Advertisement

DIY लाईफ हॅक्स

घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा हे ‘5’ सोपे उपाय

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jul 23, 2019
घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा हे ‘5’ सोपे उपाय

Advertisement

आपल्याला सुख, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र या गोष्टींच्या मागे वेड्यासारखं धावण्यापेक्षा ते सहज कसं मिळेल हे महत्त्वाचं असतं. घरात सुख समाधान नांदण्यासाठी घरात चांगलं वातावरण निर्माण व्हायला हवं. कारण जेव्हा घरात सकारात्मक वातावरण असते तेव्हा घरात राहणारे लोक आपोआपच ताजे आणि दमदार वाटू लागतात आणि सकारात्मक विचार येतात. घर अथवा वास्तू सतत तथास्तू म्हणत असते असं म्हणतात. शिवाय घराचं आणि माणसाचं एक अनोखं नातं असतं. जगभरात कुठेही गेलं तरी प्रत्येकाला आपलं घरच प्रिय असतं. यासाठीच घरात वावरताना आपलं मन नेहमी प्रसन्न कसं राहील याची काळजी घ्यायला हवी. मन प्रसन्न राहण्याचा आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचा सोपा मार्ग म्हणजे घर हवेशीर आणि घरातील माणसं हसतमुख असणं होय. स्वयंपाक घर, बाल्कनी, बाथरूम अशा ठिकाणी अस्वच्छता आणि मनात निगेटिव्ह विचारांचा कचरा भरलेला असेल तर जीवनात समस्या येणारच. यासाठीच घरात सतत सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी हे अगदी सोपे आणि साधे उपाय जरूर करा.

घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी फॉलो करा या टिप्स –

1.घरात भरपूर सुर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या

घरात जर सतत चांगले आणि उत्साहपूर्ण वातावरण असावं असं तुम्हाला वाटत असेल तर घरात भरपूर उजेड आणि सुर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या. कारण अंधाराचं आणि नकारात्मकतेचं सख्य असतं. यासाठीच जेव्हा घर विकत घ्याल तेव्हा घरातील प्रत्येक खोलीत पुरेसा सुर्यप्रकाश येईल याची व्यवस्थित काळजी घ्या. जर तुमच्या घराची रचना तशी नसेल तर  घर विकत घेतल्यावर घरातील इंटेरिअर करताना घरात अथवा बाल्कनीत सुर्यप्रकाश येईल अशी रचना करून घ्या. सुर्यप्रकाशामुळे घरातील जीवजंतू आणि नकारात्मक विचार दोन्ही नष्ट होतात. शिवाय सुर्यप्रकाश घरात आल्यामुळे तुम्हाला सतत फ्रेश आणि उत्साही वाटते. असं केल्यामुळे तुमच्या मनात आणि घरात दोन्हीकडचं वातावरण सकारात्मक होईल. 

2. घरात नामस्मरण आणि प्रार्थना करा

प्रत्येक घर हे सतत तथास्तू म्हणत असतं असं  म्हणतात. म्हणूनच घरात नेहमी शक्य तितकं नामस्मरण आणि प्रार्थना होईल याची काळजी घ्यायला हवी. नामस्मरण आणि प्रार्थनेमुळे घरातील वातावरण शुद्ध होतं शिवाय या वातावरणात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा घरातील लोकांसाठी पोषक आणि पूरक ठरते. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं कारण तिथे सतत नामस्मरण सुरू असतं. घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी घरात देवाजवळ दिवा लावून नामस्मरण अथवा प्रार्थना जरूर करा. ज्यामुळे तुमचं मन नक्कीच प्रसन्न राहील. घरातील लहान मुलांनादेखील प्रार्थना, श्लोक म्हणण्याची सवय लावा.

3. घरात सतत वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या

ज्या घरात सतत भांडणं आणि वादविवाद होत असतात. त्या घरात दुःख, दारिद्र आणि नैराश्य वास करत असतं. भांडताना माणसं नेहमी तावातावाने आणि चुकीचं बोलत असतात. ज्याला तुमची वास्तू तथास्तू म्हणत असते. वास्तू आणि माणसाच्या मनाचं एक वेगळंच नातं असतं. ज्याचा परिणाम तुमच्या जीवनावर नकळत होत असतो. यासाठीच घरात कमीतकमी वाद आणि भांडण होईल याची काळजी घ्या. 

4. घरातील अनावश्यक वस्तू काढून टाका

घरात काय वस्तू आहेत आणि त्याचा तुम्ही कसा वापर करता हे फार महत्वाचं आहे. काही लोकांना विनाकारण गरज नसलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते. ज्यामुळे घरात अडचण आणि धुळ साठत जाते. ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते. घरात नेहमी गरजेच्या वस्तू असाव्यात ज्यामुळे अडगळ वाढत नाही. जर तुमच्या घरात बिना गरजेच्या वस्तू साठलेल्या असतील तर त्या घराबाहेर काढा अथवा एखाद्या गरजूला दान करा. घर नीट जितकं नेटकं असेल तितकं घरातील माणसांची मनं प्रसन्न आणि प्रफुल्लित राहतात. 

5. घरात चांगली पुस्तकं ठेवा आणि मंद संगीत लावा

चांगल्या विचारांची पुस्तके आणि सुरेल संगीत मनाला नेहमीच उभारी देत असतं. खरंतर घरात राहणाऱ्या माणसांचे विचार कसे आहेत यावर घरातील वातावरण चांगले असेल की नकारात्मक हे ठरत असतं. यासाठीच घरात चांगल्या पुस्तकांची लायब्ररी तयार करा. ज्यामुळे तुम्ही सतत चांगला विचारांच्या संगतीत राहाल. शिवाय घरात असताना फार मोठ्या आवाजातील डोकं  सुन्न करणारी गाणी ऐकण्याऐवजी शांत आणि मनाला प्रसन्न करणारी मंद सुरातील गाणी अथवा संगीत लावा. ज्यामुळे तुमच्या घरात सतत चांगले वातावरण निर्माण होईल. 

अधिक वाचा

Vaastu Tips : तुमचं घर सांगतं तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही

घराच्या सौदर्यांत भर टाकणाऱ्या ‘कॉटन आणि हँडलूम’ पडद्यांच्या टेंडविषयी बरंच काही…

कपाटातील जुन्या कपड्यांचा असाही करता येऊ शकतो वापर

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम