कोरोना संक्रमणाच्या भीतीने अनेक महिन्यापासून सर्वांना घरात डांबून राहवं लागलं होतं. आता हळूहळू सर्वकाही पूर्ववत होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांच्या जीवनात खूप बदल झाले आहेत. मागील काही महिन्यात काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना अजूनही वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे. सहाजिकच आरोग्य आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागल्यामुळे सध्या ताण तणाव जास्त वाढल्याचं निदर्शनास येत आहे. शिवाय घरात बसूनही सर्वजण कंटाळले आहेत. मग अशा काळात मन शांत निवांत ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. यासाठी या टिप्स जरूर फॉलो करा.
छोटे – छोटे ब्रेक घ्या –
जरी तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असला तरी तुम्हाला या काळात छोट्या ब्रेकची गरज नक्कीच आहे. आधीच वर्क फ्रॉम होममुळे तुमच्या टारगेट आणि कामाच्या वेळेत वाढ झाली आहे. त्यामुळे कामाच्या ताणतणावातून दूर जाण्यासाठी दुपारी लंचसाठी आणि संध्याकाळी चहा-कॉफीसाठी एक छोटा ब्रेक अवश्य घ्या. तुमच्या ऑफिस सहकाऱ्यांना आणि बॉसला तुम्ही घेत असलेल्या ब्रेकबाबत कल्पना द्या. ज्यामुळे त्यावेळेस तुम्ही निवांतपणे लंच आणि टीब्रेक घेऊ शकता.
नियमित व्यायाम करा –
व्यायामाने मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते. सकाळी उठल्यावर काही मिनिटे योगासने, मेडिटेशनसाठी काढा. जर असं करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी संध्याकाळी एखाद्या पार्कमध्ये वॉकला जाण्यास काहीच हरकत नाही. नित्यनेमाने व्यायाम, योगासने, चालणे, सायकल चालवणे, पोहणे आणि मेडिटेशन करून तुम्ही तुमचे आरोग्य सुदृढ आणि मन शांत ठेवू शकता. ज्यामुळे ताणतणाव दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
Shutterstock
कुटुंबियांशी दररोज फोनवर बोला –
नातेवाईक, मित्रमंडळींशी मनमोकळेपणे बोलण्यामुळे तुमचे मन शांत होते. पण कोरोनामुळे सध्या कोणालाही प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही. यासाठीच या काळात तुमच्या जीवलग व्यक्तीशी दररोज काही मिनिटे फोनवर बोला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अधुनमधुन व्हर्च्युअल गेट टुगेदर करण्यास काहीच हरकत नाही. असं केल्यामुळे तुम्हाला त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळेल.
नाही म्हणायला शिका –
कामाच्या बाबतीत प्रामाणिक असणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता ओळखूनच तुमचे काम करा. तुम्हाला झेपेल इतकंच टारगेट काम करताना स्वीकारा. ज्यामुळे स्वीकारलेलं टारगेट तुम्ही वेळेत आणि आनंदात पूर्ण करू शकाल. शिवाय हळू हळू तुमच्या काम करण्याच्या क्षमतेतही यामुळे वाढ होईल. अनपेक्षित टारगेट पूर्ण करण्याच्या धावपळीत तुम्ही स्वतःचे शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घ्याल आणि तुमचा ताणतणाव अधिकच वाढत जाईल. त्यामुळे गरज असेल तिथे नाही म्हणायला शिका, कामे इतरांना वाटून द्या, स्वतःसोबत इतरांचा विकास करायला शिका.
Shutterstock
सकारात्मक राहा –
दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला पॉझिटिव्ह सूचना द्या. दिवसभरात एखादी अशी गोष्ट करा ज्यामुळे तुमचे मन आनंदी आणि उत्साही राहील. मग यासाठी तुमच्या आवडीचा पदार्थ तयार करणे, लॉंग ड्राईव्हवर जाणे, आवडीचे कपडे घालणे असं तुम्ही काहीही करू शकता. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिका. ज्यामुळे तुम्हाला ताणतणावाला तोंड कसं द्यायचं हे आपोआप समजेल.
छंद जोपासा –
आतापर्यंत तुम्ही नेहमीच तुमचे काम आणि इतर गोष्टींमुळे तुमच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या असतील. मात्र कोरोनाच्या काळात सर्वांना वेळेचे व्यवस्थापन, कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःचे आणि कुटुंबाचे शारीरिक,मानसिक आरोग्य याचे महत्त्व पटले असेल. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायची असेल तर मन शांत आणि आनंदी असायला हवे. यासाठीच दिवसभरातील काही वेळ फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. यावेळेत तुम्ही तुमचे आवडते गाणे गाणे, चित्र काढणे किंवा कोणताही छंद जोपासू शकता. असं केल्यामुळे ताणतणाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
कृतज्ञ राहा –
आनंदी आणि समाधानी राहण्याचा हा एक सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या मनात समाधानाची भावना निर्माण होते. ही भावना तुम्हाला अवास्तव अपेक्षा आणि आग्रहापासून दूर ठेवते आणि तुमचा तणाव वाढत नाही. कोरोनाच्या काळात समाजातील अनेकांनी महान कार्य केलं आहे. त्यांच्या बद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल आणि कुटुंबाबद्दल, नोकरी धंद्याबद्दल जरी तुम्ही कृतज्ञ राहीलात तरी तुमचे मन तणावमुक्त होईल.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
ताण-तणावामुळे तरूण महिलांमध्ये वाढतोय सध्या ‘अल्झायमर’चा धोका
मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय (How To Relieve Mental Pressure In Marathi)