मसूराची डाळ ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आहारासोबतच या डाळीचा वापर तुम्ही चेहऱ्याला लावण्यासाठीही करू शकता. हो...मसूर डाळीचा उपयोग तुम्ही सौंदर्यवर्धनासाठीही करू शकता. खरंतर सर्व प्रकारच्या डाळींमध्ये त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे गुण आहेत. तर या लेखात आपण जाणून घेणार आहोत मसूर डाळीचे चेहऱ्यासाठी असलेले फायदे आणि मसूर डाळीचे फेसपॅक. या मसूर डाळीच्या फेसपॅकसाठी तुम्हाला जास्त तयारीही करावी लागणार नाही. फक्त तुम्हाला आवश्यकता आहे ती मसूर डाळ दळून त्याची पावडर हवाबंद कंटेनरमध्ये ठेवण्याची. चला जाणून घेऊया मसूर डाळीचे उपयोग जे तुमच्या चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर आहेत प्रभावी.
मसूर डाळीची पावडर किंवा मसूर डाळीचं पीठ करणं खूपच सोपं असून याला जास्त वेळही लागत नाही. तुम्हाला जितक्या मसूर डाळीची आवश्यकता आहे त्या प्रमाणात घ्या आणि मिक्सरच्या साहाय्याने वाटून घ्या. वाटताना लक्षात ठेवा की, ही पावडर चांगली बारीक झाली पाहिजे. पण जर तुम्हाला याचा उपयोग स्क्रब म्हणून करायचा असेल तर ही पावडर थोडी जाडसर असायला हवी. तुम्ही ही पावडर हवाबंद कंटेनरमध्ये ठेवल्यास ती खराब होणार नाही. पण जर पावसाळ्यात किंवा दमट हवामान असलेल्या ठिकाणी ही पावडर ठेवल्यास ती खराब होईल. त्यामुळे चेहऱ्याला लावण्याआधी या डाळीचा वास घेऊन पाहा आणि मगच चेहऱ्याला लावा. शक्य असल्यास ताजी पावडर बनवून तिचा वापर चेहऱ्यासाठी करा.
तुमच्या चेहऱ्याच्या अनेक समस्यांवरील प्रभावी उपाय म्हणजे मसूर डाळीपासून बनवलेला फेसपॅक होय. मसूर डाळीचा फेसपॅक तेलकट त्वचा, पिंपल्स आणि इतर अनेक त्वचेच्या समस्या दूर करेल. याशिवाय याचा वापर तुम्ही स्क्रब म्हणूनही करू शकता. मसूर डाळीचा फेसपॅक बनवताना तुम्ही यामध्ये दही, मध, आणि चंदन यांसारखे घटक मिक्स करून अजून प्रभावी बनवू शकता. त्वचेच्या समस्यांवर असा वापर करा मसूर डाळीपासून बनवलेल्या विविध फेसपॅकचा.
कसं वापराल - यासाठी तुम्हाला लागेल 1 चमचा मसूर डाळ पावडर, 1 चमचा मध. हे दोन्ही घटक चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण लावण्याआधी चेहरा चांगला धुवून घ्या आणि मगच हे मिश्रण लावा. हलक्या हाताने मालीश करत हा फेसपॅक 15 मिनिटांनी धुवून टाका.
कसा होतो उपयोग - चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय हा फेसपॅक मदत करतो. मसूर डाळीत प्रोटीनची मात्राही चांगली असते. त्यामुळे त्वचेला याचा नक्कीच फायदा होतो. मसूर डाळीच्या फेसपॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील वांग कमी होऊन त्वचा टोनही होते.
कसं वापराल - बेसन आणि दह्यासोबत मसूर डाळीचा फेसपॅक बनवा. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 चमचा मसूर दाळ पावडर, 1 चमचा बेसन, 1 चमचा दही आणि 2-3 चिमूट हळदीचा वापर करा. हे मिश्रण चांगलं मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. चेहरा संपूर्ण सुकल्यावर ओल्या हाताने हळू हळू चेहरा साफ करा. या फेसपॅकने चेहऱ्यावरील मृत त्वचाही दूर होते.
कसा होतो उपयोग - बेसन आणि दही (Gram flour and curd) सोबत मसूर डाळीचा फेसपॅक त्वचा उजळण्यास मदत करतो. तुमच्याकडे एखादं खास फंक्शन किंवा सण असेल तर तुम्ही याचा उपयोग उटणं म्हणूनही करू शकता. चेहरा उजळण्यासोबतच चेहऱ्यावरील डागही दूर होतात. पण चेहरा उजळण्यासाठी याचा वापर रोज करू नका. काही दिवसांच्या अंतराने करा.
कसं वापराल - मसूर डाळीच्या पावडरचा तुम्ही स्क्रबही तयार करू शकता. फक्त यासाठी ही पावडर थोडी जाडसर असावी. या पावडरमध्ये थोडं पाणी मिक्स करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. सुकल्यावर धुवून टाका. पण स्क्रबिंग करताना तुमच्या हाताने चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायला विसरू नका.
कसा होतो उपयोग - जर तुमच्या चेहऱ्यावर रासायनिक स्क्रबचा वापर करत असाल तर सावधान व्हा. कारण तुमच्या चेहऱ्याला यामुळे नुकसान पोचू शकतं. याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हणून मसूर डाळीचा स्क्रब वापरा. यामुळे काही नुकसान होणार नाही.
कसं वापराल - एक मूठ मसूर डाळा पाण्यात भिजवून ठेवा. यामध्ये 5-8 थेंब गुलाब जल मिक्स करा. रात्रभर तसंच ठेवून सकाळी बारीक वाटून घ्या. मग चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा नक्कीच तेलविरहीत दिसेल.
कसा होतो उपयोग - ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांच्यासाठीही मसूर डाळीचा फेसपॅक फारच उपयुक्त आहे. तुमचीही त्वचा तेलकट असेल तर या फेसपॅकचा नक्की वापर करा. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि तेलकटपणा घालवण्यासाठी या फेसपॅकचा आठवड्यातून दोनदा वापर करा.
कसं वापराल - एका बाऊलमध्ये मसूर डाळ पावडर आणि दूध घ्या. रात्रभर हे मिश्रण भिजत ठेवा. सकाळी हे मिश्रण वाटून ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका.
कसा होतो उपयोग -ज्यांची त्वचा कोरडी आणि निस्तेज असते त्यांनी हा फेसपॅक नक्की वापरावा. याचा वापर केल्यास तुम्हाला चेहरा मऊ आणि तजेलदार झाल्याचं जाणवेल. मध त्वचेला निरोगी ठेवतो तर मसूर डाळ प्रभावी स्क्रबिंग एजंट म्हणून काम करते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर आठवड्यातून एकदा त री फेसपॅकचा वापर केलाच पाहिजे.
वाचा - कडूलिंबापासून होममेड फेस पॅक तयार करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
कसं वापराल - एका बाऊलमध्ये 50 ग्रॅम मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची चांगली पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये 1 छोटा चमचा कच्चं दूध आणि 1 चमचा बदाम तेल मिक्स करा. हे मिश्रण चांगल एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा. फेसपॅक लावल्यानंतर 15-20 मिनिटानंतर थंड पाण्याने धुवून टाका. या पेस्टचा उपयोग आठवड्यातून एकदा करा. तुमची त्वचा ग्लो करेल.
कसा होतो उपयोग - प्रत्येकीलाच ग्लोइंग त्वचा आवडते. मग तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर वरील फेसपॅक नक्की वापरून पाहा. तसंच या फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावील काळे डागही दूर होतील. चेहरा अगदी स्वच्छ आणि नितळ दिसेल.
कसं वापराल - ½ कप मसूर डाळ, रात्रभर पाण्यात भिजवा, 1 छोटा चमचा ग्लिसरीन, 2 छोटे चमचे बदाम तेल, 2 छोटे चमचे गुलाबपाणी. हे मिश्रण मिक्स करा आणि वाटून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाका.या पेस्टचा वापर तुम्ही नियमितपणे केल्यास चांगले रिजल्ट दिसतील आणि चेहऱ्यावरील लाली आणमि पिंपल्सही दूर होतील.
कसा होतो उपयोग - जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग असतील तर वरील फेसपॅक तुमच्यासाठी नक्कीच गुणकारी ठरेल. मसूर डाळीतील पोषक तत्त्वांमुळे आणि औषधीय गुणांमुळे पिंपल्सवर हा उपाय प्रभावी ठरतो.
कसं वापराल - हा फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला लागेल हलकी भाजलेली मसूर डाळ. याशिवाय सुकलेलं संत्र्याचं सालं. हे दोन्ही घटक योग्य प्रमाणात घ्या. कच्च्या दूधात मिक्स करा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट फेसमास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावा. लावल्यानंतर सुकू द्या आणि मग थंड पाण्याने धुवून टाका. याच्या वापराने तुमच्या थकवा दूर होऊन चेहऱ्यावर लगेच तजेलदारपणा जाणवेल.
कसा होतो उपयोग - जर तुमची त्वचा निर्जीव आणि थकल्यासारखी भासत असेल तर वरील उपाय खूपच प्रभावी आहे. पण वरील फेसपॅकमध्ये मसूर डाळीसोबत सुकलेल्या संत्र्याच्या सालाचा वापर करायला विसरू नका.
कसं वापराल - दूधामध्ये 100 ग्रॅम मसूर डाळ, 50 ग्रॅम चंदन पावडर आणि संत्र्याचं साल रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व घटक वाटून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. 20 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार ते स्वच्छ करा.नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे तुमची त्वचा उजळवेल आणि सोबतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसही दूर करेल.
कसा होतो उपयोग - खरंतर मसूर डाळ फेसपॅक तुमची त्वचा टोन करण्यात मदत करतं. सोबतच चेहऱ्यावरील नको असलेले केसही दूर करतं. तर वरील मिश्रणात संत्र्याचं साल घातल्याने चेहरा उजळतोही. त्यामुळे या फेसपॅकसाठी दूध, मसूर डाळ, संत्र्याचं साल आणि चंदनाची पावडर आवश्यक आहे.
कसं वापराल - एक चमचा मसूर डाळ पावडर, 2 चमचे दूध, चिमूटभर हळद आणि 3 थेंब नारळाचं तेल. हे मिश्रण चेहऱ्यावर सगळीकडे समप्रमाणात लावा. दोन मिनिटं तसंच ठेवा मग स्क्रबसारखं चोळून धुवून टाका.
कसा होतो उपयोग - मसूर डाळीतील पोषक तत्त्वांमुळे तुमची त्वचा होईल छानपैकी मऊ आणि मॉईश्चराईज. हा फेसपॅक धुतल्यावर तुम्हालाही फरक जाणवेल.
कसं वापराल - मसूर डाळ आणि मध हे एक उत्तम मिश्रण आहे. जे तुमच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक परिणाम करू शकतं. 2 चमचे मसूर डाळ पावडर, 2 चमचे बेसन, 2 चमचे मध यांची घट्ट पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
काय होतो उपयोग - ही पेस्ट एका नैसर्गिक स्क्रबप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर काम करते. तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन नाहीशी करून तुमची त्वचा उजळण्यास हे मिश्रण उपयुक्त ठरतं. याशिवाय तुम्ही या स्क्रबचा वापर चेहऱ्यासोबतच तुमच्या संपूर्ण शरीरासाठीही करू शकता. मग तुम्हीही घरच्याघरी करून पाहा मसूर डाळ पावडर आणि मधाचा उत्तम फेसपॅक.
मसूर डाळीपासून बनवण्यात येणारं उटणं हे विशेषतः कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. हे उटणं घरच्या घरी तयार करणं खूपच सोपं आहे. तसंच हे उटणं तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या उत्पादनांचीही गरज लागत नाही.
तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा गायब होऊन चेहरा छान मॉईश्चराईज होईल.
तुमच्या मनात मसूर डाळीचा फेसपॅक लावण्याआधी असे काही प्रश्न आहेत का पाहा.
मसूर डाळीचा वापर तुम्ही फेसपॅक किंवा खडबडीत पावडर केल्यास स्क्रब म्हणून करू शकता हे तुम्ही वर वाचलंत. जर तुमच्या चेहऱ्याला हा फेसपॅक सूट झाल्यास तुम्ही त्याचा वापर रोज करू शकता. पण शक्यतो याचा वापर काही दिवसांच्या गॅपनेच करावा. यामुळे तुमची त्वचा एक्सफॉलिएट होईल, चेहऱ्यावरील पोर्स बंद होतील, चेहरा उजळेल आणि चेहऱ्यावरचा टॅनही कमी होईल. तसंच हा फेसपॅक तुमची त्वचा क्लींज करून ती मऊ आणि तेलविरहीत करेल. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील. हा फेसपॅक लावताना नेहमी सर्क्युलर मोशनमध्ये लावा.
पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे मसूर डाळीत उत्तम एक्सफॉलिएट घटक आहेत. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील पोर्स बंद होतात. तसंच टॅन दूर होऊन त्वचा उजळते. मुख्य म्हणजे चेहऱ्यावरील मृत त्वचाही निघून जाते. परिणामी तुमच्या चेहऱ्यावरील तेल कमी होऊन पिंपल्सही कमी होतात.
तेलकट त्वचेसोबतच तुम्ही मसूर डाळीच्या फेसपॅकचा वापर तुम्ही कोरड्या त्वचेसाठीही करू शकता. कोरड्या त्वचेसाठीही तुम्ही मसूर डाळ पावडर, दही आणि पांढरं व्हिनेगर यांचा फेसपॅक करून तो चेहऱ्यासाठी वापरू शकता.
मसूर डाळीची पावडर बाळाच्या त्वचेसाठीही उत्तम आहे. कारण ही कोमलपणे बाळाच्या त्वचेवरील घाण आणि मृत त्वचा नाहीशी करते. पण फक्त बाळासाठी मसूर डाळीची पावडर वापरताना ती मऊ असून खडबडीत नसावी याची खास काळजी घ्या. त्यामुळे बाळांसाठी मसूर डाळीची पावडर एकदम बारीक केलेली असावी.