घरी राहून आतापर्यंत अनेक पदार्थ तुम्ही करुन पाहिले असतील. पण तुम्ही कधी बेकिंग करताना ‘लादी पाव’ हा प्रकार करुन पाहिला आहे का? बेकरीवर मिळतो तसा लुसलुशीत पाव तुम्हाला घरी एकदम सोप्या पद्धतीने करता येऊ शकतो. लादी पावचे अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतर मी ही अशाच पद्धतीने पाव करुन पाहावा म्हणून ही रेसिपी घरी ट्राय केली आणि अगदी बाजारात मिळतो तसाच लुसलुशीत पाव तयार झाला. पहिल्यांदा ही रेसिपी करताना थोड्या चुका झाल्या पण या चुका लक्षात आल्यानंतर लादी पाव बनवणे फारच सोपे वाटू लागले. आज मी तुमच्याशी परफेक्ट लादी पावची हीच रेसिपी शेअर करणार आहे. चला करुया सुरुवात
वजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी
लादीपावची तयारी करताना
लादीपाव करायचा विचार मनाशी पक्का झाला असेल तर ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्वतयारी करायला हवी. लादीपाव करण्यासाठी तुम्हाला मैदा, साखर,बटर किंवा लोणी, मीठ, चांगल्या क्वालिटीचे यीस्ट, लादीपावसाठी योग्य भांड, मायक्रोव्हेव किंवा कुकर. अशी तयारी तुम्ही करुनच ठेवायला हवी. याशिवाय जर तुमच्याकडे ते करण्यासाठी पुरेसा वेळही हवा. कारण ही रेसिपी जमेपर्यंत करणे थोडे कठीणच असते.
तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा
असा बनेल परफेक्ट लादीपाव
- दोन कप मैदा, दीड चमचा यीस्ट, ¼ कप कोमट पाणी, 1 टी स्पून साखर, मीठ, पाणी, बटर (आता जे माप आपण घेत आहोत त्यामध्ये साधारण 10 पाव बनतील.)
- सगळे साहित्य अगदी मापानुसार काढून घ्या. एका भांड्यात ¼ कप मापून कोमट पाणी घ्या. हे पाणी इतके गरम हवे की, तुमचा हात यामध्ये भाजणार नाही. पाणी जर खूप गरम असेल तर यीस्ट यामध्ये अजिबात फुलणार नाही. पाणी योग्य पद्धतीने कोमट असेल की त्यामध्ये दीड चमचा मोजून यीस्ट घाला. एक टी स्पून साखर घालून अगदी हलक्या हाताने ढवळून घ्या आणि झाकून साधारण 15 मिनिटांसाठी ठेवून द्या.
- 15 मिनिटांनी यीस्ट चांगले फुलून येईल. जर यीस्ट फुलले नसेल तर ते यीस्ट वापरु नका. कारण त्याचा काहीही उपयोग नाही. यीस्ट पुन्हा एकदा भिजत घाला. जर पुन्हा तसेच झाले तर तुम्ही वापरत असलेले यीस्ट चांगले नाही किंवा जुने झाले आहे. त्या ऐवजी दुसरे यीस्ट वापरा.
- एक परात किंवा पसरट भांडे घेऊन त्यात मैदा चाळून घ्या. त्यात मीठ आणि फुललेले यीस्ट घालून हलक्या हाताने मळायला घ्या. असे करताना लागेल त्या नुसार पाणी घ्या.
- यीस्ट घातल्यानंतर पिठ नेहमीच थोडं चिकचिकीत होतं. त्यामुळे खूप पाणी घालून तो आणखीन चिकट करु नका. यीस्ट पिठात अॅक्टिव्ह होत असल्यामुळे ते तुम्हाला चिकट लागत राहील. पण तुम्ही साधारण 15 ते 20 मिनिटं एकजीव होईपर्यंत मळत राहा.मैदा चांगल्या पद्धतीने मळणं हे पावासाठी फार गरजेचे असते.
- मैद्याचा छान एकजीव गोळा झाला की, त्यावर एखादा टोप किंवा एखाद्या खोलगट भांड्यात ठेवून ते भांड साधारण 2 तासासाठी झाकून ठेवा. जर तुम्हाला हे थोडं पटकन करायचं असेल तर तुम्ही मायक्रोव्ह प्रिहिट करुन त्यामध्ये काही काळासाठी ठेवून द्या. क्रिया पटकन होईल.
- पिठ दुप्पट झाल्यावर ते बाहेर काढून पुन्हा छान मळून घ्या. साधारण 10 मिनिटं अजून छान मळून घ्या. त्यानंतर पिठाचे समान गोळे करुन ते खालच्या बाजून टक करायला विसरु नका.
- ट्रेमध्ये थोडा मैदा भुरभुरुन किंवा बटरचा हात लावून त्यावर एक एक गोळा दूर दूर ठेवा. आता पुन्हा हा ट्रे वेगळा ठेवून द्या. साधारण 30 मिनिटांनी तुम्हाला टिनमध्ये विकतच्या लादीपावाप्रमाणे लादी तयार झालेली दिसेल. त्यावर छान ग्लेझ यावा म्हणून हलक्या हाताने त्यावर दूध लावा.
- आता मायक्रोव्हेव 180 वर प्रीहिट करुन घ्या. 22 ते 25 मिनिटं पाव भाजून घ्या. पाव शिजत असताना तुम्हाला त्याचा छान बेकरीसारखा वास येईल.
- पाव शिजल्यानंतर त्यावर छान गरम असतानाचा बटर सोडा. एक स्वच्छ ओला कपडा त्यावर ठेवा आणि ट्रे थंड होण्याची वाट बघा.
- ट्रेमधून काढा. तुमचा लुसलुशीत लादी पाव तयार
तुम्ही ही नक्की ट्राय करुन बघा आणि आमच्यासोबत तुम्ही बनवलेल्या लादीपावचा फोटो शेअर करा.