मुंबईत सध्या छान गुलाबी थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसात आपली धडपड असते ती हातपाय छान गोधडीत सामावून घेण्याची. ज्यामुळे मस्त उबदार वाटतं. एकदा गोधडीत किंवा दुलईत शिरलं की, बाहेर पडणं फारच जीवावर येतं. पण तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का की, गोधडीत गुंडाळूनही बरेचदा पाय थंड पडतात. असं का होतं? जाणून घेऊया या लेखात यामागील कारणं आणि त्यावरील सोपे उपाय.
असं का होतं?
आपले हात आणि पाय तेव्हा थंड पडतात. जेव्हा त्यांना पुरेश्या प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही किंवा रक्ताची गरज पूर्ण होत नाही. ही समस्या सुरळीत रक्तप्रवाह नसल्यामुळेही होऊ शकते. कधी कधी एनिमिया, पायाचं दुखणं, क्रॉनिक फॅटींग सिंड्रोम, नसांशी निगडीत एखादी जखम, हायपोथायरॉईडीजम यासारख्या आरोग्याच्या समस्यांमुळे जास्त थंडीही वाजू शकते. जर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजत असेल किंवा हातपाय गोधडीत गुंडाळून घेऊनही थंड राहत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण काही घरगुती उपाय करून पाहिल्यास तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकते.
जाणून घ्या थंडीमध्ये का येते पाय आणि बोटांना सूज
थंडीत पाय गार पडत असल्यास करून पाहा हे घरगुती उपाय
- गरम तेलाने करा मालीश
मसाज करणं हे हातपाय उबदार ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. पाय आणि हात एकमेंकावर चोळूनही रक्तप्रवाहही सुरळीत होतो आणि ऑक्सीजनची गरजही पूर्ण होते.
- थंडीत राहा हायड्रेट
थंडीमध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका. पूर्ण दिवसात कमीतकमी 2 लीटर पाणी आवर्जून प्यावं. थंड पाणी जास्त प्यायलं जात नाही. त्यामुळे शक्य असल्यास कोमट पाणी प्यायल्यास उत्तम ठरेल. कॅफीनचं जास्त सेवन टाळा आणि त्याऐवजी भाज्यांचं सूप आणि ग्रीन टी प्यावं. हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.
- मीठ घातलेल्या गरम पाण्याने करा आंघोळ
गरम पाण्यात मीठ घाला आणि आपले हातपाय त्यात बुडवून शेक घ्या. तेवढा वेळ नसल्यास तुम्ही गरम पाण्यात मीठ घालून त्याने आंघोळही करू शकता. गरम पाण्याने पायांना उब मिळेल आणि मीठाने शरीराला मॅग्नेशिअम मिळेल. यामुळे तुमचे हातपाय लवकर उबदार होतील.
- आर्यनयुक्त आहाराचं करा सेवन
थंडीच्या दिवसात शरीराला उब मिळण्यासाठी जास्त प्रमाणात आर्यनयुक्त पदार्थांचं सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. शरीरामध्ये आर्यनची कमतरता असल्यास तुम्हाला हुडहुडी भरू शकते. ज्यामुळे जास्त थंडी वाजते. असं होऊ नये म्हणून तुम्ही आर्यनची कमतरता भरण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्यांचं सेवन करा. एनीमियाशी लढण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात खजूर, सोयाबीन, पालक, सफरचंद, सुकवलेले अंजीर, ऑलिव्ह आणि बीटसारखे आर्यनयुक्त पदार्थ खावेत. यातील आर्यनमुळे आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तसंच आर्यन थायरॉईड ग्रंथीचा स्त्रावही संतुलित राहतो.
- घट्ट कपडे घालणं टाळा
थंडाव्यापासून वाचण्यासाठी तुम्ही जास्त आणि घट्ट कपडे घालणं टाळा. कारण यामुळे बाह्यरित्या आपलं थंडीपासून तर रक्षण होतं पण शरीराच्या अंतर्गत रक्तप्रवाहावर मात्र परिणाम होतो. त्यामुळे हे टाळा. थंडी वाजत असल्यास सुती आणि सैलसर कपडे घाला.
पायाचं दुखणं आणि त्यावरील घरगुती उपाय
बेडशीट्स खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी