आईपण ही एक जबाबदारी असते. बाळाला पोटात 9 महिने अगदी जपून सांभाळताना त्याच्या जन्मानंतरही आईची लगबग सुरु असते. ‘जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा’… असे उगाच म्हणत नाही. बाळ येणार याची चाहुल लागताच होणाऱ्या आईला आणि कुटुंबाला येणाऱ्या बाळासाठी काही खास गोष्टींची खरेदी करावी लागते. आपल्याकडे साधारण तीन ते चार महिने मुद्दाम याची बातमी कोणाला दिली जात नाही. एकदा का बाळ आईच्या पोटात स्थिरावले की, मग सगळी लगबग सुरु होते. तुम्हीही येत्या काळात आई होणार असाल तर तुम्ही देखील काही गोष्टींची पूर्वतयारी करुन ठेवा.म्हणजे आयत्यावेळी तुमची पळापळ होणार नाही.
दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण
कॉटनच्या साड्या महत्वाच्या
बाळ तान्हुलं असताना त्याला शक्यतो बाहेरचे कोणतेही कपडे कापरले जात नाही. शक्यतो बाळांसाठी आजीची किंवा एखादी स्वच्छ कॉटनची जुनी साडी वापरली जाते. यासाडीचे वेगवेगळे उपयोग केले जातात. कॉटनची छान सुती साडी घेऊन ती मस्त डेटॉलच्या पाण्यात धुवून काढावी त्यामुळे त्याचे निर्जंतुकीकरण होते. अशा साड्या वापरणे हे बाळासाठी आणि आईसाठी सुरक्षित असते. असा करा कॉटनच्या साडीचा उपयोग
- कॉटनची साडी फाडून त्याचे छान दोन मोठे तुकडे करा. अशा साडीच्या तुकड्याचा उपयोग बाळाला बांधण्यासाठी होतो. या कपड्यांना बाळाची गुंडाळी असे म्हणतात. आंघोळीनंतर किंवा अंग स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तेल मालिश केल्यानंतर बाळाला बांधून ठेवण्यासाठी हे कापड एकदम उत्तम असते.
- बाळाला आंघोळ घातल्यानंतर त्याचे अंग पुसण्यासाठी याच साडीच्या लहानशा तुकड्याचा उपयोग केला जाऊ शकतो. सुती साड्या या मऊ असल्यामुळे त्या बाळाला लागत नाहीत. बाजारात विकत जरी अशा प्रकारच्या गोष्टी मिळत असल्यातरी देखील असे कपडे वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे.
- जर तुमच्याकडे खूप कॉटनच्या साड्या असतील तर तुम्ही त्यापासून दुपटी बनवण्यासही काहीच हरकत नाही.बाळांना झोपवण्यासाठी अशी दुपटी कामी येतात.
- बाजारात खूप फॅन्सी प्रकारातील लाळेरं मिळतात. पण ती लहानपणी काहीही उपयोगाची नाही. कारण बरेचदा भरवताना ओकारी काढणं, दुध बाहेर काढणं असं लहान मुलांचं सुरुच असतं. त्यामुळे साड्यांचे असेच छोटे छोटे तुकडे काढून तुम्ही ठेवा. त्याचा लाळेरं म्हणून उपयोग करता येतो.
- प्रसुतीनंतर पोट बांधले जाते. पोट सुटू नये म्हणून पोट बांधण्याची पद्धत आहे. हल्ली रेडिमेड बेल्ट मिळतात. पण असे असले तरीही कॉटनसाडी ही केव्हाही चांगलीच. त्यामुळे त्याचा उपयोग असाही होऊ शकतो. त्यामुळे अशा साड्या आधीच गोळा करा.
पहिल्या दिवसापासूनच बाळाची घ्या अगदी सौम्यपणे काळजी, महत्त्वाच्या गोष्टी
बाळाचे कपडे
दुकानात लहान बाळांसाठी कितीही सुंदर कपडे आले असले तरी देखील त्याची पटकन खरेदी करु नका. तर या काही गोष्टींची नक्की खरेदी करा किंवा काही गोष्टी जवळ करा.
- खूप जण नवजात बाळाला पटकन नवीन कपडे घालत नाहीत तर एखाद्या बाळाने वापरलेले कपडेच घातले जातात. जर तुम्ही तसे करत असाल तर त्याची जमवाजमव आधीच करा.
- नवजात बाळासाठी झबलं हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे झबली घेऊन ठेवा. यासोबतच तुम्ही बंडी, लंगोट, पायमोजे,कानटोपी, पायमोजे असे काही आधीच आणून ठेवा. काही डझनभर तुम्ही या गोष्टी आणल्या तरी चालतील. कारण त्याचा उपयोग होतो. हे कपडे पटकन वाळतात तरी देखील तुमच्याकडे या गोष्टी जास्त असल्या तरी देखील चालतील.
आता अशी पूर्वतयारी करा म्हणजे तुमची कोणतीही गडबड होणार नाही.