प्रत्येक अभिनेत्रीला ग्लॅमरस किंवा बोल्ड कॅरॅक्टर एकदा तरी करायच असतं. पण टक्कल करून प्रेक्षकांना काय वाटेल याची पर्वा न करता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ती भूमिका वठवण्याची हिंमत मोजक्याच अभिनेत्री करतात. हे मोठे शिवधनुष्य अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने लीलया पेलले आहे. तिच्या पहिल्याच ‘रानबाजार’ (Raanbaazar) या वेबसिरीज मधून याची प्रचिती येते. कोणत्याही ‘स्टीरिओ टाईप’मध्ये न अडकता तिने तिच्या अभिनयाच नाणं खणखणीत वाजवले आहे. प्राजक्ता माळी (Prajakta Mali), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि उर्मिला कोठारे (Urmila Kothare) सारख्या अभिनेत्रींसह तोडीस तोड अभिनय करत माधुरीने सर्व प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या रानबाजार या वेबसिरीजची सगळीकडेच चर्चा आहे. तेजस्विनी आणि प्राजक्ताने दिलेल्या बोल्ड सीननंतर आता चर्चा आहे ती म्हणजे माधुरी पवारच्या अभिनयाची आणि टक्कल केलेल्या लुकची. माधुरी ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat Jeev Rangala) या मालिकेतून घराघरात पोहचली. तर आता वेबसिरीजमधून वेगळ्या भूमिकेतून माधुरी प्रेक्षकांच्या समोर आली आहे.
माधुरीचा अप्रतिम अभिनय
राजकारणातील एक महत्वाकांक्षी आणि करारी स्त्री ची भूमिका अभिनेत्री माधुरी पवार हीने यामध्ये चोख बजावली आहे. अलीकडच्या काळात ग्लॅमरस दुनियेत जिथे अभिनेत्री आपल्या लुक बद्दल इतक्या जागरूक असतात अशा वेळेस माधुरीने टक्कल करून भूमिका साकारणे हे खरंच वाखाण्याजोगे आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये प्रेरणा सायाजीराव पाटील साने ही राजकीय स्त्री व्यक्तीरेखा माधुरीने उत्तम निभावली आहे. वडिलांच्या निधनानंतर राजकीय वारसासाठी तिने केलेली खेळी. जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनंतर तिने स्वतःचे केलेले मुंडन अन् त्याच बाल्ड लुकमध्ये (Bald Look) तिने पुढे सुरू ठेवलेला राजकीय प्रवास हा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढविणारा आहे. हनी ट्रॅप, राजकारण आणि त्यामध्ये प्रेरणाचं पुढचं पाऊल काय असेल? याची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात आता निर्माण झाली आहे. अनेकांनी ही वेबसिरीज पाहून कौतुक केले आहे. तर वेगवेगळ्या गोष्टींवरून ही सिरीज सध्या चर्चेत आहे.
माधुरीने केल्या भावना व्यक्त
आपल्या भूमिकेविषयी बोलताना माधुरी पवारने सांगितले की, ‘अशी भूमिका मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षित होत. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली. राजकीय व्यक्तींना भेटले. त्यांच्या देहबोलीचा भाषेचा आभ्यास केला. राजकारणातील महिलांवरील पुस्तकं वाचली. इतकेच नव्हे तर शिव्याही शिकले. व्यक्तिरेखेसाठी अक्षरशः शिव्या देण्याचाही या सिरीजसाठी सराव केला. यामुळेच ही भूमिका आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेरणा सायाजीराव पाटील साने या भूमिकेमुळे माझी अभिनयाची भूक भागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही’ अशा पद्धतीने माधुरीने आपल्या भूमिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. तर निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी माधुरीबद्दल सांगितले की, ”Talent has born’ माधुरीच्या रूपाने मराठी फिल्म इंडस्ट्रीत नवीन टॅलेंट जन्माला आलेले आहे. यामध्ये तिने वठवलेली भूमिका रियलिस्टिक वाटते. तिच्यासाठी एकदा तरी ‘रानबाजार’ ही वेबसिरीज पाहिलीच पाहिजे’.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक