राजमाता जिजाबाई आणि महाराज शहाजीराजे यांचा विवाह दौलताबादमध्ये 1605 साली झाला. मालोंजी रावांना म्हणेजच शहाजीराजांच्या वडिलांना निजामशहाकडून पाचहजारी मनसब, शिवनेरी आणि चाकण हे किल्ले आणि पुणे, सुपे हे परगणे जहागिरीत मिळाले होते. जिजाबाई गरोदर असताना पुण्यातील वातावरण बिघडले होते. त्यामुळे जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी शहाराजांनी त्यांची पुण्यातील शिवनेरी किल्यावर व्यवस्था केली होती. त्यावेळी मुघलांच्या अत्याचारामुळे पुण्यातील परिस्थिती अतिशय बिकट व धोकादायक झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत आई भवानी मातेच्या कृपेने राजमाता जिजाबाई यांनी 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर पुत्रप्राप्ती झाली. गडावरील शिवाई मातेच्या आर्शीवादाने मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. हा दिवस आजही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस ‘शिवजयंती’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जाणून घ्या शिव जयंतीच्या शुभेच्छा (shivaji jayanti wishes in marathi) देण्यासाठी शिवाजी महाराजांचे शेर, आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थान राजमाता जिजामाता माहिती
जिजामातांच्या संस्कारामुळे घडले छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी जिजाबाईंनी एकटीने लीलया पेलली होती. शहाजीरीजे आणि जिजाबाई यांचे थोरले सुपूत्र संभाजीराजे यांचे संगोपन मात्र शहाजीराजांनी केले. शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यातील लाल महालात गेले. बालवयातच त्यांच्या मनावर जिजामातांनी स्वराज्य निर्मितीची बीजे पेरली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले. दादाजी कोंडदेव यांच्या तालमीत युद्धकौशल्यात निपूण केले. अगदी बालपणापासून त्यांना रामायण, महाभारतासारख्या कथा सांगून त्यांच्यात शौर्य आणि पराक्रमाची स्फुर्ती जागवली. शिवाजी महाराजांच्या कलागुण आणि युद्ध कौशल्यामुळे शहाजीराजांनी शिवाजी महाराज केवळ चौदा वर्षांचे असतानाच त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सोपवली होती. जिजामातांच्या देखरेखीखाली शिवाजी महाराज पुढे राजकारणाचे धडे घेऊ लागले. शिवरायाचे कर्तृत्व ओळखत जिजामातांनी त्यांना राजनितीत निपूण केले. ज्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षीच महाराजांमध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. शिवजयंतीनिमित्त शिवरायांची किर्ती स्मरण्यासाठी ऐका या शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडा
स्वराज्य निर्मिती जिजामातांचे ध्येय, ध्यास आणि श्वास
स्वराज्य निर्मितीचे स्वप्न महाराजांसोबतच जिजाबाईंनीही जपले होते, त्या शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू होत्या. युद्धकला, नितिमुल्य आणि राजनिती शिकवणाऱ्या त्या महाराजांच्या प्रथम मार्गदर्शक होत्या. शिवाजी राजे जेव्हा युद्धमोहिमवर असत तेव्हा जिजामाता सर्व राज्यकारभार जातीने स्वतः पाहात असत. सदरेवर बसून रयतेचा योग्य न्याय निवाडा करत. कोणत्याही युद्ध मोहिमेवर जाण्याआधी शिवाजी राजे जिजामातांशी सल्ला मसलत करत असत. युद्धात यशस्वी होण्याचे आर्शीवाद आणि युद्धकलेतील छोटे छोटे बारकावे शिवाजी महाराजांना जिजामातेकडून मिळत असत. आजही महाराष्ट्रात जिजामाता यांना राजमाता, मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनच ओळखले जाते. हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजामाता या केवळ एक जन्मदाता नव्हत्या तर त्या शिवरायांना ज्ञान, न्याय, शहाणपण, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य अशा अनेक गुणांचे बाळकडू पाजणाऱ्या एक वीरमाता होत्या. जिजाबाईंनी त्यांचा नातू म्हणजेच शिवाजी महाराज व सईबाईंचे सुपूत्र संभाजी राजे यांचेही संगोपन केले. सईबाईंच्या मृत्युनंतर पोरक्या झालेल्या संभाजी राजांचा त्या आधारवड होत्या. शिवाजी राजांचा रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यावरच आपले कर्तव्य पूर्ण झाले या भावनेने त्या माऊलीने तिचा देह ठेवला. अशा थोर राजमाता जिजाबाईंना मानाचा मुजरा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम