#MyStory: ऑनलाईन झाली फ्रेंडशिप, प्रेमात पडले पण पुढे काय

#MyStory: ऑनलाईन झाली फ्रेंडशिप, प्रेमात पडले पण पुढे काय

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाच्या काही व्याख्या असतात. प्रत्येक मुलीला राजकुमार तिच्या स्वप्नाप्रमाणे हवा असतो. माझीही अशीच काही स्वप्नं होती. पण माझ्या नशिबात नक्की काय आहे हे मला कधीच कळलं नाही. प्रेमाची भूक प्रत्येकालाच असते. मला कधी प्रेम मिळालं नाही. एकदाच प्रेम करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झालं नाही. त्यानंतर माझं काम आणि मी असाच मार्ग मी शोधला होता. पण खरी सुरुवात तिथे झाली जिथे तो माझ्या आयुष्यात आला आणि तेही ऑनलाईन…

खरं तर मी तशी काही जास्त ऑनलाईन वगैरे जात नाही. कोणीही रँडम फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतो. पण अशा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं मला आवडत नाही. पण का माहीत नाही त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि चुकून झालं की अनावधानाने माहीत नाही पण मी ती स्वीकारली. तसा तो दिसायला छान होता. कदाचित म्हणूनही स्वीकारली असेल. अगदी अदबीने बोलायचा. कधीही त्याने माझ्याशी कोणताही प्रकारे वाईट बोलून मर्यादेचं उल्लंघन केलं नाही काहीच नाही. कदाचित त्याच्या याच स्वभावामुळे माझी त्याच्याशी जवळीक वाढू लागली. रोज त्याचा फोन कधी येतोय किंवा मेसेज येतोय की नाही याची वाट बघू लागले. मला कळतंच नव्हतं की नक्की काय होतंय...कदाचित कधीही न बघितलेल्या त्याला मी माझ्या मनाच्या खूप जवळ नकळत केलं होतं. कारण मलाही माझं असं कोणीतरी हवं होतं. 

#MyStory: आजही साखरपुड्याचा तो क्षण आठवला की...

रोज सकाळ संध्याकाळ त्याच्या फोनची वाट पाहणं, तो काय करतोय याची माहिती ठेवणं मला आवडू लागलं होतं. त्याला ते आवडत होतं की नाही हे विचारण्याची मी तसदीही नाही घेतली. मला वाटत होतं तोही कदाचित माझ्या प्रेमाचत आहे. पण कोणास ठाऊक असं स्वतःच्याच विचारात गुंतून राहणं मला आवडू लागलं होतं. पण या सगळ्याचा नक्की शेवट काय होणार होता याची मला कल्पनाही नव्हती. मी त्याच्या विचारात आणि प्रेमात इतकी बुडून गेले होते की मी नक्की काय करतेय याचा सारासार विचार करण्याची कुवतही माझ्यात नव्हती. आमच्यात खूपच छान मैत्री झाली होती. पण मी कधी त्याला काहीही विचारण्याचं धाडस करू शकत नव्हते. 

तो नेहमी म्हणायचा की, तुझ्याशिवाय माझा दिवसच जात नाही. तू बोलत राहा मला खूप आवडतं तुझं बोलणं ऐकायला. एक वर्ष झालं पण एकाच शहरात असूनही आम्ही कधी एकमेकांना भेटायचा हट्ट केला नाही. पण एक वर्ष झाल्यानंतर मला खरंच वाटायला लागलं की, हा कधीच आपल्याला भेटायला का नाही येत? भेटण्यामध्ये नक्की काय अडचण आहे. आज तर मी त्याला हट्टाने हे विचारायचं ठरवलं. नेहमीप्रमाणे रात्री त्याचा फोन आला. मी आधीच ठरवून ठेवलं होतं की त्याच्याशी बोलायचं काय आहे. पण त्याचा आवाज ऐकायल्यानंतर माझी थोडी चलबिचल झाली. मनाने विचार केला हट्टाने नाही किमान प्रेमाने तरी त्याला विचारावं. पण त्यानंतर जे घडणार होतं ते माझ्या मनाच्या कोपऱ्यातही कधी नव्हतं. 

#MyStory: खऱ्या आयुष्यातही होतं “Love At First Sight”

त्याचा फोन उचलला. नेहमीप्रमाणे बोलायला लागलो. अचानक विषय निघाला. मी त्याला म्हटलं, ‘काय रे एक वर्ष झालं पण तू कधीच का मला भेटायला येत नाहीस. सगळ्या गोष्टी तर आपण शेअर करतो ना एकमेकांबरोबर? आपल्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या नाहीत. छान मैत्री झाली मग असं का? तू मला टाळतोस का?’ मी नुसता प्रश्नांचा भडीमार करत होते. त्याच्याकडून काही प्रतिसाद येत नाही हे कळलं आणि शांत झाले. डोळ्यातून भळाभळा पाणी वाहायला लागलं होतं. त्याला म्हटलं, ‘काही बोलशील का? आपण कधीच भेटायचं नाहीये का? तू कधीच का मला विषय आल्यावर उत्तर देत नाहीस. मला आज उत्तर हवंय नाहीतर आपली मैत्री नक्कीच तुटली.’ तो एक सेकंद शांत राहिला आणि म्हणाला, ‘मी कधीच तुला याबद्दल काही सांगितलं नाही. मला काहीच नकोय. मला तू खूप आवडतेस. लग्न करायचं होतं तुझ्याशी पण कधी काही बोललो नाही कारणही तसंच आहे. मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. कारण माझं आयुष्य तुझ्याशी भेट झाल्यापासून केवळ दोन वर्ष उरलं होतं गं. मला कळत होतं की आपण एकमेकांमध्ये गुंतत आहोत. हृदयात छेद आहे माझ्या आता केवळ एक वर्ष उरलं आहे गं माझ्याकडे. मी तुला भेटलो असतो तर आपण अजून गुंतलो असतो तू कधीही दुसऱ्याशी लग्न करायला तयार झाली नसतीस हे मला कळतंय. म्हणून मोठ्या प्रयत्नाने मी तुला स्वतःपासून दूर ठेवलंय. मला प्लीज चुकीचं समजू नकोस. तू खूपच चांगली आहेस आणि माझ्या जाण्याने सर्वात जास्त दुःख तुलाच होईल हेदेखील मला माहीत आहे. त्यामुळे मी तुला कधीच सांगितलं नाही.’ इतकं पहिल्यांदाच बोलला होता तो आणि शेवटचंही. त्यानंतर त्याने कधीही ना मला फोन केला ना माझा फोन उचलला. 

खूप जास्त प्रेम करणारी व्यक्ती होता तो आणि तरीही माझा होऊ शकला नाही. पण तो जाऊन इतकी वर्ष झाली आहेत...मला मात्र कोणाशीच लग्न करावंसं वाटलं नाही. तो गेला त्यानंतर त्याच्या मित्राने मला फोन करून कळवलं. त्याला पहिलं आणि शेवटचं पाहिलं ते शांत झोपलेलं….त्याचा तो चेहरा आणि थंंड हाताचा स्पर्श आजपर्यंत मनात घर करून आहे….कधीही न संपणारं माझं प्रेम...फक्त तो.

#MyStory : माझं पहिलं प्रेम जे कधीच….