तोंडाला घाणेरडा वास येण्यामागे तोंडाची अस्वच्छता राखणे, उग्र वासाचे पदार्थ खाणे, एखादा आजार अथवा दाताचे विकार कारणीभूत असू शकतात. मात्र तोंडाला वास येत असेल तर चारचौघात वावरण्याचा संकोच वाटू लागतो. अशी माणसं लोकांशी कमी बोलतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. पण यामागे कोणतेही कारण असले तरी तोंडाची नीट स्वच्छता राखून आणि घरी तयार केलेले माऊथवॉश वापरून तुम्ही तोंडाची दुर्गंधी कमी करू शकता.
मीठाचे पाणी
मीठ हे निर्जंतूक करण्यासाठी वापरले जाणारे प्राचीन आणि नैसर्गिक साधन आहे. यासाठी तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या तोंडाच्या स्वच्छतेसाठी मीठाचा वापर करू शकता. ज्यामुळे तोंडातील जीवजंतू नष्ट होतील आणि तोंडाचे आरोग्य राखले जाईल. यासाठी एक कप कोमट पाण्यात थोडे मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा. आणि या पाण्याने काही मिनीटे चुळ भरा. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे तुमचा घसा आणि तोंड स्वच्छ होते. यासोबतच वाचा दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)
लवंग तेल आणि दालचिनीचा करा वापर
लवंग आणि दालचिनी तुमच्या दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात. यामध्ये अॅंटि सेप्टिक गुणधर्म असल्यामुळे तुमच्या तोडांतील बॅक्टेरिआ तर मरतात शिवाय दातांची दुखणी बरी होतात. यासाठी एक कप कोमट पाण्यात थोडं लवंग तेल आणि आणि दालचिनीच्या तेलाचे थेंब टाका. ब्रश केल्यानंतर या पाण्याने चूळ भरा ज्यामुळे तुमचे तोंड स्वच्छ होईल आणि तोंडाला चांगला वास येईल.
लिंबाचा रसामुळे नष्ट होतील जीवजंतू
लिंबाच्या रसामुळे तुमच्या तोंडाला येणारा घाणेरडा वास नक्कीच कमी होऊ शकतो. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते. ज्यामुळे तोंडातील जीवजंतू नष्ट होतात आणि तोंडाला चांगला वास येतो. यासाठी कोमट पाण्यात फ्रेश लिंबाचा रस टाका आणि त्याने चूळ भरा. तुम्ही दिवसातून दोनदा या नैसर्गिक माऊथवॉशचा वापर करू शकता.
पुदिना तेल आहे उत्तम
पुदिना तेलाचा वापर करून तुम्ही तुमच्या तोंडाचे आरोग्य राखू शकता. कारण या तेलामुळे तुमच्या तोडांमधील जीवजंतू कमी होतीलच शिवाय तोंडाला चांगला सुगंध आणि फ्रेशनेस मिळेल. यासाठी कोमट पाण्यात थोडं पुदिना तेल आणि ट्री ट्री ऑईल मिसळा आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरा. मात्र लक्षात ठेवा हे पाणी पोटात जाणार नाही याची काळजी घ्या.
मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्यामुळे तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी होतो. यासाठी जाणून घ्या बडीशेप खाण्याचे फायदे आणि तोटे (Fennel Seeds In Marathi)