केक म्हटला की, आपल्यासमोर अनेक केक्सची व्हरायटी येते. तरीही केक फ्लेवरमध्ये नवनवीन व्हरायटीज येत असतात. त्यामध्येच सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे तो आम्रखंड फ्युजन केक. रसमलाई केक, श्रीखंड केक नंतर आता ‘हवा’ आहे आम्रखंड केकची. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, या मागणीत असणाऱ्या केकची खास रेसिपी.
आंब्याच्या मेजवानीचा सिझन
Canva
उन्हाळा म्हटला की आंबा आला आणि आंबा म्हटल्यावर आम्रखंड तर हवंच. आपल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देऊन गुढीपाडव्याच्या सणाचं महत्त्व असते ते आम्रखंडाने. सर्वांचा आवडता फळांचा राजा आंबा बाजारात आला की, घरात आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांची मेजवानी सुरू होते. मुख्य म्हणजे ज्यांचा वाढदिवस उन्हाळ्याच्या दिवसात असतो. त्यांच्यासाठी तर आंबा म्हणजे जणू पर्वणीच असते. त्यांच्या वाढदिवसाला मँगो केक हमखास ऑर्डर केला जातो. पण बाजारातल्या मँगो केकमध्ये दरवेळी आंब्याचा वापर होतो असं नाही. बरेचदा इसेन्सचाही वापर केला जातो. त्यामुळे तो तितका छान लागेलच असं नाही. मग यावर उपाय काय?
दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण आपल्या जवळच्यांना देतोच. पण यंदा घरच्याघरी सोपा आणि झटपट होणारा असा आम्रखंड केक बनवून तुम्ही त्यांना सरप्राईज करू शकता. हा केक बनवायला अगदी सोपा आणि चविष्ट आहे. लहान मुलंच काय तर मोठ्यांनाही या केकची नक्कीच भुरळ पडेल.
आम्रखंड केक रेसिपी (Amrakhand Cake Recipe In Marathi)
आम्रखंड केकसाठी तुम्हाला सर्वात आधी लागेल अर्थातच आम्रखंड. तुम्ही घरच्याघरी आम्रखंड बनवणार असाल तर उत्तमच. नाहीतर बाजारातही आपल्याला बारा महिने आम्रखंड मिळतंच. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही ब्रँडच आम्रखंड तुम्ही या केकसाठी वापरू शकता.
साहित्य (अर्धा किलो केकसाठी) – पाव किलो आम्रखंड, व्हॅनिला फ्लेव्हर पिवळा स्पाँज केक, एक वाटी दूध, व्हीप क्रिम, आवडीनुसार चॉकलेट गनाश, पिवळा फूड कलर, मँगो स्क्वाश किंवा आंब्याचा रस, प्लेन लिक्वीड, डेकोरेशनसाठी आंबा किंवा आंब्याच्या फोडी.
कृती – सर्वात आधी तुम्ही पिवळा फूड कलर मिक्स करून बनवलेला व्हॅनिला स्पाँज केक घ्या. साधा व्हॅनिला स्पाँज केक असला तरी हरकत नाही.
नंतर या केकचे तीन किंवा चार लेयरमध्ये कटिंग करून घ्या.
लेयर कट झाल्यावर सर्वात खालच्या लेयरला दुधाने सोकिंग करून घ्या. लक्षात घ्या प्रत्येक लेयरला दूधाने सोक करून घ्या. ज्यामुळे तो केक खाताना रिच लागतो
एका बाऊलमध्ये आम्रखंड आणि व्हिप क्रिम घ्या. आता आम्रखंड आणि क्रिम मिक्स करून घ्या. नंतर हे आम्रखंड क्रीम केकच्या लेयरवर पसरवून घ्या.
आता त्यावर आम्रखंड पसरवून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही थिक लेयर चॉकलेट गनाशचं एक लेयरही एड करू शकता.
लक्षात ठेवा. प्रत्येक लेयरला दूधाने भिजवून (soak) करून घ्यायला विसरू नका.
मँगो जेल कृती – नंतर बाऊलमध्ये न्यूट्ल जेल घ्या आणि त्यात मँगो क्रश किंवा आंब्याचा रस मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर त्यात पिवळा फूड कलर आणि अंदाजे थोडं पाणी घाला. हे तुम्हाला केकच्या टॉप लेयरवर घालण्यासाठी उपयोगी पडेल.
केकचे सर्व लेयर कोटिंग झाल्यावर पुन्हा केकला सर्व बाजूने व्हीप क्रिमने कोट करून घ्या. नंतर वर तयार केलेलं मँगो फ्लेवरच जेल जे तयार करून घेतलं आहे ते केक पसरवून घ्या. आवडीनुसार तुम्ही लिक्वीड चॉकलेट गनाशने डेकोरेट करू शकता किंवा आंब्याच्या फोडींनीही डेकोरेट करू शकता. ही रेसिपी तुम्ही युट्यूबवरील prajaktaskitchen.com या चॅनलवर तुम्ही पाहू शकता.
आहे ना सोपा आणि झटपट होणारा असा आम्रखंड फ्युजन केक. खरंतर तुम्ही हा केक अगदी बारा महिनेही करू शकता. कारण बाजारात आपल्याला आम्रखंड बारा महिने उपलब्ध असतं. पण उन्हाळ्यात तुमच्या बच्चे कंपनीसाठी ताज्या आम्रखंडाचा आणि आंब्याचा भरपूर वापर केलेला हा फ्युजन केक करण्यात वेगळीच मजा आहे नाही का?मग नक्की करून पाहा आणि घरच्यांना आवडला का हे आम्हालाही नक्की कळवा.