भारत हा उंच डोंगरांगा, पर्वत-शिखरे, नद्या, बर्फाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश अशा विविध भौगोलिक परिस्थितीने समृद्ध देश आहे. त्यामुळे भारताचे हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक भारतात गर्दी करतात. भारतात ट्रेकिंगसाठी अनेक सर्वोत्तम ठिकाणं आहेत. ट्रेकिंगला जाणं हा एक रोमांचक अनुभव असतो. डोंगरमाथ्यावर चढून निसर्गाचा आनंद लुटण्यात एक विलक्षण सुखद अनुभव असतो. प्रत्येकाने जीवनात एकदातरी हा अनुभव घ्यायलाच हवा अशी सर्वाेत्तम ठिकाणे भारतात आहेत. या अॅडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी भारतातील या ट्रेक्सनां जरूर भेट द्या.
ट्रेकिंगला जाण्याआधी गिर्यारोहणाचे शास्त्र आणि त्या भागाची माहिती असणं फार गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचा ट्रेक नक्कीच अविस्मरणीय ठरू शकतो. यासाठी एखाद्या अनुभवी ट्रेकिंग ग्रुपसोबत जोडले जा आणि ट्रेकिंगसाठी तयार व्हा. मात्र त्याआधी भारतातील ही सर्वोत्तम ट्रेकिंगची ठिकाणं आणि त्याबद्दलची माहिती अवश्य वाचा.
राजमाची हा महाराष्ट्रातील एक नयनरम्य किल्ला आहे. मुंबई-पुण्याच्या दरम्यान लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला गिर्यारोहकांना ट्रेकिंगसाठी भुरळ घालत असतो. किल्लाच्या माचीवर लोकवस्ती आहे. ज्यामुळे तिथे तुमची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. पावसाळ्यात या किल्ल्यावरून निसर्गरम्य दृश्याची उधळण पाहता येते. किल्ल्यावरील पठार, तलाव, किल्लेदाराचा वाडा, तटबंदी, पाण्याची टाकी, तलाव, दारूगोळ्याचे कोठार अशा अनेक गोष्टी तुम्हाला पाहता येतात. गडावर जाण्यासाठी पायथ्यावरून माथ्यापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी तीन ते चार तास लागतात. किल्ल्यावर जाण्यासाठी कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे पाऊलवाट आहे.
कोडाचाद्री हे पश्चिम घाटातील शिखरांपैकी एक ठिकाण आहे. जे ट्रेकिंगसाठी नक्कीच उत्तम आहे. कोडाचाद्री हे घनदाट जंगल आणि विविध जैवविविधतेने समृद्ध असे ठिकाण आहे. पायथ्यापासून ते अगदी माथ्यापर्यंत जाण्याचा अनुभव फारच रोमांचक आहे. या ठिकाणी तुम्हाला नागरा किल्ला, जोगचा धबधबा अशी अनेक सुंदर पर्यटन स्थळ पाहता येतात. शिवाय या ट्रेकमध्ये तुम्हाला जंगलातील विविध प्राणी, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यासही करता येतो.
अरकु व्हॅली भारतातील आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममधील एक उंच पर्वतातील दरी आहे. ही दरी पूर्वेकडील घाटमाथ्यावर आहे. कॉफीच्या उत्पादनासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. आदिवासी लोकांची इथे वस्ती असल्यामुळे तिथे तुम्हाला ट्रेकदरम्यान त्यांच्या जनजीवनाचा जवळून अभ्यास करता येऊ शकतो. सिमिलगुडा या रेल्वे स्थानकापासून या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. 911 मीटर उंचीवर ही व्हॅली असून तिथे जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक दिवस लागतो.
जर तुम्हाला ट्रेकिंग वेडे असेल तर हा ट्रेक तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. केरळमधील वायनाडचा हा चेंब्रा पिक तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचीवर असलेली ही पर्वत रांग अॅंडवेंचर करू पाहणाऱ्या सर्वांना भुरळ घालणारी आहे. जर तुम्हाला ऑफबीट ठिकाणी फिरायला जायला आवडत असेल तर तुम्हाला हा ट्रेक नक्कीच आवडेल. मात्र या ट्रेकसाठी तुम्हाला वनअधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. शिवाय तुम्हाला या ठिकाणी राहण्याची परवानगी नसल्यामुळे एकाच दिवसात परतीचा मार्ग निवडावा लागेल.
वाचा - महाराष्ट्रातील ही 10 ठिकाणं आहेत अजून अज्ञात पण अविस्मरणीय
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमधील टायगर हिल पर्यटकांना ट्रेकिंगसाठी नेहमीच खुणावत असतं. या हिलवरून पाहिलेला सुर्योदय तुमच्या नेहमी लक्षात राहील. टायगर हिल हे दार्जिलिंगमधील सर्वात उंच ठिकाण आहे. या ठिकाणावरून तुम्ही संपूर्ण दार्जिलिंग पाहू शकता. या डोंगराजवळच विश्वातील सर्वात मोठा कांचनगंगा पर्वतदेखील आहे.
उत्तराखंडमधील मसुरी येथील हे नयनरम्य ठिकाण पाहणं तुमच्यासाठी नक्कीच खास अनुभव असेल. या ठिकाणी अगदी स्वर्गसुखाचा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. कारण हातात गरमागरम चहा आणि आजूबाजूने ढगांनी वेढलेला परिसर काय सुखद वातावरण असेल पाहा. मसुरी हा प्रदेशच पर्वतांची राणी म्हणून ओळखला जातो. मसूरीमधील हे ठिकाण म्हणजे मसूरीचा प्राणच आहे. घनदाट जंगलामध्ये वसलेलं हे ठिकाण तुम्हाला अद्भूत जगात घेऊन जाईल.
हिमाचल प्रदेशमधील उंचचउंच पर्वतरांगा देश-विदोशातील पर्यटकांना ट्रेकिंगसाठी खुणावत असतात. अशा ठिकाणी रोमांचक अनुभव घेण्याची हौस असलेलेच पर्यटक जास्त जातात. या ठिकाणचा त्रिउंड ट्रेकदेखील असाच एक अनुभव तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. उंच डोंगर आणि त्यामधून वाहणारे झरे वाटेवर तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात. हिमाचलच्या कांगडा जिल्हातील हे एक छोटंसं हिल स्टेशन आहे. जे धर्मकोट हिल स्टेशनचाच एक भाग आहे. जमिनीपासून 2828 मीटर उंचीवर असल्याने तुमचे मन इथे नक्कीच रमेल. शिवाय मनशांतीसाठी इथले बौद्धमठ आणि तिथला मंद घंटानाद तुम्हाला एक विलक्षण अनुभव देईल.
चादर ट्रेक हा लेह लडाखमधील जंस्कार व्हॅलीमधील एक रोमांचक आणि साहसी ट्रेक आहे. स्थानिक भाषेत चादर म्हणजे बर्फाची नदी असा होतो. या व्हॅलीमधून झंस्कार नदी वाहते. थंडीच्या दिवसात वातावरणामुळे या नदीचं पाणी बर्फाळ होतं. त्यामुळे त्यावरून ट्रेक करण्यासाठी या ट्रेकला चादर ट्रेक असं म्हणतात. उन्हाळात याच नदीवरून रिव्हर क्राफ्टिंगचा आनंद लुटला जातो.
भारतातील या धबधब्यांना नक्की द्या भेट (List of Waterfalls In India In Marathi)
गोमुख तपोवन ट्रेक हा भारतातील एक रोमांचक ट्रेक आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्हात हे ठिकाण आहे. गोमुख हे शिवलिंग पिकजवळ आहे. मात्र हा ट्रेक करणे एखाद्या आव्हानासमान आहे. गोमुख मधून भागिरथीचा उगम होतो. या ठिकाणी जाण्यासाठी अनुभवी पर्यटकांची साथ असणं फार गरजेचं आहे. या ट्रेकिंगचा मार्ग बर्फाळ आणि ओलरस असल्याने भल्या भल्यांसाठी इथे पोहचणं कठीण आहे. मात्र सतत खचणारा मार्ग आणि उंच दऱ्या असा अनुभव घेत या ठिकाणी जाणं तुमच्यासाठी एक वेगळाच अनुभव असू शकतो.
जर तुम्हाला पर्वतरांगाच्या कुशीत राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा ट्रेक जरू करा. मॅकलोडगंजमधील इंद्राहार पास ट्रेक तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकेल. शिवाय हे एक ऑफबीट ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एकप्रकारची शांततादेखील मिळेल. या शहरात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. ज्यामुळे ट्रेकबरोबरच तुम्हाला इतर पर्यटनस्थळेही फिरता येतील.
भारत भूमी ही विविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीने नटलेली आहे. काही ठिकाणी उंचच उंच पर्वतरांगा आहेत तर काही ठिकाणी फुलांनी सजलेले असे डोंगर. उंत्तराखंडमध्येदेखील अशाच प्रकारच्या दुर्मिळ फुलांनी भरलेले हे डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात. हिमालयाच्या या पर्वतरांगामध्ये वसलेले हे एक नयनरम्य पर्यटन स्थळ आहे. विविध जातीची दुर्मिळ फुलं हे इथलं वैशिठ्य आहे. ही जमिन जवळजवळ वर्षांचे नऊ महिने बर्फांच्छादित असल्याने फक्त तीनच महिने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
रूपीन पास हा भारतातील एक साहसी ट्रेक म्हणून ओळखला जातो. उत्तराखंड राज्यातून हिमाचल प्रदेश असा या ट्रेकचा प्रवास आहे. निसर्गाच्या विविध रूपांचं दर्शन तुम्हाला या ट्रेकमधून मिळू शकतं. जितकी आव्हानं समोर येतात तितकीच स्वर्गसुखाचा अनुभव देणीरी निसर्गाची रुपे इथे पाहता येतात. एका बाजून डोंगरमाथ्यावरून जाणाऱ्या अरूंद पायवाटा तर दुसऱ्या बाजून खळखळून वाहणारे धबधबे आणि दऱ्या असा नजारा या ट्रेकमध्ये पाहता येतो.
गोएटचा हे सिक्किममधील अशा पर्वतरांगापैकी एक आहे जिथून तुम्हाला कांचनगंगा पर्वत दिसू शकतो. गोएचा ला जवळच तुम्हाला समिती लेक देखील पाहता येऊ शकतो. चारी बाजू पर्वतरांगांनी घेरलेला हा तलानव पाहणं एक सुंदर अनुभव आहे. निसर्गरम्य ठिकाणे आणि रोमांचकारक अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणाला भेट जरूर द्यावी. ऑफबीट ठिकाण असल्यामुळे तुम्हाला एका अनामिक शांततेचा अनुभव मिळू शकतो.
लामायुरू हे लेहमधील एक उंचावर वसलेलं गाव आहे. थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे ते ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला लडाखमधील विविध संस्कृतीचं दर्शन घडू शकतं. ज्यामुळे हा ट्रेक तुमच्यासाठी मनोरंजकदेखील असेल. अंगाला झोंबणारी थंडी आणि साहसी ट्रेकचा एक अद्भूत संगम या ट्रेकमध्ये आहे. भूसभूशीत मातीच्या डोंगरात वसलेल्या या गावामुळे तुमचा पर्यटनाचा आणि जगभ्रंमतीचा अनुभव नक्कीच समृद्ध होईल.
रुपकुंड हा उत्तराखंडमधील चमोली जिल्हातील एक हिमतलाव आहे. उंचावर असल्याने त्या ठिकाणी ट्रेकसाठी पर्यटक जातात. हिमालयाच्या अगदी कुशीत वसलेल्या या दरीमुळे ट्रेकिंग करण्यात एक वेगळीच मौज आहे. रोमांचक अनुभव घ्यायचा असेल तर ट्रेकर्सनी लोहाजंग ते रूपकुंड असा प्रवास अवश्य करावा. वातावरण चांगले असेल तर तुम्हाला या ट्रेकमध्ये अनेक अदभूत अनुभव मिळू शकतात.
लेह लडाखमधील हे आणखी एक ट्रेकसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. निसर्गरम्य ठिकाण, अंगावर काटा आणणारी थंड हवा, बर्फाच्छादित पर्वतरांगा, प्राचीन संस्कृतीच्या खुणा जपणारी गावे असं बरंच काही तुम्हाला या ट्रेकमध्ये अनुभवता येईल. गावांमध्ये राहण्याची व्यवस्था असल्याने तुम्हाला या ठिकाणचा अनुभव नक्कीच अनेक गोष्टी शिकवून जाईल. लडाखमधील हा एक सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर असा प्रदेश आहे.
नागालैंडमधील जाफू पिक ट्रेकदेखील एक लोकप्रिय ट्रेकिंगचे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला नागा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनशैली, स्थापत्यशास्त्र, राहणीमान याचा अभ्यास करता येतो. नागालैंडमधील कोहिमा जिल्हाच्या दक्षिण दिशेला 15 किलोमीटरवर जाफू पिक आहे. या डोंगर चढण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा तास लागतात.
हिमाचलमध्ये पर्यटन करताना भाबा पास ट्रेक प्लॅन करणं अगदी मस्ट आहे. या ठिकाणी दररोज तुम्हाला विविध निसर्गसौंदर्याचे दर्शन घडते. ज्यामुळे तुम्हाला फिरण्याचा नित्यनुतन अनुभव रोजच मिळतो. उंच पर्वत रांगा, नद्या साहसी पर्यटन असा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणी जरूर जा.
लेह लडाखमधील हा एक सर्वात कठीण ट्रेक आहे. हा ट्रेक करण्यासाठी तुमच्याकडे गिर्यारोहणाचे कौशल्य असायलाच हवे. कठीण असला तरी या ट्रेकमधून तुम्हाला एक समृद्ध अनुभव नक्कीच मिळू शकतो. गावागावातून जाणारा आणि विविध आव्हानांनी भरलेल्या या ट्रेकसाठी अनुभवी गावकऱ्यांची मदत अवश्य घ्या.
कांचनगंगा हे भारतातील हिमालय पर्वतरांगांमधील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. जगभरात सर्वात उंच पर्वातात त्याचा क्रमांक तिसरा आहे. सिक्किम राज्यात हे शिखर असून त्याची उंची 8586 मीटर आहे. त्यामुळे कांचनगंगा सर करणं हे सर्वात कठीण आणि रोमांचक आहे. या ठिकाणी ट्रेकला जाण्यासाठी भारतातून जाण्यासाठी 12 दिवस तर नेपाळमधून 14 दिवस लागतात. कठीण परिश्रम आणि अनुभवी ट्रेकर्सच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता. मात्र त्याआधी नीट विचार करा आणि मगच हा ट्रेक प्लॅन करा.
जर तुम्हाला उन्हाळ्यात ट्रेक करायचा असेल तर हामटा ट्रेक तुमच्यासाठी अगदी बेस्ट ठिकाण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हिरवागार निसर्ग आणि थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी अनेक गिर्यारोहक मनाली जवळील हामटा पास ट्रेक सर करतात. शिवाय या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसातही बर्फाचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव फारच रोमांचक असू शकतो.
खीरगंगा हिमाचल प्रदेशमधील कुल्लूमध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी मे महिन्यानंतर ट्रेकसाठी जाऊ शकता. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि खीरगंगा तुमच्यासाठी एक अद्भूत अनुभव असेल. कारण उंचचउंच पर्वतरांगा, गरम पाण्याची कुंड, हिरवागार निसर्ग, रहस्यमय गुहा, मंदिर अशा अनेक गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. राज्य - हिमाचल प्रदेश
ट्रेकवर पहिल्यांदा जात असाल तर त्याआधी आवश्यक त्या गोष्टींची काळजी जरूर घ्या. शिवाय ट्रेक हे नेहमी निसर्गरम्य ठिकाणी आयोजित केले जातात. तुमच्या जाण्यामुळे तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी यांचे कोणेतेच नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्या.
तुमच्या ट्रेकिंग सॅकमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टीच घ्या. उगाचच सामानाने भरलेली बॅग घेऊन ट्रेकवर जाऊ नका. ट्रेंकिंग शूज, आवश्यक आणि आरामदायक कपडे, टिकाऊ खाद्यपदार्थ, पाण्याची बॉटल, प्रथमोपचारासाठी औषधे आणि ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणचा नकाशा जरूर जवळ ठेवा.
ट्रेकवर तुम्ही कोणत्याही वयात जाऊ शकता. अगदी फार वृद्ध काळात ट्रेकवर जाणे शरीरप्रकृतीप्रमाणे नक्कीच शक्य नाही.पण जर अगदी लहान वयात ट्रेकला जाणं सुरू करायचं असेल तर चांगला ट्रेकिंगचा ग्रूप निवडा.