मकर संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या हे खास उखाणे

मकर संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या हे खास उखाणे

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रात...मागचं वर्षाच्या कडू आठवणींना पुसून टाकण्यासाठी या गोड सणाचं निमित्त नक्कीच छान आहे. कारण या सणाचं आयोजनच नेमकं भेटीगाठी होण्यासाठी केलं जातं. मकरसंक्रातीला तिळगूळ वाटला जातो ज्यातून सर्वांच्या आयुष्यात गोडवा निर्माण व्हावा आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं हा हेतू असतो. एवढंच नाही तर या सणाचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंत चालणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या निमित्ताने महिला आपल्या मैत्रिणी आणि जवळच्या  सख्यांना भेटतात आणि वाणाची देवाणघेवाण करतात. या कार्यक्रमात बऱ्याचदा नाव घेणं म्हणजे उखाणा म्हणण्याचा आग्रह केला जातो. जर तुमचं नुकतंच लग्न झालं असेल आणि तुमची ही पहिलीच संक्रांत असेल त उखाणा म्हटल्याशिवाय तुमची सुटका होऊ शकत नाही. यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही मकरसंक्रांत स्पेशल उखाणे शेअर करत आहोत. ज्याचा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मकरसंक्रांतीसाठी खास उखाणे

भारतीय संस्कृतीत पत्नीने पतीचं नाव खास उखाण्यातून घेण्याची पद्धत आहे. घरात एखादा सणसमारंभ असला की इतर महिला तिला उखाणा घेण्याचा आग्रह धरतात. तेव्हा यंदाच्या मकरसंक्रांतीसाठी असा आग्रह झाल्यास घ्या हे खास उखाणे


१. महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटेक आणि ठुशी

...... रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या दिवशी


२.धन्य आजचा दिवस, घरी आली आई आणि मावशी

त्यांच्या आर्शीवादाने ....  रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी


३.ऊसापासून बनवतात साखर आणि गूळ

.... रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटत तिळगूळ


४.चांदीच्या दिव्यात लावली तूपाची वात

... रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरूवात


५.मकरसंक्रातीला उडवतात उंच उंच पतंग

....... रावांचे नाव घेताना मनात उठतात तरंग


६.माहेर माझे बागायती, बागेत पिकल्या केळी

सासरी नांदत ..... रावांचे नाव घेत मकरसंक्रांतीच्या वेळी


७.मकरसंक्राती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला

....... रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला


८.हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध

...... रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मींचे दृढ बंध


९.तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

....... रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला


१०.सासरची माणसं माझ्या आनंदी आणि हौशी

..... रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी


११.माहेरी आणि सासरी माझ्या सुख, समृद्धीच्या  राशी

....... रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या दिवशी


१२.तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा  

...... रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा


१३.मंगलक्षण आला घरी दारी बांधले तोरण

..... रावांचे नाव घेते हळदीकुंकू आहे कारण


१४.शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून

.... रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून


१५.हिवाळ्याला झाली सुरूवात कधी थंडी कधी ऊन

..... रावांचे नाव घेते .... यांची लेक आणि ... यांची सून


१६.महालक्ष्मीच्या देवळात आरती सुरू झाली मंद सुरात

..... रावांचे नाव घेते मी मात्र तोऱ्यात


१७.रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो थोडी तरी हास

...... रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी खास


१८.पूजेला बसल्यावर आधी मान मोरेश्वर बाप्पाचा

..... रावांचे नाव घेते आर्शीवाद असो तुम्हाला सर्वांचा 


१९.तिळा आणि गुळाची झाली गट्टी झाली... आली आली संक्रांत

.... रावांचे नाव घेते मात्र त्यांचा  स्वभाव आहे शांत


२०.निसर्गाची किमया हवेत वाढला गारवा

… रावांचे नाव घेते सर्वांना वाटत हलवा