पाडवा हा प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी खास दिवस. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून हा दिवस अगदी खास मानला जातो. याला चैत्र पाडवा असंही म्हटलं जातं. कारण या दिवसापासून हिंदू नववर्षाचा चैत्र महिना सुरु होतो. महाराष्ट्रीयन लोक दारावर गुढी उभारून हा सण साजरा करतात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक असं समजण्यात येतं. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सव सुरू होतो. असं म्हटलं जातं की, राम या दिवशी वनवास संपवून आपल्या घरी परतला तेव्हापासून या परंपरेला सुरुवात झाली असंही म्हटलं जातं. तसंच ब्रह्मदेवाने या दिवशी जगाची निर्मिती केली अशीही आख्यायिका आहे. या दिवशी प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये गोडधोड आणि साधा सोपा असा जेवणाचा बेत असतो. याशिवाय पाडवा पूर्णच होत नाही. आपण गुढीपाडव्यासाठी हेच साधे सोपे पदार्थ कसे पटापट बनवता येतील आणि सणाच्या दिवशी नेवैद्याचं ताट कसं वाढवायचं हे जाणून घेणार आहोत.
आरोग्यदृष्ट्या पाडव्याचं महत्त्व
चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळीच ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. याचं आरोग्यदृष्ट्या खास महत्त्व आहे. पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.
जेवणासाठी काय असतं खास?
महाराष्ट्रीयन जेवणामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी खास बेत असतो. अगदी साग्रसंगीत या दिवशी जेवण केलं जातं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुरी, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, वरण – भात, खोबऱ्याची चटणी, श्रीखंड, साखरभात, पुरण, खीर, घाटलं असा अगदी भरपेट बेत केला जातो. यामध्ये लोणचं आणि पापडही असतात. पण इतका मोठा पसारा वाचल्यानंतर तुमच्या मनात सर्वात पहिलं येतं ते म्हणजे हे सगळं कसं करायंच? कारण आजकाल कोणालाही इतका वेळ नसतो. मग हे सर्व होणार कसं. तर तुम्ही हे सर्व एका तासामध्येही पटापट मॅनेज करू शकता. ते कसं ते आम्ही तुम्हाला सांगतो. मुळात आपण नक्की कोणता बेत आखणार आहोत ते ठरवून घ्या. त्यानंतर त्यासाठी लागणारं सामान आणून ठेवा आणि मग पाडव्याच्या दिवशी तुम्ही पटापट हे पदार्थ करू शकता.
वाचा – महाराष्ट्रीयन व्हेज आणि नॉन व्हेज थाळीमध्ये हे पदार्थ करा समाविष्ट
कशी करावी पदार्थांची आखणी?
तुम्हाला नक्की पाडव्याच्या दिवशी काय पदार्थ करायचे आहेत हे आधी आखून घ्या. पुरी – भाजी, कोशिंबीर, वरण – भात आणि एक गोड पदार्थ हे तर ठरलेलंच असतं. मग नक्की कोणता गोड पदार्थ करायचा आहे हे आधी ठरवून घ्या. गुढीपाडवा म्हटलं की, श्रीखंडाचा अतूट नातं हे ठरलेलं. आजकाल श्रीखंड बनवण्याचा जास्त खटाटोप कोणी करत नाही. पण तुम्ही आदल्याच दिवशी हे करून घेतलंत तर बाकी जेवण उरकायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे हे दोन दिवस आधीच ठरवून त्याप्रमाणे आखणी करा आणि मग वेळेचं नियोजन करत तुम्ही तुमच्या नववर्षाला खास बेत ठरवा.
एक तासात कसे कराल हे पदार्थ ?
सर्वात पहिल्यांदा तुम्ही कुकरमध्ये तांदूळ आणि तुरीच्या डाळीचं भांडं लावा. त्याचबरोबर एका भांड्यात बटाटेही शिजायला ठेवा. त्यानंतर पुरीचं पीठ भिजवून घ्या. म्हणजे इतर गोष्टी करताना ते पीठ व्यवस्थित तिंबून राहील. कारण पुऱ्या या सर्वांना गरमागरम खायला आवडतात. त्यामुळे त्या सर्वात शेवटी करायला घ्याव्या लागतात. पुरीचं पीठ भिजवून होईपर्यंत अर्थातच तुमच्या कुकरच्या शिट्या होऊन तुमचे बटाटे आणि डाळ – भात हा शिजलेला असेल. कुकरचं झाकण उघडायला वेळ असेपर्यंत तुम्ही चटणीचा नारळ खोऊन घ्या. त्याची चटणी तयार करा. तोपर्यंत झाकण निघेल. बटाटे काढून त्याची भाजी करा. एका बाजूला वरणात पाणी घालून ते सारखं करून घ्या. भाजी फोडणीला घालून नीट वाफ येईपर्यंत काकडी चिरायला घ्या. म्हणजे हे असं एका बाजूला करता करता पटकन तुमचं संपूर्ण जेवण तयार होईल. सर्वात शेवटी पुरी तळा आणि मग पापडही त्याच तेलामध्ये शेवटी तळून घ्या. फक्त श्रीखंड आदल्या दिवशी तयार करा. खीर करायची असल्यास, या मॅनेजमेंटमध्ये ती पटकन होऊ शकते.
वरील पदार्थ बनवण्याची पद्धत
पुरी –
गव्हाचं पीठ त्यात तेल, मीठ घालून पाण्याने भिजवा. थोडं घट्ट भिजवा. पुरीचं पीठ हे पोळीच्या पिठाप्रमाणे सैलसर नसावे. सैलसर भिजवल्यास पुरी फुगत नाही. त्यानंतर तुम्हाला जर पटापट पुरी करायची असेल आणि गोलाकार आकाराचीच हवी असेल. तर पोळपाटभर एक थोडी जाडी पोळी लाटून घ्या आणि मग स्टीलच्या काठ असलेल्या वाटीने त्यावर छाप मारा. म्हणजे एका आकारात पुऱ्या दिसतात.
बटाटा भाजी –
बटाटे शिजवून मध्यम आकाराचे तुकडे करावेत. तुकड्यांवरच थोडी साखर, हिंग, हळद आणि चवीपुरतं मीठ घालावं. (कढईत हे असं टाकल्यास, सर्व बटाट्याला त्याची व्यवस्थित चव लागते) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हवं असल्यास, आल्याचे तुकडे घालावेत. थोडं परतून त्यावर बटाट्याच्या फोडी परताव्यात. एक वाफ काढावी. गरमागरम भाजी तयार. त्यावर कोथिंबीर चिरून घालावी. तुम्हाला आवडत असल्यास, खरवडलेलं खोबरं घातलं तरीही चालेल. (नेवैद्यासाठी कांदा घालत नसल्यामुळे कांदा घालणं सहसा टाळलं जातं)
वाचा – नववर्षाचं पर्व साजरं करा.. गुढीपाडवा शुभेच्छा संदेश द्या
काकडीची कोशिंबीर –
काकडीचे तुकडे न करता ती हातात घेऊन सुरीने कोचावी आणि मग कापावी. पूर्ण काकडी कोचून झाली की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, साखर, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू रस हे घालावं. त्यानंतर तुम्हाला आवडत असल्यास, तूप नाहीतर तेलाची फोडणी वरून द्यावी. यामध्ये तूप वा तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, हिंग घालावं आणि वरून फोडणी दिल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करावं.
खोबऱ्याची चटणी –
खोबरं विळीवर खरवडून घ्या. त्यामध्ये साखर, मीठ, लिंबू रस, कोथिंबीर हे सर्व मिक्स करून मिक्सरमधून पाणी घालून बारीक वाटून घ्या. हवं तर आलं घाला. पण लसूण घालू नका. सहसा नेवैद्याला लसूण चालत नाही त्यामुळे लसूण घालू नका.
वरण – भात –
कुकरमध्ये तांदूळ एका भांड्यात आणि तुरीची डाळ एका भांड्यात घालून त्यात प्रमाणात पाणी घालून तीन ते चार शिट्या काढून व्यवस्थित शिजवून घ्यावं. त्यानंतर शिजलेली डाळ बाहेर काढून एका भांड्यात तुम्हाला हवं तसं फोडणीचं वरण अथवा गूळ आणि मीठ घातलेलं वरण बनवून घ्यावं.
श्रीखंड –
श्रीखंडासाठी तुम्ही एक दिवस आधी दही लावून घ्या. त्यानंतर त्याचा चक्का बनवून घ्या. चक्का बनवण्यासाठी तुम्हाला दही फडक्यामध्ये घालून पूर्ण रात्रभर ठेवायचं असतं. त्यातील पूर्ण पाणी निघून जाऊन त्याचा चक्का तयार होतो. हा चक्का काढून नंतर त्यामध्ये साखर मिक्स करून राहू द्या. जितका चक्का तितकी साखर असं प्रमाण असू द्या. त्यानंतर हे मिश्रण चाळून घ्या. त्यातून जे मिश्रण येईल त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ घालून चविष्ट श्रीखंड खायला घ्या.
शेवयांची खीर –
शेवया तूपामध्ये भाजून घ्याव्यात. त्यानंतर दूध गरम करून घ्यावं. शेवया भाजून झाल्यानंतर त्यात गरम दूध, साखर घालून त्याला मंद आचेवर उकळी देत राहावं. नंतर त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास वेलची पावडर आणि इतर ड्रायफ्रूटस घालावेत.
पुरण –
चणाडाळ शिजवून घ्यावी. गूळ चिरून घ्यावा. त्यानंतर शिजलेली चणाडाळ आणि गूळ मिक्स करून पुन्हा शिजवावे. त्याला सुटलेलं पाणी थोडं कमी होऊ द्यावं. त्यामध्ये जायफळ पावडर अथवा वेलची पावडर घालून तुम्ही ते सर्व्ह करू शकता.
साखरभात –
एका पॅनमध्ये तूप गरम करून हलके परतून घ्यावेत. त्यातच नंतर लवंगा घालून निथळून ठेवलेले तांदूळ परतून घ्यावेत. परतलेल्या तांदळामध्ये दोन वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. शिजवलेला भात ताटात काढून पसरवून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये साखर आणि आणि पाव वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घालून एकत्र करा. त्यात भाजलेलं केशर घाला आणि गोळीबंद पाक करा. पाक खूप पातळ ठेऊ नका. नाहीतर भात मिसळल्यास, तो पाणचट होईल. पाक चिकट झाला तर त्यात गार केलेला भात घाला. त्यामध्ये तळलेले काजू, बदामामचे काप आणि बेदाणे घालावेत आणि झाकून मंद आचेवर दोन वाफा काढाव्यात. वरून नाजूक तूप सोडावं. थोडा गार झाल्यावर वेलचीपूड घालावी. हा भात आदल्या दिवशी करून ठेवावा. कारण त्यामध्ये पाक छान मुरतो आणि दुसऱ्या दिवशी त्यामुळे भात चवीला छान लागतो.
घाटलं –
जाडसर तांदळाचं पीठ घ्या. ओलं खोबरं आणि गूळ गोड हवं त्याप्रमाणात घेऊन हे सर्व मिक्स पाण्यात करून घ्या. एक वाटी तांदूळ पीठ असल्यास, अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं इतकं प्रमाण ठेवावं. हे सर्व पाण्यात मिक्स करून घ्यावं. त्यात केशरी रंग घालावा. हे सर्व शिजवून घ्यावं. शिजत आल्यानंतर त्यात वेलची पावडर वा जायफळ पावडर अथवा तुम्हाला हवे तसे ड्रायफ्रूट्स घालावेत. गूळ असल्यामुळे याची चव अप्रतिम लागते. फक्त यामध्ये गोडाचं प्रमाण तुम्ही कमी ठेवल्यास हे अधिक चविष्ट लागतं हे नक्की लक्षात ठेवा.
नेवैद्याचं ताट कसं मांडावं
गुढीपाडवा असो अथवा कोणताही सण आपल्याकडे ताट मांडण्याचीही एक पद्धत आहे. पण बऱ्याच जणांना याचं गणित कळत नाही. नक्की कोणत्या बाजूला भाजी, चटणी आणि गोड वाढायचं हे कळत नाही. पण आम्ही तुम्हाला हे ताट कसं वाढायचं हे सांगणार आहोत. याची रंगसंगती दिसायला खूप सुंदर दिसते आणि ताटही पूर्ण भरल्यासारखं वाटतं. असं म्हणतात की, ताट बघितल्यानंतरच पोट भरल्यासारखं वाटायला हवं. त्यामुळेच ताट मांडण्याची एक पद्धत असते तीच पद्धत आम्ही तुम्हाला सांगतोय.
ताटात वाढताना काही पदार्थ हे जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूला तर काही पदार्थ हे उजव्या बाजूला वाढले जातात. तर काही पदार्थ हे मधल्या भागात वाढले जातात. मुख्य जेवण उजवीकडे आणि मध्यभागी असतं. लोणंचं, चटणी, कोशिंबीर हे ताटाच्या डाव्या बाजूला वाढलं जातं. भाजीपेक्षा कमी प्रमाणात हे पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे हे डाव्या बाजूला असतात. हे पदार्थ तोंडीलावणं म्हणून वापरलं जातात. शिवाय यामध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं. भाज्यांचं आहारातील प्रमाण जास्त असल्यामुळे उजव्या बाजूला वाढल्या जातात. तर पोळी आणि भाताचं सेवन हे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते मध्यभागी वाढलं जातं. डावी बाजू ही कमी प्रमाणात असूनही वास, रंग आणि चवीने उत्तम असते. त्यामुळे त्याने भूक वाढते. म्हणून ही बाजू पहिली वाढली जाते.
कोणत्या क्रमाने पदार्थ वाढावेत
सर्वात पहिल्यांदा ताटामध्ये दही वाढावं. डाव्या बाजूने सुरूवात करावी. त्याखाली लिंबू, त्याखाली चटणी, लोणचं, कोशिंबीर, तळणीतील पदार्थ अर्थात पापड, मिरगुंड, त्यानंतर गोड पदार्थ अर्थात खीर, पुरण जे असेल ते. तर उजव्या बाजूला प्रथम कोरडी भाजी, त्याखालोखाल रसभाजी, उसळ, पातळ भाजी आणि त्यानंतर कढी अथवा आमटी जे काही असेल तो पदार्थ वाढावा. मध्यभागी सर्वप्रथम मसालेभात अथवा वरण भात, पोळी, मग गोडाचा शिरा असल्यास हा पदार्थ वाढावा.
अर्थात हे सर्व पदार्थ अगदी साधे आणि घरगुती असले तरीही याचीच चव जास्त चांगली लागते. सहसा बऱ्याच महाराष्ट्रीयन घरांमध्ये पंचपक्वान्न केलं जातं. त्यामुळे इथे पाच पक्वान्नांची रेसिपी आम्ही दिली आहे. तुम्हाला यामध्ये दुसरं कोणतंही पक्वान्न आवडत असेल तर तुमच्या सोयीनुसार ते बनवा. बाहेरून पदार्थ आणण्यापेक्षा घरीच सणासुदीला केलं तर आपल्यालाही एक प्रकारे समाधान मिळतं. त्यामुळे वेळ वाचवून हे सोपे आणि साधे पदार्थ या गुढीपाडव्याला तुम्हाला करता येत आहेत का नक्की बघा. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या ‘POPxo Marathi’ कडून खूप खूप शुभेच्छा!
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
कारवारी मेजवानी मुंबईमध्ये, कारवारी भोजनाचा अप्रतिम आस्वाद
महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी
दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज