गणपती बाप्पाच्या आगमनाला जोरदार सुरुवात सगळीकडे झाली आहे. अगदी घराघरातून मखर, नेवैद्याच्या वस्तू, दागदागिने या सगळ्याच्याच तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. बाप्पा घरी येणार म्हटलं की प्रत्येकाकडे उत्साह संचारलेला दिसून येतो. तसंच अगदी घरातील लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो. बाप्पा एक उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. गणपती घरात आल्यानंतर सर्वात पहिले जर काही असेल तर त्याची पूजा आणि पूजा झाल्यानंतर त्याला दाखवण्यात येणारा नेवैद्य. तसं तर गपणतीच्या नेवैद्यासाठी प्रत्येकाकडे खास तयारी केलेली असते. मोदक, विविध भाज्या, पुऱ्या आणि काही ठिकाणी तर पंचपक्वान्न असा जंगी थाट असतो. पण बऱ्याच जणांना नक्की नेवैद्या वाढायचा कसा याची अजूनही माहिती नसते. कोणताही पदार्थ कोणत्याही बाजूला वाढला जातो. पूर्वीपासून एक परंपरांगत पद्धत चालत आली आहे. आपण हेच जाणून घेणार आहोत की बाप्पाचा नेवैद्य नक्की कशा तऱ्हेने वाढावा. ताट कसं सजवावं.
बदललेली जीवनशैली
भारतीय पद्धतीचे जेवण, मुख्यत्वे मराठी पद्धतीचे जेवण म्हटलं की, आठवते ती पंगत. काळानुसार जीवनशैली बदलली. घरातील माणसं कमी झाली. टेबलवर बसण्याची पद्धत आली. पण अजूनही सणासुदीला ही परंपरा बऱ्याच घरांमध्ये कायम राखली जाते. पंगत म्हटली की, केळीच्या पानवरील जेवण आलंच. त्यावर क्रमाने, ठराविक ठिकाणी वाढले जाणारे पदार्थ आणि त्याची रंगसंगती म्हणजे डोळ्यांचंही पारणं फिटतं. या ठराविक क्रमाचं, जागेचं आणि प्रमाणाचं नेहमी जुनी माणसंही महत्त्व सांगतात. पण आजकाल बऱ्याच जणांना हे पान वाढता येत नाही. त्यामुळे आपण यातून नक्की हे पान कसं वाढायचं हे जाणून घेणार आहोत.
कारवारी मेजवानी मुंबईमध्ये, कारवारी भोजनाचा अप्रतिम आस्वाद
नेवैद्याचं ताट वाढण्याची पद्धत
कोणताही सण आपल्याकडे ताट मांडण्याचीही एक पद्धत आहे. पण बऱ्याच जणांना याचं गणित कळत नाही. नक्की कोणत्या बाजूला भाजी, चटणी आणि गोड वाढायचं हे कळत नाही. पण आम्ही तुम्हाला हे ताट कसं वाढायचं हे सांगणार आहोत. याची रंगसंगती दिसायला खूप सुंदर दिसते आणि ताटही पूर्ण भरल्यासारखं वाटतं. असं म्हणतात की, ताट बघितल्यानंतरच पोट भरल्यासारखं वाटायला हवं. त्यामुळेच ताट मांडण्याची एक पद्धत असते तीच पद्धत आम्ही तुम्हाला सांगतोय.
ताटात वाढताना काही पदार्थ हे जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूला तर काही पदार्थ हे उजव्या बाजूला वाढले जातात. तर काही पदार्थ हे मधल्या भागात वाढले जातात. मुख्य जेवण उजवीकडे आणि मध्यभागी असतं. लोणंचं, चटणी, कोशिंबीर हे ताटाच्या डाव्या बाजूला वाढलं जातं. भाजीपेक्षा कमी प्रमाणात हे पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे हे डाव्या बाजूला असतात. हे पदार्थ तोंडीलावणं म्हणून वापरलं जातात. शिवाय यामध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं. भाज्यांचं आहारातील प्रमाण जास्त असल्यामुळे उजव्या बाजूला वाढल्या जातात. तर पोळी आणि भाताचं सेवन हे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते मध्यभागी वाढलं जातं. डावी बाजू ही कमी प्रमाणात असूनही वास, रंग आणि चवीने उत्तम असते. त्यामुळे त्याने भूक वाढते. म्हणून ही बाजू पहिली वाढली जाते.
‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend
ताट कसं वाढावं
सर्वात पहिल्यांदा ताटामध्ये दही वाढावं. डाव्या बाजूने सुरूवात करावी. त्याखाली लिंबू, त्याखाली चटणी, लोणचं, कोशिंबीर, तळणीतील पदार्थ अर्थात पापड, मिरगुंड, त्यानंतर गोड पदार्थ अर्थात खीर, पुरण, मोदक जे असेल ते. तर उजव्या बाजूला प्रथम कोरडी भाजी, त्याखालोखाल रसभाजी, उसळ, पातळ भाजी आणि त्यानंतर कढी अथवा आमटी जे काही असेल तो पदार्थ वाढावा. मध्यभागी सर्वप्रथम मसालेभात अथवा वरण भात, पोळी, मग गोडाचा शिरा असल्यास हा पदार्थ वाढावा. अर्थात हे सर्व पदार्थ अगदी साधे आणि घरगुती असले तरीही याचीच चव जास्त चांगली लागते. सहसा बऱ्याच महाराष्ट्रीयन घरांमध्ये पंचपक्वान्न केलं जातं. तुम्हाला यामध्ये दुसरं कोणतंही पक्वान्न आवडत असेल तर तुमच्या सोयीनुसार ते बनवा. बाहेरून पदार्थ आणण्यापेक्षा घरीच सणासुदीला केलं तर आपल्यालाही एक प्रकारे समाधान मिळतं.