ओल्या नारळाची रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी (Olya Naralachi Recipe In Marathi)

olya naralachi recipe in marathi

ओल्या नारळाची रेसिपी सहसा कोणाला आवडत नाहीत असं होत नाही. आपल्याकडे बऱ्याच भाज्यांमध्ये अथवा पदार्थांमध्ये ओलं खोबरं घालण्याची पद्धत आहे. तर ओल्या नारळाच्या काही खास रेसिपीही (olya naralachi) आपल्याकडे केल्या जातात. नारळाची वडी (naralachi vadi) असो वा नारळी भात असो आपल्याकडे प्रत्येक सणाला काही ना काही खास असतं आणि त्यामध्ये ओल्या नारळाची रेसिपी दाखवा (coconut recipe in marathi) असं आता सांगणारेही खूप आहेत. कारण कालांतराने या रेसिपी मागे पडू लागल्या आहेत असंही काही जणांना वाटत आहे. पण या लेखातून आम्ही तुम्हाला ओल्या नारळाची रेसिपी देणार आहोत. असे अनेक पदार्थ तयार करता येतात. त्याची खास रेसिपी तुम्हाला यातून कळेल आणि तुम्हीही या ओल्या नारळाच्या रेसिपी घरच्या घरी करून पाहू शकता. विशेषतः कोकणातील व्यक्तींना हे पदार्थ खूपच आवडतात आणि ज्यांना कोकणातील पदार्थ आवडतात पण त्याची रेसिपी माहीत नाही, त्यांच्यासाठी हा खास लेख. 

Table of Contents

  ओल्या नारळाची करंजी (Olya Naralachi Karanji Recipe In Marathi )

  Instagram

  साधारण दिवाळीच्या वेळेला फराळात करंजी जास्त करण्यात येते. पण घरात असलेले नवरात्र असो अथवा कोणताही कार्यक्रम असो. पटकन तयार होणारा पदार्थ म्हणजे नारळाची करंजी. पाहूया कशी करायची. 

  लागणारे साहित्य

  • आवरणासाठी 1 कप मैदा (मैदा नको असेल तर गव्हाचे पीठही चालते, त्यात रव्याचा वापर करू नये)
  • अर्धा कप बारीक रवा 
  • 2 चमचा साजूक तूप
  • चिमूटभर मीठ
  • चवीपुरती साखर
  • पिठानुसार भिजवायला दूध 
  • तळण्यासाठी तेल अथवा तूप
  • सारणासाठी खवलेला ओला नारळ
  • गूळ कापलेला अथवा किसलेला 
  • चवीपुरते मीठ 
  • वेलची पूड 

  तयार करण्याची कृती 

  • सर्वप्रथम परातीमध्ये मैदा आणि रवा घेऊन त्यात मीठ, साखर आणि थंड तूप घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या
  • दुधाने हे पीठ भिजवा आणि अगदी घट्ट अथवा अगदी पातळ असे करू नका. मध्यम स्वरूपात भिजवा आणि साधारण अर्धा तास ओलसर कपड्याखाली झाकून ठेवा 
  • दुसऱ्या बाजूला एका कढईत खोबरं अर्थात ओला नारळ, गूळ हे मंद गॅसवर भाजा. त्याला थोडं पाणी सुटायला लागलं की त्यात मीठ आणि वेलची पूड घाला आणि हे सारण तयार करा. नंतर हे सारण तयार झाल्यावर थंड होऊ द्या. तुम्हाला हवं तर तुम्ही यात बदाम, काजू, बेदाणे तुकडे करून घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही खवाही यात घालू शकता. याची चव अधिक चांगली लागते 
  • पिठाचा गोळा अर्धा तासानंतर पुन्हा नीट मळून घ्या आणि मग त्याचे गोळे करा आणि ते लाटून त्यात सारण भरा आणि करंजीचा आकार करून ते मंद आचेवर तेलात अथवा तुपात तळा

  टीप: करंजी अधिक चांगली आणि चविष्ट हवी असेल तर तुम्ही सारण जास्त भरावे. पण फुटेल इतके भरू नये. गरमागरम खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या खायला द्याव्यात

  ओल्या नारळाचे लाडू (Olya Naralache Ladoo)

  Instagram

  मधल्या वेळात लागणारी भूक शमविण्यासाठी ओल्या नारळाचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही घरात हे लाडू करू शकता आणि हे करायला अत्यंत कमी वेळ लागतो आणि घरातल्या साहित्यानेच हे लाडू तयार करता येतात. 

  लागणारे साहित्य

  • ओले खोबरे खवलेले
  • पाव कप पिठी साखर
  • मनुका
  • बदाम 
  • 2 चमचे मिल्क पावडर
  • 1 वाटी दूध 
  • वेलची पावडर
  • पाऊण चमचा मलई 

  तयार करण्याची कृती 

  • कढई मंद गॅसवर ठेवा. त्यामध्ये दूध घालून त्यात खोबरं घाला आणि ते आटवा
  • आटत आल्यावर त्यात मलई घाला. यामुळे खोबरं मऊ राहतं
  • मग त्यात पिठी साखर, मनुका, वेलची पावडर, मिल्क पावडर घालून मिक्स करा आणि साधारण 5 मिनिट्स पुन्हा आटवा. जेणेकरून त्यातला ओलेपणा कमी होईल
  • मिश्रण गोळा होऊ लागलं की, गॅसवरून उतरवा. कोमट झाल्यावर त्याचे लाडू वळा आणि त्यावर बदाम लावा 

  टीप: लक्षात ठेवा हे लाडू साखरेच्या पाकात बनवलेले नाहीत. पिठीसाखर असल्याने हे लाडू मऊच राहतात. त्यामुळे लहान मुलांपासून ते आजीआजोबा सर्वांनाच खाता येतात

  ओल्या नारळाचे मोदक (Olya Naralache Modak Recipe In Marathi)

  Instagram

  गणेशोत्सव हा ओल्या नारळाच्या मोदकाशिवाय अपूर्णच आहे. पण गणपतीशिवायही दर महिन्याला संकष्टीलाही बऱ्याच घरांमध्ये ओल्या नारळाचे अर्थात उकडीचे अथवा गव्हाच्या पिठाचेही मोदक करण्यात येतात. उकडीऐवजी गव्हाच्या पिठाचे मोदक सोपे आणि हे तळून खाल्ल्यावर अधिक चव येते. 

  उकड काढण्यासाठी लागणारे साहित्य 

  • अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ
  • 2 ग्लास पाणी 
  • चवीपुरते मीठ 
  • तूप 
  • तेल (उकड मळण्यासाठी तेल जास्त प्रमाणात लागते. तसंच मोदक बनवताना पाकळ्या करतानाही हाताला तेल लावावे  लागते)

  सारणासाठी लागणारे साहित्य

  • एक नारळ
  • पाव किलो गूळ
  • खवा (आवडीनुसार)
  • वेलची पावडर 
  • सुका मेवा

  तयार करण्याची कृती 

  उकड काढण्यासाठी कृती 

  • आंबेमोहर तांदूळ धुऊन सुकत घालावा 
  • सुकल्यावर त्याचे पीठ करून घ्यावे 
  • 2 ग्लास पाणी उकळत ठेवावे
  • तितकेच तांदळाचे पीठ घ्यावे
  • पाण्याला अर्धवट उकळी आली की तांदळाचे पीठ  त्यात घालावे आणि ढवळावे. त्यात थोडं तूप घालावं
   झाकण ठेऊन त्याला वाफ काढावी
  • व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर परात घ्यावी त्यात ही गरम तांदळाची पिठी काढून तेल लाऊन मळावी
  • उकड गरम असतानाच मळावी तरच मोदक चांगले होतात
  • हाताला तेल लावा आणि मोदकची पारी करायला घ्या 
  • त्याची पारी करून त्यात सारण भरावे 
  • मोदकाच्या सुबक पाळ्या करून हे मोदक मोदकपात्रात साधारण 20 मिनिट्स वाफवावेत 
  • गरम मोदक तूप घालून खायला द्यावे 

  सारणाची कृती 

  • नारळ खवणून घ्यावा 
  • खोबऱ्याचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी घेऊन हलक्या हाताने नारळ खवणावा
  • गूळ बारीक चिरून घ्यावा 
  • खोबरं आणि गूळ एकत्र मंद गॅसवर भाजावे आणि सारण तयार करावे
  • तुम्हाला खवा आवडत असल्यास यात खवा घालावा
  • सारण तयार होत आल्यावर वेलची पावडर घालावी 
  • आवडत असल्यास सुका मेवा अर्थात काजू, बदाम, बेदाणा घालावे 

  टीप: खवा घातल्यास, सारणाचा स्वाद अधिक चांगला होतो

  नारळाची वडी (Naralachi Vadi Recipe In Marathi)

  Instagram

  घरात अचानक कोणी आल्यावर काय द्यायचे असा प्रश्न असेल तर तुमच्यासाठी नारळाची वडी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय घरात लहान मोठ्या माणसांनाही नारळाची वडी नक्कीच आवडते. त्यामुळे तुम्ही नेहमी ही घरात करू शकता. ही बनवायला जास्त वेळ लागत नाही. 

  लागणारे साहित्य 

  • एक कप खवलेले ओलं खोबरं
  • 1 कप साखर 
  • अर्धा कप दूध 
  • पाव चमचा वेलची पावडर 
  • काजू, बदाम कापलेले
  • तूप 

  तयार करण्यासाठी कृती 

  • खोबरं खवून घ्या आणि मिक्सरमधून एकदा फक्त फिरवून घ्या. जास्त वाटू नका. यामुळे वड्यांना चांगलं टेक्स्चर येतं. तुम्हाला नको असेल तर वाटू नका
  • एका मोठ्या कढईमध्ये खोबरं, साखर आणि दूध घालून शिजवत ठेवा 
  • साखर वितळेपर्यंत मंद आचेवर नीट ढवळत राहा 
  • सुरूवातीला साखर वितळेल आणि या मिश्रणाला बुडबुडे येती. मग दूध आटून मिश्रण घट्ट होईल. तरीही थोडा वेळ परतत राहा. त्यात वेलची पावडर घालून परता. 
  • दुसरीकडे एका ताटात प्लास्टिक घाला आणि त्यावर तुपाचा हात लावा. मिश्रण तयार झालं की अर्ध्या भागावर हे पसरा आणि अर्ध्या भागावरील प्लास्टिक तुम्ही त्यावर फोल्ड करा. त्यावर लाटणं फिरवून त्याचं टेक्स्चर नीट करून घ्या. मग शीट काढून सुरीने त्याचे तुम्हाला हवे तसे वड्यांचे तुकडे पाडा. हे गरम असतानाच करा. गरम असतानाच वरून
  • मनुका, बेदाणे आणि काजू तुम्हाला आवडेल ते लावा. अथवा केलेले काप त्यावर गरम असतानाच पसरवा. मिश्रण थंड झालं की, वड्या काढून घ्या. साधारण अर्ध्या तासात हे सुकतं

  टीप: खोबरं जास्त ब्राऊन करू नका. वड्या मिश्रण गरम असतानाच पाडा 

  ओल्या नारळाची काजूची उसळ (Olya Naralachi Kajuchi Usal)

  Instagram

  साधारण उन्हाळ्याचे दिवस आले की वेध लागतात ते काजूच्या उसळीचे. काजू आपल्या सर्वांना आवडतातच. काजूच्या भाजीमध्ये ओलं खोबरं घातलं नाही तर ती पूर्णच होत नाही. ओल्या नारळाची ही उसळ म्हणजे पर्वणीच. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे मसाले वापरून ही उसळ केली जाते. पण त्याची चव ही तितकीच अप्रतिम लागते.

  लागणारे साहित्य 

  • ओले काजू
  • ओले खोबरे 
  • गोडा मसाला
  • लाल तिखट
  • गूळ
  • चवीनुसार मीठ 
  • कोथिंबीर 
  • जिरे 
  • मोहरी
  • हिंग 
  • तेल

  तयार करण्याची कृती

  • ओले काजू स्वच्छ करून घेणे. जेणेकरून त्याची खाज लागू नये
  • कढईत तेल घेणे. त्यात जिरे, मोहरी, हिंग घालून त्यावर काजू टाकून थोडे भाजून घेणे 
  • त्यानंतर त्यात गोडा मसाला, लाल तिखट, गूळ, मीठ, कोथिंबीर चिरून घालणे आणि वरून ओलं खोबरं जास्त प्रमाणात घालून त्यावरून पाणी घालणे
  • ही भाजी व्यवस्थित उकडवणे आणि त्याला वाफ देणे. काजू शिजेपर्यंत ही भाजी उकडू द्यावी 
  • भाकरी अथवा पोळीसह खावी 

  टीप: तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याचे वाटण करूनही या भाजीसाठी वापरू शकता आणि गोडा मसाल्याऐवजी तुम्ही यामध्ये मालवणी मसाल्याचाही वापर करू शकता. मालवणी मसाला असेल तर गुळाचा वापर करू नका 

  ओल्या नारळाची चिक्की (Olya Naralachi Chikki)

  Instagram

  ओल्या नारळाची चिक्की थोडीशी चिकट असते. पण याचा स्वाद अप्रतिम असतो. ओला आणि सुका नारळ असं दोन्ही मिक्स करून तुम्ही ही चिक्की तयार करू शकता 

  लागणारे साहित्य 

  • ओले खोबरे
  • डेसिकनेटेड कोकोनट
  • साखर 
  • तूप 
  • वेलची पावडर

  तयार करण्याची कृती 

  • कढईत सर्वप्रथम साखर घ्या. मंद आचेवर गॅस ठेवा. साखर वितळू लागल्यावर मग ती ढवळा. ढवळताना ही घट्ट असते त्यामुळे पहिले थोडा त्रास होईल. पण तसंच ढवळा
  • साखर पूर्ण वितळल्यावर त्यात एक चमचा तूप घाला, वेलची पावडर आणि दोन्ही खोबरे त्यात घालून गॅस बंद करा आणि मग व्यवस्थित मिक्स करा 
  • एका प्लेटमध्ये तूप लावा. वरील मिश्रण त्या प्लेटमध्ये पसरा. नीट पसरून झाल्यावर त्याचे सुरीने तुकडे करा आणि मग थंड होऊ द्या. तुमची चिक्की तयार आहे

  वाचा - Rava Recipes In Marathi

  नारळी भात (Narali Bhat)

  Instagram

  नारळी पौर्णिमेला आजही बऱ्याच घरांमध्ये न चुकता नारळी भात करण्यात येतो. पण काही जणांना याची रेसिपी माहीत नाही. खास तुमच्यासाठी नारळी भाताची रेसिपी मराठीत. 

  लागणारे साहित्य

  • 1 कप बासमती तांदूळ 
  • ओले खोबरे एका नारळाचे 
  • 1 कप किसलेला गूळ
  • 3-4 चमचे तूप
  • बदाम आणि काजूचे तुकडे 
  • बेदाणे 
  • वेलचीचे दाणे 
  • 4 लवंग
  • एक तुकडा दालचिनी 

  तयार करण्याची कृती 

  • नारळी भात करण्यासाठी भिजलेले तांदूळ लागतात. त्यामुळे तुम्ही आधी बासमती तांदूळ धुवा आणि मग अर्धा तास हे तसेच भिजवून ठेवा. अर्ध्या तासाने पुन्हा धुवा 
  • कढईत तूप घेऊन वरील सुका मेवा आणि लवंग, दालचिनी, वेलची नीट भाजून घ्यावे आणि बाजूला काढून ठेवावे
   त्यानंतर त्याच तुपात शिजलेला भात परतून घ्यावा
  • कढईत पुन्हा तूप घालून त्यात वरील सर्व साहित्य घालून दूध आणि पाणी घालून भात अधिक शिजायला ठेवावा. त्यात वरून केशरही तुम्हाला आवडत असेल तर घालावे
  • भात शिजत आला की किसलेला गूळ त्यात घालून व्यवस्थित मिक्स करावा 
  • मंद आचेवर हे मिश्रण शिजू द्यावे. गूळ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे ठेवावे
  • त्यानंतर तुम्ही गूळ त्यात मुरल्यावर वरून काजू आणि बदाम पसरून खायला द्यावा

                                                                                   वाचा - आरोग्यासाठी दालचिनी चे फायदे

  ओल्या नारळाची सांजोरी (Olya Naralachi Sanjori)

  Instagram

  रव्याच्या सांजोऱ्या केल्या जातात आणि मैद्याच्या साटोऱ्या. हा महाराष्ट्रातील ओल्या नारळाचा बनणारा खास पदार्थ आहे. 

  लागणारे साहित्य

  • अर्धा कप मैदा 
  • अर्धा कप रवा
  • पाव कप तेल 
  • कोमट पाणी 
  • सारणासाठी पाव कप रवा
  • एक कप पिठी साखर
  • ओले खोबरे
  • खवा 
  • 3-4 चमचे मिल्क पावडर
  • तळण्यासाठी तूप
  • वेलची पावडर

  तयार करण्याची कृती

  • मैदा आणि रवा एकत्र करून त्यात तेल घालून नीट मिक्स करून घ्या. कोमट पाण्याने भिजवा. पीठ मळून झाल्यावर साधारण अर्धा तास ओल्या कपड्याने झाकून ठेवा 
  • कढईत तूप घालून त्यात रवा भाजून घ्या. गुलाबी रंग आल्यावर पाण्याचा एक हपका त्यावर मारा आणि परता
   त्यानंतर एका परातीत हा रवा काढून घ्या. त्यामध्ये ज्या मापाचा रवा होता त्याच मापाइतकी पिठी साखर, ओले खोबरे व मिल्क पावडर त्यात मिक्स करा आणि तुम्हाला अधिक चांगली चव हवी असेल तर तुम्ही त्याच मापाइतकी खवा घालून मिक्स करा (दूध पावडर असेल तर खवा वापरू नका)
  • सर्व मिक्स केल्यावर त्यात वेलची पावडर घाला. तुमचं सारण तयार होतं
  • किंचित पाण्याचा हात लाऊन त्याचे गोळे करून घ्या
  • भिजलेल्या पिठाचे तुम्ही गोळे करून त्याची वाटी तयार करा आणि त्यात हे सारण भरा 
  • नंतर अगदी लहान पोळी करून ती भाजून घ्या आणि मग तुपात तळा. तुमच्या चविष्ट सांजोरी तयार

  ओल्या नारळाची बर्फी (Olya Naralachi Barfi)

  Instagram

  ओल्या नारळाची बर्फी करणे सोपे आहे. आपण बाहेरून जास्त पैसे घालून आणण्यापेक्षा घरात अगदी सोप्या पद्धतीने बर्फी तयार करू शकतो

  लागणारे साहित्य

  • एक कप खवलेले ओलं खोबरं
  • 1 कप साखर 
  • अर्धा कप दूध 
  • पाव चमचा वेलची पावडर 
  • काजू, बदाम कापलेले
  • तूप 

  तयार करण्यासाठी कृती 

  • खोबरं खवून घ्या आणि मिक्सरमधून एकदा फक्त फिरवून घ्या. जास्त वाटू नका. यामुळे बर्फीला चांगलं टेक्स्चर येतं. तुम्हाला नको असेल तर वाटू नका
  • एका मोठ्या कढईमध्ये खोबरं, साखर आणि दूध घालून शिजवत ठेवा 
  • साखर वितळेपर्यंत मंद आचेवर नीट ढवळत राहा 
  • सुरूवातीला साखर वितळेल आणि या मिश्रणाला बुडबुडे येती. दूध जास्त आटवू नका. त्यात वेलची पावडर घालून परता. बऱ्यापैकी हे मिश्रण ओलसर राहू द्या
  • दुसरीकडे एका ताटात प्लास्टिक घाला आणि त्यावर तुपाचा हात लावा. मिश्रण तयार झालं की अर्ध्या भागावर हे पसरा आणि अर्ध्या भागावरील प्लास्टिक तुम्ही त्यावर फोल्ड करा. त्यावर लाटणं फिरवून त्याचं टेक्स्चर नीट करून घ्या. मग शीट काढून सुरीने त्याचे तुम्हाला हवे तसे वड्यांचे तुकडे पाडा. हे गरम असतानाच करा. गरम असतानाच वरून
  • मनुका, बेदाणे आणि काजू तुम्हाला आवडेल ते लावा. अथवा केलेले काप त्यावर गरम असतानाच पसरवा. मिश्रण थंड झालं की, बर्फी काढून घ्या

  ओल्या नारळाचे पराठे (Olya Naralache Parathe)

  Instagram

  आपण अनेक प्रकारचे पराठे खातो. पण तुम्ही कधी ओल्या नारळाचे पराठे खाल्ले आहेत का? याची सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी

  लागणारे साहित्य

  • अर्धा खवलेला नारळ
  • एक वाटी कणीक 
  • एक वाटी मैदा 
  • तेल आणि तूप
  • 4-5 हिरव्या मिरच्या 
  • जिरं आणि कोथिंबीरचे वाटण
  • 1 चमचा साखर 
  • चवीपुरते मीठ 

  तयार करण्याची कृती 

  • खोबरे नारळाचं पाणी घालून वाटून घ्या. त्याची पेस्ट करा
  • मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात मीठ, साखर आणि वाटण आणि मिरची घालून साधारण दहा मिनिट्स घट्ट भिजवून ठेवा
  • त्याचे गोळे करा आणि पराठे करा 
  • तव्यावर तूप अथवा तेल सोडून हे पराठे भाजा. तुम्हाला हवं तर तुम्ही बटरवरदेखील भाजू शकता
  • दही, चटणीसह हे गरम पराठे खायला द्या

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक