आपल्या शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त मानण्यात आलं आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मंगल कार्य जसं विवाह, गृहप्रवेश, व्यापार किंवा उद्योग यांचा प्रारंभ करणं हे अति शुभ फलदायक मानलं जातं. खऱ्या अर्थाने अक्षय्य तृतीया आपल्या नावानुसार शुभ फल देते. या दिवशी सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीमध्ये असतात. अक्षय्य तृतीयेची माहिती आणि पूजाविधीसोबतच जाणून घ्या अक्षय्य तृतीयेबाबतच्या काही खास गोष्टी.
- नवं वाहन घेणं किंवा गृहप्रवेश करणं, दागिने खरेदी करणं यासारखी कार्य अक्षय्य तृतीयेला आवर्जून केली जातात. असं मानलं जातं की, हा दिवस सर्वांच्या आय़ुष्यात भाग्योद्य आणि यश घेऊन येतो. यामुळे लोक जमीन खरेदी-विक्रीबाबतची कामं, शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा नव्या बिझनेसची सुरूवात यासारखी काम यादिवशी खास सुरू करतात.
- अक्षय्य तृतीयेच्या बाबत असंही मानलं जातं की, या दिवशी जे काम आपण करू त्यात हमखास भरभराट होते. या दिवशी चांगलं काम केल्यास त्याच्या फळरूपी यश तुम्हाला मिळतच राहतं. तर एखादं वाईट काम केल्यास त्याचा परिणाम आयुष्यभर पिच्छा सोडत नाही.
- पृथ्वीवर देवांनी 24 रूपांमध्ये अवतार घेतला होता. यापैकी सहावा अवतार हा भगवान परशुरामांचा होता. पुराणानुसार त्यांचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला होता.
- या दिवशीच भगवान विष्णूच्या चरणातून पृथ्वीवर गंगा अवतरली होती. सतयुग, द्वापर आणि त्रेतायुगाच्या आरंभाची गणना या दिवशीपासून होते.
- शास्त्रांनुसार या दिवसाला आजकाल व्यावसायिक रूप देण्यात आलं आहे. ज्यामुळे अक्षय तृतीयेच्या मूळ उद्देश्यापासून दूर लोकं फक्त खरेदीत गुंततात. खरंतर हा वस्तू खरेदीचा दिवस नाही. कारण वस्तूच्या खरेदीत तुमचं संचित धन खर्च होतं.
- वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरं करण्यात येणाऱ्या या पर्वाचा उल्लेख विष्णू धर्म सूत्र, मत्त्स्य पुराण, नारदीय पुराण किंवा भविष्य पुराणात मिळतो.
- खरंतर हा दिवस आपली योग्यता सुधारण्यासाठी आणि आपल्या क्षमतेला वाढवण्यासाठी उत्तम आहे.
- हा मुहूर्त आपल्या कर्माच्या योग्य दिशा प्रोत्साहीत करण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो. कदाचित याच कारणामुळे या दिवशी दान करण्याचं महत्त्वही फार आहे.
- वैशाख मासाच्या शुक्ल पक्ष तृतीयेला आखातीज च्या रूपातही साजरं केलं जातं. भारतीया जनमानसात ही अक्षय तीज नावाने प्रसिद्ध आहे.
- पुराणांनुसार या दिवशी सूर्योदयाआधी उठून स्नान, दान, जप आणि स्वाध्याय करणं शुभ व फलदायी मानलं जातं. या तिथीला केलंले कोणतंही शुभकार्य जास्तीत जास्त फळ देणारं असतं. या तिथीला सतयुगाच्या आरंभाची तिथी मानलं जातं. यामुळेच या तिथीला कृतयुगादि तिथी असंही म्हणतात.
अक्षय तृतीयेचं महत्त्व
- या तिथीला चारधामपैकी उल्लेखनीय असलेल्या भगवान श्री बद्रीनारायण यांच्या देवळाचे दरवाजे उघडले जातात. अक्षय तृतीयेलाच वृंदावनमध्ये श्रीबिहारीजींच्या चरणांचे वर्षातून एकदा दर्शन होते.
- जर या दिवशी रविवार आला तर तो सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी असण्यासोबतच अक्षय प्रभाव असणारा असतो.
- मत्स्य पुराणानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षत पुष्प दीप इत्यादी द्वारे भगवान विष्णूची आराधना केल्याने विष्णू देवाची विशेष कृपा प्राप्ती होते. तसंच संतती ही अक्षय होते.
- गोरगरिब आणि दीनदुःखीची सेवा करणे, वस्त्र इत्यादीचं दान करणे आणि शुभ कर्माला प्राधान्य देत आपल्या कर्माने धर्माचं पालन करणे हीच अक्षय्य तृतीया पर्वाची सार्थकता आहे.
- कलियुगातील नकारात्मक प्रभावापासून बचावासाठी या दिवशी भगवान विष्णूची उपासना करून दान अवश्य करावे. असं केल्याने निश्चितच पुढच्या जन्मी समृद्धी, ऐश्वर्य आणि सुखाची प्राप्ती होते.
- भविष्य पुराणातील एक प्रसंगानुसार शाकल नगरात राहणारा वाणिक नामक धर्मात्मा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण श्रद्धा भावनेने स्नान ध्यान आणि दान कर्म करीत असे. पण त्याची बायको त्याला यासाठी नकार देत असे. पण हाच वाणिक दानपुण्याच्या प्रभावाने द्वारकानगरीमध्ये सर्वसुख संपन्न राज्याच्या रूपात अवतरला.
- या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास पाणी, धान्य, ऊस, दही, सातू, फळ, माठ आणि हातापासून बनवलेल्या वस्तूंच दान केल्याने दान करण्याऱ्याला विशेष फळाची प्राप्ती होते.
- दानालाही वैज्ञानिक तर्कानुसार उर्जेच्या रूपांतरणाशी जोडण्यात आलं आहे. दुर्भाग्याला सौभाग्यात रूपांतरित करण्यासाठी हा दिवस सर्वश्रेष्ठ आहे.
- जर अक्षय्य तृतीयेचा दिवस रोहिणी नक्षत्रात आला तर त्याचे महत्त्व हजारपटीने वाढते, अशी मान्यता आहे. शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, जर या तिथीला चंद्र अस्त होतेवेळी रोहिणी नक्षत्र पुढे असेल तर शेती चांगली होते आणि पाठी असेल तर पीक चांगलं येत नाही.
- या दिवशी मिळालेले आशिर्वाद हे फलदायक मानले जातात. भविष्यपुराणानुसार या तिथीची गणना युगादि तिथींमध्ये होते. सतयुग, त्रेता आणि कलयुगाचा आरंभ या तिथीला झाला होता आणि या तिथीला द्वापर युग समाप्त झाले होते.
- धन आणि भौतिक वस्तूंच्या प्राप्ती आणि भौतिक प्रगतीसाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. सुवर्ण, चांदी, दागिने, कपडे, वाहन आणि संपत्तीसाठी हा दिवस विशेष आहे. पंचांग न बघताही या दिवसाला श्रेष्ठ मुहूर्तांमध्ये गणण्यात आलं आहे.
- दान केल्याने जाणता अजाणता आपल्या पापांचा भार हलका होतो आणि पुण्याई वाढते. अक्षय्य तृतीयेबाबत असं म्हटलं जातं की, या दिवशी दान केल्याने खर्च होत नाही, म्हणजेच तुम्ही जितकं दान कराल त्यापेक्षा कैक पटीने पुण्य तुमच्या कोषात जमा होतं.
मग येत्या अक्षय्य तृतीयेला एकमेकांना शुभेच्छा द्या आणि खरेदीसोबतच दानाचं पुण्यही नक्की कमवा. ज्यामुळे तुमची सर्वार्थाने भरभराट होईल.
ADVERTISEMENT
You Might Also Like