भारतात हिस्टरेक्टॉमी करून घेणाऱ्या तरूण महिलांची संख्या वाढताना दिसून येत आहे. हिस्टरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया. या वाढत्या आकडेवारीबद्दल तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात 7,00,000 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्यापैकी 15 ते 49 या वयोगटातील 22,000 महिलांनी 2018 या वर्षात हिस्टरेक्टॉमी शस्त्रक्रिया करून घेतली. ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांचे सरासरी वय 34 आहे. याचा संबंध रजोनिवृत्ती आधी येण्याशी त्याचप्रमाणे गर्भधारणेशी असलेल्या समस्यांशी असू शकतो. जगभरात अशा प्रकारचा ट्रेंड दिसून येत आहे, ही चिंता वाढविणारी बाब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते किंवा पर्याय उपलब्ध असताना हिस्टरेक्टॉमी करून घेण्याची आवश्यकता नाही असे मत वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होताना दिसत आहे. असं असतानाही याचं प्रमाण का वाढतं आहे. महिलांमध्ये याविशषी फारच कमी माहिती पोहचलेली आहे. त्यामुळे आम्ही यांसंदर्भात मदरहूड हॉस्पिटलमध्ये डॉ. अनु विज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. गर्भाशय काढायचे असल्यास तुम्हाला या बाबींची माहिती असणे आवश्यक आहे.
Table of Contents
- हिस्टरेक्टॉमीचा सल्ला नक्की कधी देण्यात येतो? (When will Doctor tell to do Hysterectomy?)
- गर्भाशय काढण्याची महत्त्वाची कारणं काय?
- हिस्टरेक्टॉमीला पर्याय असलेल्या उपचारपद्धती
- गर्भाशयातील फायब्रॉइड्स
- एंडोमेट्रिऑसिस
- युटेरिन प्रोलॅप्स (गर्भाशय भ्रंश)
- गर्भाशयातून होणारा असाधारण रक्तस्त्राव
- श्रोणीभागात होणाऱ्या वेदना
- गर्भाशय उपचारासंबधी प्रश्न – उत्तर / FAQs
सामान्यपणे सूचित केलेल्या आजारावर हिस्टरेक्टॉमीची आवश्यकता किती आहे आणि कमीत कमी छेद देणाऱ्या किंवा नॉन-सर्जिकल उपचारपद्धतींविषयी या लेखातून आपण माहिती घेणार आहोत. नक्की हिस्टरेक्टॉमी म्हणजे काय? शस्त्रक्रिया का करावी लागते याची संपूर्ण माहिती प्रत्येक महिलेला असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भाशय वाचवता येतं.
मूल झाल्यावर आता गर्भाशयाचं काम संपलं अशी हल्ली महिलांची वृत्ती दिसून येते. त्यामुळे साधारण पस्तिशीनंतर नियमित प्रत्येक महिलेने आपल्या शरीराची योग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात असं घडत नाही. अतिरक्तस्राव अथवा इन्फेक्शन असं काहीतरी घडलं तर महिला घाबरून जातात आणि डॉक्टरांकडे धाव घेतात. पण अर्धवट माहिती असल्यामुळे महिलांनाही नक्की काय करायचं कळत नाही. आजकाल बऱ्यापैकी डॉक्टरही घाबरवतात. भविष्यातील आजाराची भीती दाखवतात. यावर आता कोणत्याही प्रकारच्या गोळ्या आणि औषध नकोत. ‘मूल झालं आता गर्भाशय काय करायचंय. काढूनच टाका’ असं उत्तर बऱ्याच महिलांकडून ऐकायला मिळतं. पण हे योग्य नाही. या सर्व गोष्टी डॉक्टरांनी समजावून सांगणं गरजेचं आहे. महिलांमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल गैरसमज तर असतातच पण त्याहीपेक्षा जास्त धोका असतो तो त्यांना असलेल्या अर्धवट माहितीचा. याच अर्धवट माहितीच्या आधारे महिला चुकीचं पाऊल उचलायलाही तयार होतात आणि डॉक्टर कितीही नाही म्हणत असेल तरीही बऱ्याचदा महिलांचाच गर्भाशय काढून टाकण्यासाठी आग्रह असतो असे हल्ली दिसून आले आहे. मुळात आपल्याला होणाऱ्या त्रासासंदर्भात डॉक्टरांकडून व्यवस्थित माहिती घेऊन ती समजून घेणं आवश्यक आहे. गर्भाशय काढल्याने आपल्याच शरीराला जास्त त्रास होणार हे प्रत्येक महिलेला कळायला हवं. त्यासाठीच आम्ही ही सर्व माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. हा लेख वाचून तुम्हाला असा त्रास असल्यास, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
हिस्टरेक्टॉमीचा सल्ला नक्की कधी देण्यात येतो? (When will Doctor tell to do Hysterectomy?)
मासिकपाळीदरम्यान प्रमाणापेक्षा अधिक रक्तस्त्राव होणे, दीर्घकालीन श्रोणीभागात होणाऱ्या वेदना किंवा एंडोमेट्रऑसिस, गर्भाशयातील ट्युमर्स (फायब्रॉइड्स) किंवा स्त्रीच्या प्रजनन यंत्रणेतील कर्करोग (गर्भाशयाचा, अंडाशयाचा, सर्व्हायकल, फेलोपिअन ट्युब्स) यासारख्या आजारांसाठी हिस्टरेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात येऊ शकतो. अशा शस्त्रक्रियांविषयी डॉक्टरांशी विस्तृत चर्चा करणे आवश्यक आहे. कारण या शस्त्रक्रियेवर एकूण आरोग्यावर,मूत्राशयाशी संबधित अवयवांवर, लैंगिक आरोग्यावर, आयुर्मानावर आणि महिलेच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असतो. वय किती असले तरी यामुळे मासिक पाळी लवकर येते आणि त्यामुळे प्रजननक्षमतेवर आणि गर्भधारणेच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो. या शस्त्रक्रियेनंतर हाडांची घनता कमी होणे, संप्रेरकांच्या असंतुलनामुळे वागणुकीतील/भावनिक बदल होण्याचीही शक्यता असते. खरं तर हिस्टरेक्टॉमी वर्ज्यच केली पाहिजे, असा याचा अर्थ नव्हे. गर्भाशयाचा, सर्व्हिक्स, ओव्हरीज, फॅलोपिअन ट्युब, योनी या अवयवांना झालेला कर्करोग,उपचारांना दाद न देणारा गंभीर स्वरुपाचा संसर्ग (उदा. श्रोणीमार्गाला सूज), अॅडेनोमायोसिसमुळे गंभीर स्वरूपाचे आणि नियंत्रणाबाहेर असलेले गर्भाशयातून होणारा रक्तस्त्राव, प्रसूतीदरम्यान गर्भाशय फाटणे, गर्भाशयाचे स्खलन होणे इत्यादी प्रकारच्या गुंतागुंती असतील तर ही शस्त्रक्रिया करणे आवश्यक होऊन बसते. पण मग त्यावर नक्की उपचारपद्धती आहेत का? असतील तर नक्की काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे.
गर्भाशय काढण्याची महत्त्वाची कारणं काय?
गर्भाशयामध्ये फायब्रॉईड्स अर्थात गाठी झाल्यास, गर्भाशय काढून टाकावं लागतं. याकडे महिलांनी व्यवस्थित लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण जर पुढे – मागे गाठ वाढली तर गर्भाशय फाटण्याची भीती असते. गर्भाशयाच्या आतल्या भागामध्ये जर गाठ असेल तर ती डॉक्टर दुर्बिणीद्वारे काढून टाकू शकता. पण प्रत्येकवेळी गर्भाशय काढून टाकण्याची गरज भासत नाही. गर्भाशय खाली सरकणे, पाळीच्या दिवसांमध्ये अति रक्तस्राव होणं, गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या सुरुवातीला कॅन्सर होणं, बाळंतपणामध्ये गर्भाशय फाटल्यास अशी लक्षणं असल्यास, गर्भाशय काढून टाकावं लागतं. पण हे काढून टाकताना नक्की महिलांचं वय काय आहे, तिला किती मुलं आहे, तिच्या जीवाला किती धोका आहे या सगळ्याचा विचार डॉक्टर करतात आणि मगच निर्णय घेतात. पण त्यासाठी संपूर्णतः महिलांची साथ गरजेची असते. गर्भाशय कसं काढावं याच्याही पद्धती आहेत. पण गर्भाशय न काढता इतर पद्धतीनेही यावर उपचार होऊ शकतात.
हिस्टरेक्टॉमीला पर्याय असलेल्या उपचारपद्धती
गर्भाशयातील फायब्रॉइड्स
गर्भाशयातील फायब्रॉइड्ससाठी बहुतेक वेळा हिस्टरेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात येतो. फायब्रॉइड्स हे सौम्य प्रकारचे ट्युमर्स असतात, बहुधा याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. किंबहुना हे ट्युमर्स प्रजननक्षम वयापासून वाढू लागतात आणि ते रजोनिवृत्तीपर्यंत राहतात. त्यानंतर वैषयिक संप्रेरकांचा ऱ्हास झाल्यामुळे ते तातडीने कमी होऊ लागतात. म्हणजे, शस्त्रक्रिया टाळता येऊन प्रतीक्षा करणे आणि निरीक्षण करणे हा दृष्टिकोन अवलंबता येऊ शकतो. गर्भाशयातील फायब्रॉइड्सची दृश्य लक्षणे असतील तर किमान छेद देणाऱ्या मायोमेक्टॉमी शस्त्रक्रियेने त्यावर उपचार करता येऊ शकतात. हाय-फ्रेक्वेन्सी अल्ट्रा साऊंड अॅब्लेशन, गर्भाशयातील रक्तवाहिनीचे एम्बोलायझेशन इत्यादींचा समावेश असलेल्या मायोमेक्टॉमीने फायब्रॉइड्स काढून टाकता येतात. युटेरिन अर्टरी एम्बोलायझेशनमध्ये गर्भाशयातील रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म कण इंजेक्ट करण्यात येऊन फायब्रॉइड्सना खाद्य पुरविण्यात येते आणि त्यांना होणारा रक्त पुरवठा तोडण्यात यतो. या शस्त्रक्रियांच्या यशाचा दर हिस्टरेक्टॉमीएवढाच असतो आणि यात गुंतागुंत कमी होण्याची शक्यता असते. गोनाडोट्रॉपिन रिलिझिंग हार्मोन (जीएनआरएच) प्रचारक, तोंडावाटे घेण्याच्या संततीनियमनाच्या गोळ्या इत्यादींचा वापर करून हॉर्मोनल थेरपी यांचाही वापर करून उपचार करण्याचा सल्ला देता येऊ शकेल.
एंडोमेट्रिऑसिस
या आजारामध्ये युटेरिअन लायनिंगची (एंडोमेट्रिअम) इतर अवयवांमध्ये, सामान्यपणे ओव्हरीज, फॅलोपिअन ट्युब्स, आतडी, गर्भाशयाचे बाहेरील पडल आणि क्वचित मूत्रपिंड, मूत्राशय किंवा फुफ्फुसात वाढ होते. अशा आजारामध्ये त्या स्त्रीला गर्भधारणा करण्यास अडथळा निर्माण होतो. श्रोणीभागात किंवा ओटीपोटात वेतना होणे किंवा ताण येणे आणि मसिकपाळी दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त स्त्राव होणे, ही लक्षणे दिसून येतात. दोन मासिक पाळ्यांमधील कालावधीतही स्पॉटिंग किंवा रक्तस्त्राव होतो. कालांतराने या आजारामुळे त्याचा परिणाम झालेल्या अवयवांच्या उतीवर चट्टा उठतो आणि यात प्रजननक्षमता समविष्ट असते तेव्हा त्याची परिणती वंध्यत्वात होते.
एंडोमेट्रिऑसिसवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया न करता पर्यायी उपचार म्हणून एंडोमेट्रिअमचे छेदन/विशिष्ट उती काढून टाकणे, स्कार टिश्युमुळे झालेले ऑब्लिटरेशन कापणे. किमान छेद देऊन करण्यात आलेल्या उती काढण्याच्या शस्त्रक्रियेने वाढीव/स्कार टिश्यू पूर्णपणे काढले जात नाहीत, त्यावेळी लॅपरेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात येऊ शकतो. या शस्त्रक्रियेमध्ये अधिक छेद द्यावा लागत असला आणि या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती पूर्णपणे सामान्य होण्यास लागणारा कालावधी अधिक असला तरी हिस्टरेक्टॉमीच्या तुलनेत या शस्त्रक्रियेमध्ये कमी छेद द्यावा लागतो आणि गर्भधारणेची क्षमतेला धक्का लागत नाही. फायब्रॉइड्सप्रमाणेच याही प्रकरणांमध्ये हॉर्मोनल थेरपी करण्याचा सल्ला देण्यात येऊ शकतो. वेदना शमविण्यासाठी नॉन-स्टरॉडिअल अँटि-इन्फ्लेमेटरी औषधे घेण्यास सांगितले जाईल. अॅक्युपंक्चर, बायोफीडबॅक यांचाही एंडोमेट्रिऑसिसचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
युटेरिन प्रोलॅप्स (गर्भाशय भ्रंश)
या आजारात श्रोणीभागातील स्नायू आणि अस्थिबंधन अशक्त होतात. त्यामुळे गर्भाशय खाली घसरते आणि ते योनीमध्ये किंवा त्याही खाली येते. अशा परिस्थितीत गर्भाशय काढावे की नाही, याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये कायम वाद होत असतो. अशक्त झालेले अस्थिबंध व स्नायू यांना सखक्त करणे आणि फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन (श्रोणीभागाचे बळकटीकरण) गर्भाशय पकडून ठेवण्यासाठी पुरेसे आहे. हे लॅपरोस्कोपीने (लॅपरोस्कोपिक सॅक्रो-हिस्टरोपेक्सी) साध्य करता येते. गर्भाशय वाचविण्यासाठी व्हजायनल युटेरोसॅक्रल हिस्टेरपेक्सी हा योनीमार्गाद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचा पर्यायही अमलात आणता येऊ शकतो. या शस्त्रक्रियेमध्ये ओटिपोटावर व्रणही राहत नाहीत.
नॉन-सर्जिकल व्यवस्थापनात व्हजायनल पेसरीचा वापर केला जातो. यात, काढता येऊ शकणारे अंगठीच्या आकाराचे रबराचे उपकरण योनीमार्गात बसविण्यात येते आणि उतरणाऱ्या उतींच्या भागाला आधार देण्यात येतो. अनेक प्रकारच्या पेसरी उपलब्ध आहेत. त्यापैकी तुमच्यासाठी कोणती पेसरी योग्य आहे, ते तुमचे डॉक्टर ठरवतील. पेसरीमुळे घसरण थांबवता येत नसेल तरी त्याची लक्षणे अंशतः किंवा पूर्णपणे घालवता येऊ शकतात. गर्भधारणा केली असता गर्भाशय प्रसरण पावून योनीमार्गात येण्याआधी जागच्या जागी ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते.
गर्भाशयातून होणारा असाधारण रक्तस्त्राव
गर्भाशयात असाधारण रक्तस्त्राव होत असेल तर डायलेशन अँड क्युरेटेज (डी अँड सी) म्हणजेच सर्व्हिक्सचे विस्फारण आणि स्क्रॅपिंग किंवा स्कूपिंग करून गर्भाशयाच्या आतून टिश्यु (उती) काढणे. प्रोस्टॅग्लॅंडिन इनहिबिटर्स, संततीनियमनाच्या गोळ्या, जीएनआरएच प्रचालक, अँटि-फायब्रिनोलिटिक एजंट्स आदीं फार्मोकोलॉजिकल एजंट्ससह एंडोमेट्रिअल अॅब्लेशन ही सुद्धा उपचार पद्धती असू शकते. डी अँड सी नंतर गर्भाशयात एनएनजी-आययूएस किंवा मिरेना बसविता येऊ शकते. हे एक हॉर्मोनल डिलिव्हरी उपकरण आहे, जे एंडोमेट्रिअल वाढीस प्रतिबंध करू शकते आणि मासिक रक्तस्त्रावाच्या प्रमाणात घट होऊ शकते. प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्त्राव होत असेल तर उत्तम परिणाम पाहायला मिळतात.
श्रोणीभागात होणाऱ्या वेदना
वर नमूद केलेले आजार किंवा श्रोणीभागात सूज आल्यामुळे, अॅडहेसिव्ह आजारा, आतड्याला सूज इत्यादीमुळे श्रोणीभागात वेदना होऊ शकतात. उपचारपद्धती निश्चित करण्यासाठी या आजाराचे निश्चित कारण शोधून काढणे अत्यावश्यक आहे. अॅडहेसिऑलिसिस म्हणजे अवयवाला आणि कार्याला अडथळा निर्माण करणाऱ्या अॅडहेजन्स (चिकटलेल्या घटकांना) काढून टाकून कार्य सुरळीत करण्याची प्रक्रिया. त्याचप्रमाणे श्रोणीभागातील वेदना शमविण्यासाठी नसांचा अवरोध, चेताखंडन (डिनर्व्हेशन) प्रक्रिया, गर्भाशयातील अस्थिबंध काढून टाकणे इत्यादी प्रक्रिया करता येऊ शकतात. वेदनाशामक ट्रिगर पॉइंट इंजेक्शन, अॅक्युपंक्चर, फिजिकल थेरपी या उपचारपद्धतींचाही वापर करण्यात आला असून त्याचे निरनिराळे परिणाम दिसून आले.
गर्भाशय काढून टाकल्यामुळे स्त्रीच्या शारीरिक, भावनिक आणि प्रजननक्षमतांवर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या आजारासाठी उपलब्ध असलेल्या विविध उपचारपद्धतींच्या परिणामाबद्दल सखोल चर्चा करून मग निर्णय घेणे हितावह असते.
गर्भाशय उपचारासंबधी प्रश्न – उत्तर / FAQs
प्रश्न – गर्भाशय काढण्याची खरंच गरज असते का?
उत्तर – गर्भाशय काढण्याची खरंच गरज नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथे उपचारपद्धती सांगितल्या आहेत, ज्या अवलंबून तुम्ही गर्भाशय वाचवू शकता. वास्तविक गर्भाशय वाचवता येणार असेल तर गर्भाशय काढून टाकण्याचा पर्याय स्वीकारू नका. त्याने तुमच्या शरीरावर जास्त परिणाम होतो.
प्रश्न – गर्भाशय काढल्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
उत्तर – गर्भाशय काढल्याचा पाळीवर आणि इतर शरीरावरही खूपच परिणाम होतो. बऱ्याचशा गोष्टी खाण्याची परवानगी नसते आणि जरी परवानगी असली तरीही काही गोष्टी गर्भाशय काढून टाकल्यास पचत नाहीत. त्यामुळे तुम्हाला हवं ते पूर्वीसारखं तुम्हाला खात येत नाही. इतकंच नाही तर त्यामुळे महिलांच्या शारीरिक आणि भावनिक क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला जर पर्याय असतील तर गर्भाशय काढून टाकणं शक्यतो टाळा. अगदीच गरज असल्यास, गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय
Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का
पिरेड्सच्या दिवसांमध्ये दुखतं पोट, जाणवतो थकवा मग हे नक्की करा