आजकालच्या आधुनिक जगात जगण्यासाठी पैसे फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर तुमचे भविष्य अवलंबून आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेप्रमाणेच आर्थिक चिंता हा आजकाल लोकांमध्ये वाढणारा आजार आहे. फक्त पैशाने आयुष्यात सुख निर्माण होत नसलं तरी सुखसुविधांसाठी माणसाला पैसा लागतोच. यासाठी महिन्याचा खर्च, बचत आणि तुमचे उत्पन्न याचा योग्य ताळमेळ राखता यायला हवा. म्हणूनच जाणून घ्या कसे करावे पैशांचे नियोजन
पैशांचे नियोजन करण्यासाठी सोप्या टिप्स
तुमचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखण्यासाठी तुम्ही याप्रकारे तुमच्या पैशांचे नियोजन करू शकता.
खर्चावर लक्ष ठेवा
दर महिन्याचा खर्च किती होतो याची नोंद तुम्ही तुमच्या डायरीमध्ये करू शकता. ज्यामुळे तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च कसा आटोक्यात आणू शकता ते तुमच्या लक्षात येईल. कधी कधी काही गोष्टींचा खर्च आपण वायफळ करत असतो. तो खर्च करणे टाळता आले तर आपले खूप पैसे नक्कीच वाचू शकतात.
महिन्याचे बजेट बनवा
खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या महिन्याभराच्या खर्चासाठी एक विशिष्ठ बजेट ठेवू शकता. या बजेट पेक्षा जास्त खर्च तुम्हाला करायचा नाही असे मनाला निक्षून सांगा. बजेट ठरवल्यामुळे तुम्हाला कुठे पैसे वाचवता येऊ शकतात आणि कोणत्या गोष्टींचा वापर गरजेचा नाही हे तुमच्या लक्षात येईल.
इमरजंसी फंड बाजूला ठेवा
आयुष्यात कधी कोणता प्रसंग कोणावर कधी ओढावेल हे सांगता येत नाही. यासाठीच कठीण प्रसंगात वापरता येतील अशा पैशांची व्यवस्था आधीच करून ठेवा. यासाठी महिन्यातून काही विशेष बचत तुम्ही या इमरजंसी फंडमध्ये करू शकता. ज्यामुळे वेळ पडल्यास तुम्हाला ते पैसे वापरता येतील.
जीवनातील गरजा मर्यादित ठेवा
पैसे वाचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या गरजा मर्यादित ठेवणे. कारण जितक्या जास्त गरजा तितका जास्त तुमचा खर्च होणार. साधी राहणी आणि उच्च विचार ही जीवनशैली सर्वांनी अवलंबली पाहिजे. ज्या गोष्टी कधीतरीच वापरणार आहात अशा गोष्टींवर पैसे वाया घालवू नका. जर ही जीवनशैली तुम्ही अमलात आणली तर तुम्हाला कधीच आर्थिक चिंता सतावणार नाही.
इतर गोष्टींना महत्त्व द्या
पैसे आज आहेत तर उद्या नाही. त्यामुळे पैशांवर आयुष्याचा फोकस ठेवू नका. तितकेच पैसे कमवा जितके तुम्हाला जीवन सुखीसमाधानी करण्यासाठी गरजेचं आहे. कारण तुम्ही जितके जास्त पैसे कमावण्याच्या मागे लागाल तितकी तुमची आर्थिक चिंता वाढत जाणार. त्यापेक्षा आयुष्यात आणखी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याचा फोकस ठेवू शकता.
बचत करण्यावर भर द्या
म्युच्युअल फंड अथवा बचत करण्याच्या इतर मार्गाचा लाभ घ्या. यासाठी दर महिन्याला काही ठराविक रक्कम बाजूला ठेवा. ज्यामुळे काही वर्षांनंतर तुम्हाला सहज तुमचे पैसे मिळू शकतात. व्याज मिळाल्यामुळे तुमचे इन्कम वाढेल. शिवाय तुमच्या उतार वयात तुम्हाला या पैशांची मदत मिळेल.
पैशांबद्दल कृतज्ञ राहा
पैशांची आवक वाढवण्याचा सोपा मार्ग म्हणजे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणे. तुमची कंपनी, तुमचे बॉस, तुमचे सहकारी, महिन्याला मिळणारा पगार याबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करा. व्यवसायिक असाल तर तुमची कंपनी, भागिदार, ग्राहक यांच्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण या सर्व लोकांमुळे तुमचे आर्थिक गणित आज उत्तम आहे. कृतज्ञतेची भावना तुमच्या मनात असेल तर तुमची दिवसेदिवस चांगली प्रगती होईल.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत
पिकनिकसाठी असे करा पैशांचे नियोजन
प्रत्येक महिन्याचा पॉकेटमनी वाचवायचा असेल तर 7 सोपे उपाय (Money Saving Tips In Marathi)