बऱ्याचदा मुलांना डब्यात काय द्यायचं अथवा आपण ऑफिसला डब्यात काय न्यायचं अथवा कोणती भाजी न्यायची आणि त्याची तीच तीच चव या सगळ्याचा कंटाळा आलेला असतो. हा प्रश्न नेहमीच आपल्यासमोर उभा राहतो. त्यातही केवळ शाकाहार हा पर्याय असेल तर अजूनच डोक्याला त्रास होतो. मग नक्की कशा प्रकारे आणि कोणते मसाले घालून भाजीचा स्वाद वाढवायचा हा प्रश्नदेखील उपस्थित होतो. बऱ्याचदा भाजीच्या आस्वादाच्या बाबतीत काही ना काही तक्रारी असतातच. त्याच त्याच चवीचा कंटाळा येतो मग अशावेळी नक्की काय करायचं? अशावेळी काय करता येईल याच्या काही सोप्या आणि उपयोगी ठरणाऱ्या अशा टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. या लेखातून तुम्ही अशा काही सोप्या टिप्स जाणून घ्या आणि त्याचा रोजच्या भाजीच्या बाबतीत नक्की प्रयोग करून पाहा. तुम्हालाही हा वेगळेपणा नक्कीच आवडेल आणि तोच तोच स्वाद राहणार नाही. जाणून घेऊया काय आहेत या भाजीचा स्वाद वाढविण्याच्या कुकिंग टिप्स –
कुकिंग टिप्स
Shutterstock
1. तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रकारची भरलेली भाजी बनवत असाल तेव्हा त्या मसाल्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट मिक्स केलंत तर त्या भाजीला एक वेगळी चव मिळते. तसंच यामध्ये तुम्ही कांदा भाजून घालणार असाल तर जास्त मसाल्याचा वापर करू नका. त्याशिवाय नेहमीच्या मसाल्याची चव नको असेल तर तीळ भाजून अथवा त्यात गोड्या मसाल्याचा वापर करून तुम्ही कोणतीही भरेलेली भाजी करू शकता.
2. पनीरची भाजी बनवायची असल्यास, पनीर आधी तेलात तळून थोड्या वेळ गरम पाण्यात ठेवा. त्यानंतर भाजीच्या ग्रेव्हीमध्ये पनीर घालून शिजवा. यामुळे पनीर चिवट होणार नाहीत आणि चवीलाही चांगले लागतील. असं केल्याने पनीरच्या आतमध्येही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स होते आणि पनीर आणि ग्रेव्हीची चव ही एकमेकांमध्ये चांगली मिसळते. त्यामुळे पनीर ज्यांना आवडत नसतील अथवा केवळ पनीरचा वास ज्यांना आवडत नसेल त्यांना अशा प्रकारची भाजी खायला नक्कीच आवडेल.
हेदेखील वाचा – गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू
3. कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही दही घालणार असाल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दही असलेल्या ग्रेव्ही अथवा भाजीमध्ये उकळी आल्यानंतरच मीठ घाला. असं केल्यामुळे दही फुटणार नाही आणि भाजी व्यवस्थित राहील. तसंच दही असलेली भाजी ही मध्यम आचेवरच शिजवा. असं केल्याने भाजीचा स्वाद अधिक चांगला येतो. दह्याचा वास राहात नाही.
4. तुम्हाला चण्याची भाजी करायची असेल आणि तुम्ही चणे रात्रभर भिजविण्यास विसरलात तरीही घाबरू नका. असं झाल्यास, तुम्ही कुकरमध्ये चण्याबरोबर पपईचे दोन कच्चे तुकडे घाला. चणे लगेच शिजतील. चणे शिजल्यानंतर पपईचे तुकडे आणि चणे हे दोन्ही नीट मिक्स करून घ्या. याचा स्वाद भाजीमध्ये अप्रतिम लागतो. त्याचबरोबर तुम्हाला चणेदेखील झटपट शिजवून मिळतात.
5. कोणतीही रसदार भाजी बनवली असेल आणि त्यात मसाला अथवा तिखट जास्त झालं असेल तर तुम्ही त्या भाजीमध्ये तूप, बटर, दही अथवा क्रिम मिक्स करा. यामुळे तिखटपणा आणि मसाल्याचा तिखटपणाही कमी होतो. इतकंच नाही तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये तिखटपणा जाणवत असेल तर तूप मिक्स करणं हा अतिशय सोपा उपाय आहे. त्याचबरोबर मीठाचं प्रमाणही योग्य असू द्यावं. त्यामुळे भाजीची चव अधिक चांगली लागते.
6. कोणत्याही डाळ, भाजी अथवा ग्रेव्हीमध्ये मीठाचं प्रमाण जास्त झालं तर यामध्ये तुम्ही कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून मिक्स करा. या भाजी अथवा रश्शाला एक उकळी द्या. एका उकळीमध्ये हे गोळे शिजतात. खारटपणा हे गोळे शोषून घेतात आणि तुम्ही चव घेतल्यानंतर तुम्हाला जाणवतं की, त्या भाजीला अधिक वेगळी आणि चांगली चवदेखील आलेली असते. असं केल्यानंतरही तुम्हाला जर मीठाचं प्रमाण भाजी अथवा आमटीमध्ये अधिक जाणवत असेल तर तुम्ही ब्रेडचे तुकडे घालून भाजीला उकळी द्या. भाजी थंड झाल्यावर त्यातील ब्रेडचे तुकडे काढून टाका. त्यातील खारटपणा नक्कीच कमी झालेला तुम्हाला चव घेतल्यानंतर कळेल.
7. भाजीची ग्रेव्ही बनवताना जर आंबट झाली तर त्यामध्ये एक चमचा साखर घालून तुम्ही त्याचा आंबटपणा नक्कीच कमी करू शकता. मात्र साखर जास्त प्रमाणात घालू नका.
8. भाजीचा हिरवेपणा तसाच ठेवायचा असेल तर तुम्ही हिरव्या भाज्यांमध्ये शिजताना दोन चमचे दूध मिक्स करा. यामुळे भाजीचा मूळ हिरवेपणा कायम टिकून राहातो. त्याशिवाय भाजीची चवही चांगली होते. तसंच भाजीचा मूळ रंग राहावा असं वाटत असेल तर भाजीमध्ये तुम्ही थोडीशी साखरही घालू शकता.
9. स्वादिष्ट भाजीची ग्रेव्ही बनवयाची असल्यास, कांदा, लसूण, आलं याबरोबरच तुम्ही बदाम आणि पिस्त्याची पेस्ट करून थोडीशी त्यात घातली तर भाजीची चव वेगळी होते. ही पेस्ट तुम्ही भाजून घेतली तर भाजीची चव अप्रतिम लागते. नेहमीपेक्षा वेगळा स्वाद भाजीला येतो.
हेदेखील वाचा – भेंडीची खाण्यामुळे होतील हे अफलातून फायदे
10. कोणतीही भाजी तुम्ही जर उकळून बनवत असाल विशेषतः उसळी तर भाजी उकळत असतानाच त्यात मीठ मिक्स करावं. त्यामुळे या भाजीचा रंग तुम्हाला हवा तसाच राहतो. बदलत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजीची चव अप्रतिम लागते.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.