दिवाळीचा खास फराळ, मराठमोळ्या फक्कड रेसिपीज (Diwali Faral Recipes In Marathi)

दिवाळीचा खास फराळ, मराठमोळ्या फक्कड रेसिपीज (Diwali Faral Recipes In Marathi)

दिवाळी म्हटलं की सरकन डोळ्यासमोरून कंदील, रोषणाई, आनंद आणि येतो तो दिवाळी फराळ. दिवाळी येणार म्हटलं की आठवडाभर आधीपासूनच सुरू होतो तो घराघरातून येणारा दिवाळीच्या फराळाचा सुगंध. दिवाळी फराळाचे पदार्थ आपल्याकडे इतके असतात की प्रत्येक घरात याची रेलचेल असते. कितीही वेळ नसला तरीही वेळात वेळा काढून किमान चकली, चिवडा आणि लाडू आणि दिवाळी फराळ शंकरपाळे हे तरी घरात केले जातेच. दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे तोंडाला पाणीच सुटते. या दिवाळीसाठीही अशाच काही दिवाळी फराळ रेसिपी (diwali faral recipes in marathi) आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. दिवाळी फराळांची आपल्या महाराष्ट्रीयन लोकांकडे एक प्रकारची यादीच (diwali faral list in marathi) असते. जी संपता संपत नाही आणि आपण प्रत्येक दिवाळीला घरात ही फराळाची यादी पूर्ण करण्याचा प्रयत्नही नक्की करत असतो. कारण आपल्याला त्याशिवाय दिवाळी पूर्ण झाली आहे असं वाटतच नाही. असेच काही खास पदार्थ आणि त्याच्या रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मग वाट कसली पाहताय लागा आता तयारीला.

Table of Contents

  चकली (Chakli)

  चकली हा असा पदार्थ आहे ज्याशिवाय दिवाळीचा फराळ सुरूच होत नाही. इतर काही नसलं तरी चालेल पण चकली मात्र हवीच. तांदळाची, भाजाणीची अशा वेगवेगळ्या चकली तयार केल्या जातात. पारपंरिक चकलीची रेसिपी काय आहे आपण जाणून घेऊया. चकलीची वेगळी भाजणी या दिवसात आपल्याला बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करूनही वेळ वाचवून घरी चकल्या करू शकता अथवा घरच्या घरीही तुम्हाला हे तयार करता येतं. आम्ही इथे तुम्हाला भाजणी आणि तांदूळ पीठ दोन्हीच्या चकल्यांची रेसिपी सांगणार आहोत. 

  Instagram

  भाजणीच्या चकली

  साहित्य

  • दोन किलो तांदूळ
  • एक किलो हरभरा डाळ
  • अर्धा किलो उडीद डाळ
  • 100 ग्रॅम धणे
  • 50 ग्रॅम जिरे
  • चवीपुरते मीठ
  • तेल (तळण्यासाठी आणि मोहनाकरिता) 

  कृती 

  • तांदूळ स्वच्छ धुवा आणि कपड्यावर वाळत घाला. हरभरा डाळ आणि उडीददेखील वेगवेगळे धुवा आणि कपड्यावर वाळवून घ्या
  • पूर्ण एक दिवस वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी कढईमध्ये हे तिन्ही वेगवेगळे यामध्ये धने घालून भाजून घ्या.  सर्व भाजून झाल्यावर त्यात जिरे मिसळा 
  • त्यानंतर त्याची भाजणी तयार करा
  • भाजणी मध्ये तेल अथवा तुपाचे मोहन भिजवताना घाला. भाजणी भिजवताना गरम पाण्याचा वापर करावा.  खूप घट्ट अथवा सैल मळू नये अन्यथा चकली कडकडीत होते
  • चकलीपात्रात मळलेले पीठ घालून नंतर व्यवस्थित त्या चकल्या पाडा आणि तेल व्यवस्थित तापले आहे की नाही ते पाहूनच मग तळायला घ्यावे
   चकली काढल्यानंतर थंड झाल्यावरच डब्यात भरावी

  तांदळाच्या पिठाच्या चकली

  Instagram

  साहित्य

  • दोन वाट्या तांदूळ पीठ
  • हिंग
  • धने - जिरे पावडर 1-1 चमचा 
  • पाव वाटी लोणी 
  • पांढरे तीळ
  • ओवा, 
  • चवीपुरते मीठ
  • अर्धा चमचा तिखट

  कृती 

  • तांदळाच्या पिठामध्ये सर्व साहित्य  मिक्स करून घ्या
  • साध्या पाण्याने हे पीठ घट्ट भिजवा 
  • चकल्या पाडा आणि तळा 

  चिवडा (Chiwada Recipe In Marathi)

  Instagram

  दिवाळीमध्ये घराघरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा करण्यात येतो. पोहे, कुरमुरे अशा विविध वस्तूंचा चिवडा आपल्याला खायला मिळतो. पोह्यांचा चिवडा सर्रास सर्व घरांमध्ये दिवाळीमध्ये करण्यात येतो. यामध्ये नायलॉन चिवडा,  पोहे चुरमुरे  चिवडा अशा अनेक चिवड्यांचा समावेश आहे. आपण यावेळी घरोघरी करण्या येणाऱ्या दिवाळीच्या फराळापैकी चिवड्याची रेसिपी जाणून घेऊ

  साहित्य

  • अर्धा किलो पातळ पोहे
  • अर्धी वाटी डाळं (भाजलेली चणाडाळ)
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • सुक्या खोबऱ्याचे बारीक काप पाव वाटी
  • कडिपत्ता
  • हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • मीठ 
  • साखर
  • काजू, बेदाणे (हवे असल्यास)

  कृती 

  • पातळ पोहे तुम्ही आधी उन्हात वाळवून घ्या आणि मग पातेल्यात व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या 
  • कढईत तेल घ्या. त्यामध्ये शेंगदाणे, डाळं आणि काजू, सुकं खोबऱ्याचे तुकडे घाल आणि व्यवस्थित भाजा
  • त्यानंतर ते बाहेर काढा आणि त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरच्या हे घालून वरून पुन्हा शेंगदाणे आणि इतर साहित्य घालून ढवळावे आणि खमंग वास सुटल्यावर भाजलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर ढवळावे

  कणीक लाडू (Kanik Ladoo)

  Instagram

  दिवाळीच्या फराळामध्ये कणीक लाडूचाही समावेश होतो. कणकेचे लाडू बनवणं इतर लाडूच्या तुलनेत अत्यंत सोपे आहे. यासाठी जास्त तयारीही करावी लागत नाही. हे पटकन होतात आणि पौष्टिकही आहेत. तुम्हाला कामातून वेळ मिळत नसल्यास दिवाळीच्या फराळासाठी तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता. 

  साहित्य 

  • 4 वाट्या कणीक
  • 1 वाटी सुके किसलेले खोबरे (बारीक करून घ्या)
  • 3 वाट्या गूळ (चिरलेला)
  • लहान चमचा जायफळ पावडर
  • 2 चमचे खसखस भाजून केलेली पावडर
  • साजूक तूप अडीच वाटी

  कृती 

  • पहिल्यांदा बारीक केलेले खोबरे भाजावे
  • त्यानंतर दुसऱ्या कढईत तूप घाला आणि त्यावर कणीक भाजून घ्या. गव्हाळसर रंग आला की, थांबवा 
  • कणीक खमंग भाजल्यावर खाली उतरवा आणि त्यात खोबरे, खसखस,  जायफळ पावडर, गूळ घालून मिक्स करा आणि लाडू वळा. 
  • थोडं कोरडं वाटल्यास, तुम्ही तूप वाढवू शकता

  खजूर लाडू (Khajoor Ladoo)

  Instagram

  दिवाळीचा हा सण म्हणजे खाण्याचीही रेलचेल. खजूराचा लाडू हा अत्यंत पौष्टिक असतो. इतर सगळ्या त्याच त्याच फराळाचा कंटाळा आला असेल तर यावर्षी खजुराचे लाडू नक्की करून पाहा. हा लाडू जेवणानंतर खाल्ल्यास, अशक्तपणा निघून जातो. शरीरात लोहाचे प्रमाण वाढते आणि डोळ्यांसाठीही तितकेच उपयुक्त आहे. 

  साहित्य 

  • बिया काढलेला 1 वाटी खजूर 
  • अर्धी वाटी दाण्याचे कूट 
  • 5-6 बदाम 
  • 5-6 काजू 
  • वेलची पूड 
  • 1 चमचा भाजलेले तीळ 
  • 1 चमचा भाजलेली खसखस 
  • पाव वाटी पिठी साखर 
  • 3-4 चमचे खरवडलेले सुके खोबरे 

  कृती 

  • वर दिलेले सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या
  • खजुरामुळे हे सर्व मऊ होते 
  • जास्त बारीक वाटून नये. हे सर्व मिश्रण लाडू स्वरूपात वळावे. प्रत्येक लाडूवर बदाम आणि काजू लावावा आणि मग खोबऱ्यात घोळवावा

  तांदळाच्या पिठाचे कडबोळे (Rice Flour Kadboli)

  Instagram

  भाजणीचं कडबोळे करण्यात येते. पण दिवाळीच्या या फराळात तांदळाच्या पिठाचे कडबोळे करता येते हे तुम्हाला माहीत आहे का? कडबोळे करायाला वेळ लागत असला तरीही हे खायची मजाच काही वेगळी आहे. 

  साहित्य 

  • 2 वाट्या तांदळाचं पीठ 
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा जिरेपूड
  • पाव वाटी लोणी 
  • चवीनुसार मीठ
  • कांद्याचे बी
  • अर्धा चमचा तिखट
  • पीठ भिजविण्यासाठी दूध
  • तळण्यासाठी तेल

  कृती 

  • तांदळाच्या पिठामध्ये हिंग, जिरेपूड, कांद्याचे बी अर्थात कलौंजी, मीठ आणि लोणी घालून नीट मिक्स करून घ्या
  • दूध घालून पीठ घट्ट भिजवून द्या
  • थोडा वेळ पीठ तसंच राहू द्या. कडबोळी वळून तेलात तळा

  तिखट शंकरपाळे (Spicy Shankarpale)

  Instagram

  दिवाळी फराळ शंकरपाळे ठरलेला असतो. मैद्याने बनणारे गोड शंकरपाळे आपल्याला माहीत आहेत.  या दिवाळीला बनवा तिखट शंकरपाळे. तिखट शंकरपाळे बनविणे सोपे आहे आणि मुळात हे गव्हाच्या पिठाचे बनवता येतात. 

  साहित्य 

  • 2 वाट्या गव्हाचे पीठ
  • दीड चमचा साखर
  • चिमूटभर हळद
  • मीठ 
  • जिरे
  • तिखट
  • तळण्यासाठी तेल

  कृती 

  • गव्हाच्या पिठात वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि पाण्याने पीठ घट्ट भिजवून घ्या 
  • गोळे करून लाटा आणि कातणीने बारीक शंकरपाळ्या करून घ्या 
  • मंद आचेवर तेलात तळा. हे तिखट शंकरपाळे खुसखुशीत होतात

  ओल्या नारळाच्या करंज्या (Karanji)

  Instagram

  सुके खोबरे, मैदा आणि पिठी साखरेच्या सुक्या करंज्या आपण नेहमीच दिवाळीच्या फराळाला खातो. पण मैदा हा आरोग्यासाठी तितका चांगला नाही. त्यामुळे तुम्ही ओल्या नारळाच्या करंज्यादेखील दिवाळीला करू शकता. 

  साहित्य 

  • ओलं खोबरं (एक नारळ)
  • चिरलेला गूळ
  • वेलची पावडर
  • काजू - बदाम - बेदाणे (हवे असल्यास)
  • तूप
  • गव्हाचे पीठ
  • मीठ
  • पाणी 

  कृती

  • कणीक मळून घ्या आणि कापडाखाली झाकून ठेवा 
  • एका भांड्यात ओलं खोबरं आणि गूळ एकत्र करून ते भाजून घ्या. व्यवस्थित मिक्स झाले की त्यात वेलची पावडर, काजू, बदाम आणि बेदाणे घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या
  • कणेकेचे गोळे करून छोटी पोळी  लाटा आणि त्यात हे सारण भरा आणि करंजीच्या आकारात तयार करा 
   तेल गरम करून मंद आचेवर या करंज्या तळा 

  चंपाकळी (Chapakali)

  Instagram

  चंपाकळी हा खरं तर अगदी जुना दिवाळीचा फराळ आहे. आपल्याकडे आता बाहेरून मिठाई आणण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला घरच्या घरी जर मिठाई करायची असेल तर तुम्ही हा फराळ नक्की करून पाहा

  साहित्य 

  • 1 वाटी मैदा,
  • मोहन - 2 चमचे तेल किंवा तूप 
  • 1 वाटी साखर
  • तळण्यासाठी तेल

  कृती 

  • मैद्यात मोहन घालून थोडे घट्ट भिजवून ठेवावी अर्धा तास
  • साखरेचा एकतारी पाक करून ठेवायचा, पाकात थोडा केशरी रंग घालायचा
  • मैद्याच्या पुरी लाटून मधे कापायची 
  • केलेली पुरी दोन बाजूला धरुन उलट सुलट अलगद पीळ भरायचा नंतर मंद गॅसवर तळून घ्यावे आणि पाकात टाकावे ती चाफा कळी सारखी दिसते म्हणून ती चंपाकळी

  बेसन लाडू (Besan Ladoo)

  Instagram

  दिवाळीच्या फराळात बेसन लाडू अथवा रवा लाडू नाही असं फार कमी घरांमध्ये दिसून येतं. एकवेळ रवा लाडू नसेल. पण बेसन लाडू तर हवेतच. दिवाळीच्या फराळातील हे बेसनचे तुपातील उत्तम खमंग लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी जाणून घेऊया

  साहित्य 

  • बेसन 
  • तूप
  • पिठी साखर
  • बेदाणे 
  • वेलची पूड 
  • दूध 

  कृती 

  • तुपावर बेसन खमंग भाजून घ्यावे. गॅस मंद ठेवावा अन्यथा पीठ जळण्याची शक्यता असते
  • पीठ भाजून झाले की त्यावर थोडेस दूध शिंपडून बाजूला ठेवावे
  • मिश्रण कोमट झाले की त्यात पिठी साखर, वेलची पूड, बेदाणे घालून पुन्हा एकदा हलकेसे भाजून घ्या
   नंतर लाडू वळून घ्या आणि सुकू द्या 

  अनारसे (Anarase)

  Instagram

  अनारशाचा घाट खूपच मोठा असतो त्यामुळे चविष्ट असूनही दिवाळीला घरात अनारसे बनवले जात नाहीत.  पण तुम्ही आम्ही सांगितलेल्या सोप्या पद्धतीने नक्कीच अनारसे घरच्या घरी बनवू शकता. 

  साहित्य 

  • एक वाटी तांदूळ
  • किसलेला गूळ 
  • एक चमचा तूप
  • खसखस 
  • तळण्यासाठी तेल

  कृती 

  • तीन दिवस तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा.  रोज सकाळी याचे पाणी बदला
  • चौथ्या दिवशी तांदूळ कोरडे करून घ्या आणि मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्या
  • किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाका. सर्व एकत्र करून घट्ट मळून घ्या 
  • हा तयार केलेला गोळा तुम्ही चार ते पाच दिवस एका डब्यात ठेऊन द्या 
  • पाच दिवसांनी बाहेर काढून मळून घ्या. त्याचे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटा आणि त्यावर खसखस घालून ते तेलात अथवा तुपात तळा
  • लक्षात ठेवा तळताना पुरीची बाजू बदलू नका अन्यथा खसखस सगळी तेलात उतरते. मध्यम आचेवर नीट अनारसे तळून घ्यावे 

  टीप - हे पीठ जितके जास्त दिवस ठेवाल तितका अनारसा अधिक चांगला होतो. 

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक