वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. ज्या मुलींचं आपल्या वडिलांसोबतच नातं सुंदर असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आठवणी सुंदर असतात. आपल्या वडिलांबरोबर चांगलं नातं असल्यास आपल्या स्वभावावरही त्याचा परिणाम होत असतो. जो भविष्यातील वैवाहिक आयुष्यावर प्रभाव टाकत असतो. जर वडील खूप रागीट किंवा त्यांचा सहवास न लाभल्यास मुलींमध्ये विश्वासाची कमतरता निर्माण होते आणि आयुष्यात येणाऱ्या पुरूषांशी वागण्याबाबत समस्या निर्माण होतात. याउलट जर वडील सतत पाठिंबा देणारे आणि प्रेम करणारे असल्यास मुलीही तेवढ्याच आत्मविश्वास असलेल्या आणि कणखर बनतात. त्यामुळे मुलींच्या आयुष्यात वडिलांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. उगाच नाही मुलींना मदर्स डे पेक्षा फादर्स डे ची उत्सुकता असते. त्यामुळे वडिलांना फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची धडपड असते.
वडील लेकीच्या नात्याचं महत्त्व (Importance Of Father Daughter Relationship)
प्रत्येक मुलीच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने तरूण वयातलं वडील-मुलीचं नातं घडवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांशी भावनिकरित्या जोडलेली असते. ज्याचा फायदा तिला संपूर्ण आयुष्य होतो. यामागे अनेक कारणं आहेत.
- वडील हे मुलींसाठी रोल मॉडेल असतात. त्यांच्या सुरक्षा, विश्वास आणि प्रेमाचा ते जणू पाया असतात.
- आपल्या वडिलांवरूनच मुलगी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरूषाला जज करत असते. त्यामुळे वडील हे आपल्या मुलीसाठी आदर्श उदाहरण असतात.
- मुलींमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य हे वडिलांशी असलेल्या चांगल्या नात्यातूनच निर्माण होतं.
- जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात रस घेतात तेव्हा तिचा विश्वास दुणावतो. करिअर निवडणाच्याबाबतीतही वडिलांची साथ मिळाल्यास मुलींना उंच भरारी घेणे शक्य होते. ज्यामुळे त्या हमखास यशस्वी होतात.
- प्रेमळ वडील हे आपल्या मुलीला तिच्याबाबत नेहमी चांगली भावना निर्माण करतात. ज्याची मदत तिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होते.
मुलीच्या आयुष्यावर वडिलांचा प्रभाव (Impact Of Father On Daughters Life)
वडील मुलींच्या नात्याचे तीन टप्पे असतात. काही कठीण तर काही सोपे आणि मजेशीर पण प्रत्येक टप्पा हा महत्त्वाचा असतो.
मुलगी लहान असताना (During Childhood)
मुली या नेहमी ‘पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीचा बाबा हाच सुपरहिरो असतो. मुलीच्या मानसिक आणि भावनिक विकासात आईप्रमाणेच बाबांचाही तेवढाच वाटा असतो. ज्या मुलीचं नातं वडिलांसोबत चांगलं असतं त्यांना आयुष्यातील समस्या सोडवताना त्रास होत नाही. त्यांच्यात भीती आणि एखाद्या समस्येला टाळण्याची वृत्ती कमी असते. मुलीचं संगोपन करताना त्यांना सुरक्षित वाटणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपले वडील आपल्यासोबत आहेत याची हमी मुलीला असते तेव्हा तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.
मुली वयात येताना (During Adolescence)
प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खूप किचकट टप्पा असतो. कारण या वयात वडील आणि मुलीमध्ये अनेक वादविवाद निर्माण होऊन दुरावा येण्याची शक्यता असते. वडिलांनी संवाद साधणं आणि मुलीला विश्वासात घेतल्यास तिला आयुष्यात योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. कारण याच वयात मुली वाईट प्रभावाखाली येण्याची शक्यता असते. वडीलांचं प्रेम मुलीला तिच्या आयुष्यात महत्त्व देणारं कोणीतरी आहे याची जाणीव करून देतं. अशा मुली या वागण्यात आणि संवादाच्या बाबतीही आत्मविश्वास असणाऱ्या असतात.
मुलगी मोठी झाल्यावर (During Adulthood)
चांगल्या नात्यांमुळे मुलं ही नेहमीच सगळ्याबाबतीत प्रगतीशील बनतात. मुलीचं लग्न ठरताना किंवा करिअर निवडताना तिला आईसोबत वडिलांची सगळ्यात जास्त गरज असते. मुलीचं लग्न ठरवताना तर वडिलांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची असते. आपल्या मुलीला योग्य जोडीदार निवडण्यासाठी मदत करणं किंवा त्याबाबत योग्य मार्गदर्शन करणं हे फार महत्त्वाचं असतं. जर आईवडिलांचं नातं सुदृढ असेल तर मुलीचं वैवाहीक जीवनही चांगला आकार घेतं. कारण ती आईवडिलांच्या नात्यातून बऱ्याच गोष्टी शिकत असते आणि बघत असते.
वडिलांच्या अनुपस्थितीत मुलींवर होणारा परिणाम (Effect Of Fathers Absence On Daughter)
घटस्फोट, वडिलांचा मृत्यू किंवा आईवडिलांमधील दुरावा यामुळे मुलं पालकांपासून दूर होतात. पण काही वेळा सतत कामात असलेल्या वडिलांमुळेही असं होऊ शकतं. त्यांच्या अनुपस्थितीत मुलीच्या जडणघडणीवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. वडिलांशिवाय मुली कमी आत्मविश्वास असणाऱ्या, स्वतःचं महत्त्व न समजणाऱ्या आणि अबोल होतात.
- वडील नसल्यामुळे मुलींच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. जी त्यांचा स्वभाव आणि आयुष्य पूर्णतः बदलू शकते. अशा मुलींना समाजात वावरताना एका दडपणाखाली किंवा न्यूनगंड मनात ठेवून वावरताना दिसतात.
- वडीलांची कमतरता त्यांच्यात वेळेआधीच हार्मोनल बदलही घडवू शकते. अशा मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या किंवा गर्भधारणेबाबतच्या समस्या आढळतात.
- मुलगी जेव्हा योग्य वातावरणात आणि योग्य मार्गदर्शनात वाढते तेव्हा ती करिअरही चांगलं करते. पण वडीलांच्या अनुपस्थितीत याउलट होऊ शकतं.
त्यामुळे मुलीच्या आयुष्यात फक्त आईच नाहीतर वडिलांचं महत्त्व काकणभर जास्तच आहे. त्यामुळे बरेचदा मुली या लाडक्या बाबांसाठी कविता करताना दिसतात. तर आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठवताना सर्वात जास्त त्रास हा वडिलांना होतो. कारण आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्या घरी पाठवताना वडिलांना काळजी जास्त असते.
You Might Also Like