशी’ का म्हणतात?  तर तुम्ही ठुशी नीट निरखून पाहिली तर बारीक मण्यायामध्ये ठासून भरलेल्या असतात. म्हणूनही ठुशी. अगदी बारीक बारीक मण्या यामध्ये गुंफलेल्या असतात. आता यातही अनेक प्रकार आहे. जो साधा आणि बेसिक प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला गोलाकार रुपात सोनेरी रंगाचे मणी गुंफलेले दिसतील. मध्यभागी एखादा मोठा गोलमणी असेल. किंवा छोटेसे पेडंट असेल. या शिवाय चपट्या पट्टीवर जर मणी गुंफलेले असतील तर त्याला पट्टी ठुशी म्हणतात.याशिवाय मोरणी ठुशी,मोहनमाळ ठुशी असे प्रकार आहेत.


जर तुम्ही अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी नेसली असेल तर हा दागिना शोभून दिसतो


*कुठे मिळेल ?- दादर पश्चिमेले अगदी गल्ली बोळातही तुम्हाला ठुशीचे वेगवेगळे प्रकार मिळतील. साधारण 250 रुपयांपासून त्या तुम्हाला मिळतील  


 •  कोल्हापुरी साज
kolhapuri saaj


कोल्हापुरी साज या नावावरुनच तुम्हाला कळाले असेल की, हा कोल्हापुरकरांची शान असलेला दागिना आहे. या दागिन्याचे विशेष सांगायचे झाले तर हा दागिना लाखेवर तयार केला जातो. कोल्हापूरमध्ये तो अधिक घातला गेला म्हणून त्याला कोल्हापुरी साज असे म्हटले जाते. साधारण 60 वर्षे जुना असा हा दागिन्याचा प्रकार आहे.  कोल्हापुरी साजमध्ये जावमणी आणि पानड्या (वेगवेगळ्या आकारांची पाने) सोनाच्या तारेमध्ये गुंफली जातात. याशिवाय यामध्ये चंद्र, बेलपान, शंख, कासव, भुंगा अशी शुभ शकुने मानल्या जाणाऱ्या गोष्टी असतात. हाराच्या मध्यभागी एक गोलाकार आकाराचे पेंडट असते.


तुमचं लग्न ठरलंय मग आता पासूनच लागा तयारीला


*सोन्यासारखेच दिसणारे पण बेनटेक्स मटेरिअलमध्ये मिळणारे कोल्हापुरी साज  250 रुपयांपासून मिळतात.


 • बोरमाळ
bormal


बोरमाळ हा देखील महाराष्ट्रीयन दागिन्यांमधील पारंपरिक प्रकार आहे.लहान बोरांच्या आकारासारखे मणी या माळेत गुंफलेल असतात. म्हणून त्याला बोरमाळ असे म्हणतात.काठापदरांच्या साड्यांवर हे हार शोभून दिसतात. आता या दागिन्याचे विशेष सांगायचे तर सोन्यात हा दागिना घडवताना फार पैसे जात नाहीत.कारण या दागिन्याला फार सोने लागत नाही. पातळ पत्र्याचे मणी बनवून त्यात लाख भरण्यात येते. त्यामुळे पूर्वीच्या काळी हा दागिना सगळ्याच महिलांकडे सर्रास असायचा. आता या मध्ये व्हरायटी आलेली पाहायला मिळते. दोन ते तीन पदर असलेल्या बोरमाळा हल्ली सगळीकडे पाहायला मिळतात.


 • चिंचपेटी
chinchpeti


ठुशीसारखाच गळ्या लगत घालण्याजोगा प्रकार म्हणजे चिंचपेटी. पण ठुशीपेक्षा हा प्रकार फारच वेगळा आहे. मोत्यामध्ये या हाराची गुफंण करण्यात येते. किर्तीमुख आणि मत्स्य याचे नक्षीकाम त्यावर असते. हा हार अगदी ताठ कॉलर असल्यासारखा दिसतो. हा देखील एक पारंपरिक दागिना असून आता यामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. अगदी 500 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत हे हार मिळतात.


*दादर येथील किर्तीकर मार्केटमध्ये तुम्हाला उत्तम चिंचपेटी हार मिळू शकतील.


 • राणीहार
shahihaar 1


मराठमोळ्या दागिनांमध्ये मोडणारा आणखी एक हार म्हणजे राणीहार. राणीहार सगळ्या हारांची शान आहे असे म्हणायला हवे कारण राणी घातल्यानंतर तुमचा गळा संपूर्ण भरल्यासारखा वाटतो. राणीहार हा दोन किंवा तीन पदरी असतो. राणीहाराच्या प्रत्येक पदराला बारीक बारीक डीझाईन केलेली असते. त्यामुळे हा हार अगदी घसघशीत वाटतो. विशेषत: लग्न समारंभात तुम्ही एखादी काठापदराची साडी, पैठणी, इरकल असे काही प्रकार घातले असतील तर तुम्ही हा एक नुसता हार घातला तरी तुम्हाला चांगला वाटू शकेल. त्यामुळे तुम्ही हा नक्की घालून पाहा


*भुलेश्वर मार्केटमध्ये तुम्हाला यातील व्हरायटी मिळू शकतील.


आता हे झाले काही गळ्यातील प्रकार आम्ही दिलेल्या प्रकाराव्यतिरिक्त आणखीही काही पर्याय नक्कीच आहेत.


 • पिचोडी
pichodi


 हातातील बांगडीमधील हा प्रकार आहे. हा सगळ्यात मागे घातला जातो म्हणून त्याला ‘पिचोडी’ असे म्हटले जाते.  या बांगड्याचे विशेष सांगायचे झाले तर या बांगडीची एक बाजून सरळ असते तर मागच्या बाजूला डिझाईन असते. हल्ली या बांगड्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात. नववधूच्या हातात तर हा प्रकार फारच शोभून दिसतो. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या लग्नाला टिपिकल मराठी लुक करणार असाल तर तुम्हाला हातात घालणारा हा प्रकार घालायलाच हवा.


*दादर, भुलेश्वर येथील बाजांरामध्ये हा प्रकार सर्रास उपलब्ध आहे.


 • शिंदेशाही तोडे
shindesahi tode


शिंदेशाही तोडे हा आणखी एक रॉयल प्रकार आहे असे म्हणायला हवे. हा जाड कड्यांचा प्रकार आहे. आता तुम्हाला सोन्यात घडवून घेताना त्याच्यामध्ये व्हरायटी आणता येते. शिंदेशाही तोड्यांवर पानाच्या आकाराच्या डिझाईन असतात. तुम्ही हे कडे आतून नीट पाहिले तर पानाच्या आकाराचे कोपरे जोडून यामध्ये उठावदारपणा आणला जातो. प्रत्येक ठिकाणानुसार त्यांच्या डिझाईनमध्ये व्हरायटी आणली जाते. आता हा प्रकार तुम्ही तुमच्या बांगड्यांच्या मधोमध घालू शकता.


 •  पाटल्या 
patlya


बांगडीमधील हा एक प्रकार पूर्वीच्या काळी लोक आवर्जून वापरत होती. चपट्या प्रकारातील या बांगड्या हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घातल्या जातात. या बांगड्या घातल्या की, तुमचा पूर्ण हात छान भरलेला दिसतो. मुळात वधूच्या हातातील मेहंदीला न्याय देण्याचे काम बांगड्यांचे हे प्रकार करत असतात. त्यामुळे हा प्रकारही तुम्ही आवर्जून घाला.  


 • बाजूबंद
bajubandh


आता मराठी लग्नात बाजूबंद नाही असे कसे होईल. हल्ली तर इमिटेशन ज्वेलरीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारात बाजूबंद मिळतात की, ते घेण्याचा मोह तुम्ही आवरुच शकणार नाही. या बाजूबंदातील मीना काम, जडवलेले मोती इतके सुंदर दिसतात की, तुमचा लुक ते अधिक चांगला करतात.  आता तुम्हाला तुमच्या बाजूबंदाची निवड करताना तुम्ही नेमके कशाप्रकारातील इतर दागिने घेतले आहेत. त्यावर अवलंबून आहे.


मैत्रिणीचं लग्न ठरलयं मग हमखास मनात येणार विचार


 • नथ 
nath


नाकात घालण्याचे हे आभूषण असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नथ फारच प्रचलित आह.हा दागिना महाराष्ट्रीय लुक पूर्ण करण्याचे काम करतो. हल्ली नथीचे वेगवेगळे प्रकार आले असले तर पारंपरिक नथ ही आजही अनेकांच्या पसंतीस उतरते. प्रत्येक मराठी लग्नांमध्ये नथ ही आवर्जून घातली जाते. नथीमध्ये मोती, लाल किंवा हिरव्या रंगाचे मणी जडवलेले असतात. आता नथीला आणखी चांगला लुक देण्यासाठी त्यामध्ये अमेरिकन डायमंड. पाचू, माणिक देखील वापरले जातात.


*तुम्हाला सोन्याची नथ घ्यायची नसेल तर कोणत्याही इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात तुम्हाला हमखास नथ मिळू शकेल.


 •  बुगडी
bugadi


बुगडी माझी सांडली ग……. हो हो ही तिच बुगडी आहे. जी कानावर घातली जाते. तुम्ही अगदी ट्रेडिशन कानातले घातले असेल आणि तुम्हाला त्याला आणखी थोडा ट्रेडिशनल टच द्यायचा असेल तर तुम्ही बुगडी हा प्रकार घालू शकता. कानाच्या पाळीवर घातला जाणारा हा प्रकार क्लीप स्वरुपात असतो. जो तुम्ही कानावर अडकवू शकता. आता यामध्ये इतके वेगळे प्रकार आहेत की विचारता सोय नाही. खड्यांची, मोत्यांची असे वेगवेगळे प्रकार यात मिळतात.


 *तर हे काही दागिने आहेत जे तुम्हाला तुमच्या लग्नात घालता येऊ शकतात. तुम्हालाही असे काही दागिने माहीत आहेत जे अस्सल महाराष्ट्रीयन आहेत तर आम्हाला नक्की कमेंट करुन कळवा.  


(फोटो सौजन्य -Instagram)