कोरोना व्हायरसमुळे गेले तीन महिने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनलॉक 2 नंतर आता सर्व पुन्हा पूर्ववत सुरू होत असलं तरी याचा परिणाम यावर्षींच्या गणेशोत्सवावर नक्कीच होणार आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा उत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. अनेक सार्वजनिक गणेशमंडळांनी यावर्षी उत्सवामध्ये त्यानुसार बदल करण्याचा विचार सुरू केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री अमृता रावला लहानपणापासून गणेशोत्सवाबाबत एक विशेष ओढ आहे. म्हणूनच तिने यंदा सर्व गणेशमंडळ आणि गणेशभक्तांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
सार्वजनिक गणेशमंडळाच्या या निर्णयाचे कौतुक
अमृताला गणपती बाप्पाची आराधना करणं खूप आवडतं. दरवर्षी तिची गणेश चतुर्थी एखाद्या गणेश मंडळात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्णच होत नाही. मात्र यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं संकट आलेलं आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी अनेक गणेशमंडळांनी घेतलेल्या सर्व निर्णयांबाबत ती नक्कीच खूश आहे. ज्या ज्या गणेशमंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्याशी सहमत आहे. कारण या गणेशमंडळांनी लोकांच्या आरोग्याचा विचार खऱ्या अर्थाने केला आहे. अमृताच्या मते सर्व सार्वजनिक गणेशमंडळांनी असा निर्णय घेणं आज काळाची गरज आहे. भविष्यात उत्सवाचा आनंद साजरा करायचा असेल तर यावर्षी हा कठोर नियम सर्वांनी पाळायलाच हवा असं तिला वाटत आहे.
मागच्या वर्षीदेखील तिने गणेश विसर्जनानंतर कराव्या लागणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षी ती उत्सवाआधीच लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
घरच्या घरी कसा करावा गणेशोत्सव
अमृताच्या मते महाराष्ट्रात गणेशोत्सव जेवढ्या उत्साहात साजरा केला जातो तेवढ्याच प्रमाणात पर्यावरणाचं नुकसानही होत असतं. त्यामुळे यावर्षी तरी कुणीच गणपती बाप्पाचं विसर्जन सार्वजनिक ठिकाणी जाऊन नक्कीच करू नये असं तिला वाटत आहे. कारण ते यंदा ते सर्वांसाठी घातक ठरू शकतं. त्यापेक्षा पूर्वीप्रमाणे आपण घरीच पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन करायला हवं. प्राचीन काळी गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्या अंगणातील विहीरीत केलं जात असे. ही पद्धत नैसर्गिक असून त्यामुळे निसर्गाचे नुकसान होत नाही. माती अथवा शाडूपासून तयार केलेली मुर्ती मातीमध्ये पुन्हा मिसळली जाते. म्हणूनच यंदाही सर्वांनी आपल्या घरी अथवा बाल्कनीमध्ये एखाद्या छोट्या पिंपात गणपती विसर्जन करावे. ज्यामुळे सोशल डिस्टंस पाळणे आणि पर्यावरणाची काळजी अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील. शिवाय साध्या पद्धतीने घरच्या घरी प्रत्येकाला गणेशोत्सवाचा आनंदही घेता येईल.
पर्यावरण आणि गणेशोत्सव
अमृताच्या मते निसर्गाने स्वतःचे संतुलन राखण्यासाठी सर्वांना या महामारीत घरी बसवले आहे. ज्याचा परिणाम आता चांगलाच दिसू लागला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी, तलाव माणसाचा हस्तक्षेप आणि प्रदूषण कमी झाल्यामुळे पुन्हा स्वच्छ झाले आहेत. निसर्गाच्या या बदलाचा आपण आदर राखायला हवा. गणेशोत्सवामध्ये निसर्गाच्या संरक्षणाचे नियम पाळून माणसाने या सुसंधीचा फायदा घ्यायला हवा. त्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये सांगितल्याप्रमाणे इकोफ्रेंडली गणेशमुर्ती बनवण्याचा सल्ला सर्वांना दिला आहे. ज्यामुळे खऱ्या अर्थाने निसर्गरूपी बाप्पा माणसावर प्रसन्न होऊन सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्याची बरसात करेल.
अधिक वाचा –
लॉकडाऊनमध्ये या टीव्ही अभिनेत्याने गुपचूप केले लग्न
अभिनेत्री अवनीत कौरची इमोशनल गुडबाय नोट, अलाद्दीन मालिकेमधून घेतली एक्झिट