भारतीय स्वयंपाकात आळशी हा काही नवीन पदार्थ नाही. फार पूर्वीपासून आपल्याकडे आहारात आळशीचा वापर केला जातो. मुखवासात बडीसोपसोबत अळशीदेखील भाजून टाकली जाते. आळशीची पूड करून तुम्ही ती डाळ,भाजीत वापरू शकता. आळशीच्या या छोट्या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा थ्री अॅसिडसारखे घटक असतात ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तज्ञ्ज असं सांगतात की, निरोगी माणसाने दररोज तीन चमचे आळशीचे सेवन करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या आळशीचा वापर आहारात नियमित करण्यासाठी कोणत्या पदार्थांमध्ये आळशी टाकावी अथवा आळशीपासून कोणते पदार्थ तयार करावेत.
आळशीची चटणी –
चटणी हा सर्वांचा आवडता पदार्थ असतो. पोळी, वरणभात, पराठा असं कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता.
साहित्य –
- एक कप आळशी
- तीन काश्मिरी मिरच्या
- एक चमचा जिरे
- मीठ चवीनुसार
चटणी करण्याची कृती –
- आळशीच्या बिया एका छोट्या नॉनस्टिक भांड्यात दोन ते तीन मिनिट रोस्ट करा
- आळशीच्या बिया बाजूला काढा आणि मिरच्या भाजून घ्या
- मिरच्या भाजू झाल्यावर त्याचप्रमाणे जिरं ही रोस्ट करा
- सर्व मिश्रण थंड झाल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्सरवर जाडसर दळून घ्या
- तयार चटणी तुम्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता
- आठवडाभर ही चटणी टिकू शकते. जास्त दिवस टिकवण्याची गरज असल्यास फ्रीजमध्ये ठेवा
आळशीचा खाकरा –
पोळी अथवा खाकरा हा आपला दैनंदिन आहार आहे. खाकरा खूप दिवस टिकत असल्यामुळे तो प्रवासासाठी नेता येतो. म्हणूनच यंदा प्रवासाला जाताना असा पौष्टिक खाकरा तयार करा.
साहित्य –
- दीड कप ओटस्
- दीड कप गव्हाचे पीठ
- दोन चमचे आळशीची पावडर
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा धणे पावडर
- तीन चमचे आळशीच्या बिया
- तेल
- चवीपुरतं मीठ
आळशीचा खाकरा करण्याची कृती –
- सर्व साहित्य एका भांड्यांत घ्या आणि मळून पीठाचा गोळा तयार करा
- मळलेल्या पीठाचे समान भाग करा
- खाकऱ्यासाठी पोळी लाटा आणि वरून आळशीच्या बिया भुरभुरा
- पुन्हा एकदा पोळी लाटून घ्या
- नॉन स्टिक तव्यावर खाकरा शेकवून घ्या
- तुम्ही हा खाकरा लगेच खाऊ शकता अथवा साठवून ठेवू शकता
आळशीचा रायतं –
रायतं खाण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. या रायत्यामध्ये दही आणि आळशीच्या बियांचा वापर केला असल्यामुळे तो तुमच्या शरीरासाठी नक्कीच पौष्टिक ठरेल.
साहित्य –
- एक कप दही
- दीड चमचा आळशीच्या बिया
- एक चमचा मध
रायता करण्याची कृती –
- एका भांड्यात हे सर्व साहित्य एकत्र करा
- जेवताना लगेच तयार करून रायता खाण्यासाठी घ्या
आळशीचा मुखवास –
जेवल्यानंतर अनेकांना मुखवास खाण्याची सवय असते. मुखवास खाण्यामुळे जेवणानंतर तोंडाला येणारा वास तर कमी होतोच शिवाय जेवण चांगल्या पद्धतीने पचण्यास मदत होते.
साहित्य –
- एक चमचा आळशीच्या बिया
- एक चमचा काळे तीळ
- एक चमचा पांढरे तीळ
- एक चमचा बडीसोप
- एक चमचा लिंबू
- अर्धा चमचा मीठ
- अर्धा चमचा साखर
आळशीचा मुखवास तयार करण्याची कृती –
- सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करा
- त्यात लिंबाचा रस टाका
- मीठ टाकून एकजीव करा आणि एक तास तसंच ठेवा
- एक तासानंतर नॉन स्टिक तव्यावर हे सर्व मिश्रण एक ते दोन मिनिटांसाठी रोस्ट करा
- थंड झाल्यावर त्यात साखर टाका
- हवाबंद डब्यात भरून ठेवा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मिश्र डाळींपासून बनवा या हेल्दी रेसिपीज