सुखी आणि समाधानी संसार हे अनेकांचे स्वप्न असतं. मात्र त्यासाठी गरज असते ती योग्य, समजूतदार आणि प्रेमळ जोडीदाराची…जोडीदार मनासारखा असेल तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीला सहज तोंड देण्याचं बळ मिळतं. चांगला जोडीदार मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे हे खरं असलं तरी नातं (Relationship) टिकवणं आपल्याच हातात आहे. नात्याची वीण ही नेहमी दुहेरी असते त्यामुळे यात दोघांचही सूत चांगलं जमलं पाहिजे. यालाठीच नातं टिकवण्यासाठी दोघांनीही तितकेच प्रयत्न करायला हवेत. तुमचे तुमच्या जोडीदाराशी कसं नाते आहे आणि तुमचे हे नातं मजबूत, दृढ आहे का ओळखण्याचे हे संकेत अवश्य तपासून बघा.
तुम्हाला नात्यात तुमची स्वतःची स्पेस आहे
तुमचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे याचा अर्थ तुम्ही प्रत्येक क्षण एकत्र घालवायलाच हवा असं नाही. कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला त्याची स्पेशल स्पेस असायलाच हवी. तुमच्या आवडीनिवडी, तुमची इतर नाती, मित्रमंडळी तुम्हाला उत्साहित ठेवत असतात. त्यामुळे जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असताना स्वतःची अशी स्पेस मिळत असेल तर तुमचे नाते खरंच हेल्दी आहे. एक कपल असूनही तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करत आहात हेच यावरून समजत असतं.
तुम्ही आहात तशा तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला आवडता
कोणतेही हेल्दी रिलेशनशिप हे वास्तवतेवर अवलंबून असते. थोडक्यात तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला सतत आवडत राहायला हवं. अचानक तुमच्याकडे पैसे आल्यावर अथवा गमावल्यावर, तुम्ही आई झाल्यावर अथवा त्यात अपयशी झाल्यावर, तुमचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्यावर अथवा मोडल्यावर, तुम्हाला मानसन्मान मिळणं सुरू झाल्यावर अथवा कमी झाल्यावर तुमच्या नात्यात बदल होत असतील तर हे नातं मजबूत नाही हे वेळीच ओळखा. कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मिळेलच असं नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत तुमच्या स्वतःवरील आणि जोडीदारावरील प्रेमात फरक पडता कामा नये.
तुम्ही दोघंही कोणताही निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेता
प्रत्येकाच्या आवडी-निवडी, इच्छा- अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. मात्र रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही एकमेकांना समजून घेत तुमच्या आयुष्याचे निर्णय घेत असाल तर तुमचे नाते खरंच दृढ आहे. लग्न कधी करायचं, मुलं किती असायला हवीत, घर कसं असायला हवं, पैसे कुठे गुंतवायचे अशा अनेक गोष्टीत जर तुम्ही दोघं एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेत असाल तर तुमचे नात्यातील बॉंडिग कायम टिकेल.
तुम्ही दोघं कोणत्याही परिस्थितीत आनंदी असता
सुखी समाधानी आयुष्यासाठी तुम्ही एकमेकांसोबत छान वेळ घालवणं अपेक्षित आहे. जर एखाद्या जोकवर तुम्ही मिळून खळखळून हसत असाल, एकत्र जेवण करत असाल, एकत्र सिनेमा पाहत असाल, एकमेकांच्या आवडीनिवडीमध्ये रस घेत असाल, तुमचे विचार एकमेकांशी जुळत असतील, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुम्ही सांगण्याआधी तुमच्या जोडीदाराला समजत असेल तर याचा अर्थ आता तुमचे नाते चांगलेच मुरू लागले आहे.
तुम्हाला नात्यात बॅलंस राखता येतो
आयुष्यात चढ-उतार प्रत्येकाच्याच येतात. मात्र कोणत्याही क्षणी तुमचा तोल जात नसेल आणि तुम्ही तुमचे नाते व्यवस्थित बॅलंस करू शकत असाल तर ही हेल्ही रिलेशनशिपची खूण आहे हे ओळखा. कारण कधी कधी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईलच असं नाही, कधी कधी तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी काही गोष्टी कराव्या लागतील मात्र त्या करताना तुमच्या नात्यातील बॅलंस तुम्हाला राखता यायला हवा. लक्षात ठेवा नात्यात अती आग्रह आणि अपेक्षा प्रत्येकासाठी त्रासदायक ठरतात.
तुम्ही एकमेकांना माणूसकीची वागणूक देता
एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि जोडीदाराला समजूतदारपणे वागवणं ही एक कलाच आहे. चांगल्या नात्याची सुरूवात अशा छोट्या छोट्या गोष्टीतून होत असेल. जर तुमचा जोडीदार तुम्हाला सतत आदराचे आणि महत्त्वाचे स्थान देत असेल तर यापेक्षा आणखी चांगली गोष्ट काय असू शकते.
तुमचा एकमेकांवर दृढ विश्वास आहे
कोणतेही नाते हे प्रेम,विश्वास आणि प्रामाणिकपणावर टिकत असते. ज्यांचे एकमेकांवर प्रेम आहे त्यांचा एकमेकांवर विश्वासही असायलाच हवा. तुमच्यामध्ये कोणतेही गुपित नाही किंवा कोणीही जोडीदाराचे कान भरले तरी त्याचा तुमच्यावरील विश्वास कमी होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये नक्की आहात.
तुम्हाला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं असं वाटतं
जोडीदार तुमच्या उणीवा काढणार मग तुम्ही त्याच्यासाठी कमी जास्त बोलणार अशी नाती नक्कीच हेल्दी असू शकत नाही. नात्यात काही गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करता यायला हवं. कारण जगात कुणीच कधीच परफेक्ट नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी उणीवा असतातच. मात्र अशा गोष्टींकडे तुम्ही दोघंही दुर्लक्ष करू शकत असाल तर ही तुमच्या नात्यातील बॉंडिंगची फर्स्ट स्टेप आहे.
तुम्ही नेहमी एकमेकांशी जवळीक साधता
एखाद्या हेल्दी रिलेशनशिपसाठी शारीरिक जवळीकही तितकीच महत्त्वाची आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही तुम्हाला एकमेकांबद्दल पहिल्यासारखीच ओढ वाटत असेल तर हे नातं खूप वर्ष टिकू शकतं. त्यामुळे तुमच्या नात्यात सेक्सलाईफही तितकेच महत्त्वाचे आहे हे ओळखा. जोडीदाराला सुखी ठेवण्यासाठी त्याला तुमच्या प्रेमाचा स्पर्श सतत व्हायला हवा.
तुमचं नातं ही तुमच्यासाठी एक सुरक्षित जागा आहे
जगात अनेक वाईट आणि क्रूर गोष्टी भरलेल्या आहेत. त्यामुळे अशी एक जागा आपल्या आयुष्यात असावी जिथे आपल्याला सर्वात जास्त सुरक्षित वाटेल असं प्रत्येकाला वाटत असतं. जोडीदार हा तुमच्यासाठी सतत एक सुरक्षित व्यक्ती असायला हवं. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मनमोकळेपणाने कधीही आणि काहीही बोलू शकत असाल तर हे नाते खरंच हेल्दी आहे. यासाठी दररोज रात्री तुमच्या मनातील भावना तुमच्या जोडीदाराजवळ व्यक्त करा. ज्यामुळे त्याच्या कुशीत तुम्हाला नेहमीच सुरक्षित आणि उबदार वाटेल.
तुम्हाला कोणतीही गोष्ट सर्वात आधी तुमच्या जोडीदाराला सांगाविशी वाटते
तुमच्या आयुष्यात काही घडलं तरी ती गोष्ट इतर कुणाला सांगण्याऐवजी जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला ती सर्वात आधी सांगावी असं वाटत असेल तर तुमचा नात्याती बॉंड दृढ आहे. याचा अर्थ तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी यांच्यापेक्षा जास्त तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवता.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा –
सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स (Tips For Happy Married Life)
तुमचा जोडीदार असेल रागीट तर कसे टिकवाल तुमचे नाते
रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या