नवीन घरी शिफ्ट होताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

नवीन घरी शिफ्ट होताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

नवीन घर घेणं ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाची गोष्ट असते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवसरात्र एक करता. पण घर नुसतं विकत घेऊन काम होत नाही. कारण सर्वात मोठा टास्क असतो जुन्या घरातून नव्या घरी शिफ्ट होणं. बऱ्याचदा मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, नोकरीतील बदलांमुळे अथवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला  घर शिफ्ट करावं लागतं. अशावेळी घर शिफ्ट करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 

नव्या घरी जाऊन आधी थोडा रिसर्च करा

नव्या घरी शिफ्ट होण्यापूर्वी तुमचं घर पूर्ण रिकामं असतं. अशावेळी तुम्ही घराच्या सजावटीचा योग्य अंदाज बांधू शकता. यासाठीच नव्या घरी शिफ्ट होण्यापूर्वी काही वेळा विझिट करा. घरात कोणत्या कोणत्या फर्निचरची गरज आहे, घराचा रंग आणि  पडदे  कसे असावेत, दुरूस्तीचं काही काम बाकी आहे का, घर विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी पूरवल्या आहेत का, घराचं पूर्ण काम झालं आहे का अशा अनेक गोष्टी तुम्ही या भेटीत समजून घेऊ शकता. कारण काही अडचण असेल तर ती आधीच पूर्ण करणं सोपं होतं. यासाठी घरी शिफ्ट होण्यापुर्वी तिथे पाहणी करण्यासाठी जाणं खूप गरजेचं आहे. 

जुन्या घरातून काय काय घेऊन जायचं

जुन्या घरातील फर्निचर नव्या घरी घेऊन जाणं आणि ते तिथे सेट करणं नक्कीच मोठा टास्क असू शकतं. कारण प्रत्येक घराचा आकार, उंची, प्रकार हा एकसारखा नसतो. अगदी तो एखादा वन बी एचके  असला तरी तुमच्या जुन्या घराप्रमाणे असेलच  असं  नाही. शिवाय तु्म्ही वन बीएच के मधून टू बी एच के अथवा  थ्री बीच के मध्ये जाणार असाल तर तुमच्या जुन्या फर्निचरला तिथे सामावून घेणं थोडं कठीण होतं. यासाठी जुन्या घरातील कोणतं फर्निचर तुम्ही घेऊन जाणार याची  लिस्ट करा. त्याची मापे घेऊन ती तुमच्या नव्या घरी अॅडजस्ट होतील का याचा अंदाज घ्या. त्यानुसार नवीन घराच्या फर्निचरचा विचार करा आणि  जुन्या घराचं फर्निचर विकून टाका. मात्र जुन्या घरातील कोणतीही वस्तू विकताना त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यास विसरू नका. कारण इतके दिवस त्या घराने आणि या वस्तूने तुमची नक्कीच चांगली सोय केली आहे. 

स्वच्छता, पेस्ट कंट्रोल आणि इतर व्यवस्था

नव्या घरात शिफ्ट होताना रंगकाम, बांधकाम यानंतर घर पूर्ण स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती कामे वेळेत पूर्ण  करून घ्या. शिवाय घर जुन्या बांधकामाचे असेल तर ते वेळीच पेस्ट कंट्रोल करा. ज्यामुळे राहायला आल्यावर तुम्हाला कीटकांचा त्रास होणार नाही. शिवाय घरात पाणी, वीज अथवा इतर गोष्टींचा पूरवठा योग्य प्रमाणात होत आहे का हेही तपासून घ्या.

pexels

योग्य पॅकर्स आणि मूव्हर्स एंजसीची निवड

जर तुमचं जुनं फर्निचर, कपडे, किचनचं सामान हे तुम्हाला नव्या घरी शिफ्ट करायचं असेल. तर त्यासाठी आधीच काही पॅकर्स आणि मुव्हर्स कंपन्यांचे कोटेशन घ्या. कोणती कंपनी तुम्हाला काय काय सुविधा देणार याचा नीट विचार करा. तुमची घर शिफ्ट करण्याची तारीख आणि सामान शिफ्ट करण्याची तारीख यांचे योग्य गणित जुळवा. काचेच्या वस्तू आणि नाजूक सामानासाठी  त्या एजंसीकडे काय सुविधा आहेत याची  नोंद घ्या. त्यानुसार तुमच्यासाठी बेस्ट डिल फायलन करून शिफ्टिंगचा निर्णय घ्या. 

घराचं लॉक बदला

नव्या घरी शिफ्ट झाल्यावर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दाराचं कुलूप बदलणं. जुन्या मालकाकडे अथवा इस्टेट एजंटकडे घराची किल्ली असण्याची शक्यता आहे. जरी तुमचा त्यांच्यावर विश्वास असला तरी सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेणं तुमच्या फायद्याचं ठरेल. घरात आरामात आणि निश्चिंत राहण्यासाठी घराचे लॉक बदलून घ्या. आजकाल बाजारात विविध प्रकारचे सेफ्टी लॉक मिळतात. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी घराला सेफ्टी डोअर लावणे, खिडक्यांची दुरूस्ती करणेही खूप महत्त्वाचे आहे.

कागदपत्रां वरील तुमचा पत्ता बदलणं विसरू नका

नवीन घरी गेल्यावर तुमचा पत्ता बदलतो. त्यामुळे नातेवाईक, मित्रपरिवाला सांगण्यासाठी, बॅंक अथवा इतर महत्त्वाच्या कागदपत्रावरील तुमचा पत्ता लवकर बदलून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे सर्व व्यवहार लगेच नव्या पत्त्यावर सुरू होतील. जुन्या घराचा पत्ताच जर सर्व कागदपत्रांवर असेल तर तुम्हाला तुमचे कायदेशीर व्यवहार करणं कठीण जाऊ शकतं. 

शेजाऱ्यांशी मैत्री

नवी घरी शिफ्ट झाल्यावर शेजाऱ्यांशी तुम्ही ओळख करून घेणं हे नेहमीच चांगलं ठरेल. कारण दररोज एकमेकांना पाहिल्यावर तुम्हाला यामुळे संकोच वाटणार नाही. शिवाय शेजारी तुम्हाला अनेक गोष्टीत मदत करू शकतात. सोसायटीमधील इतर लोकांशी ओळख, सोसायटीचे नियम, सार्वजनिक कार्यक्रम, कोणत्याय गोष्टीसाठी कोणची मदत घ्यावी, बाजारहाट कुठून करावा अशा अनेक गोष्टींसाठी मदत करू शकतात. मात्र लगेचच खूप गप्पा मारण्यापेक्षा थोडीशी आणि गरजेपुरती ओळख करून मग ती व्यक्ती कशा आहे यानुसार मैत्रीचा हात पुढे करा.

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes

INR 69 AT MyGlamm