दिवाळी संपली असली तरी अजूनही गोडाधोडाचे पदार्थ खाण्याची इच्छा अजूनही अनेकांची गेली नसेल. घरातील रवा आणि बेसन लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर घरीच अगदी तीन साहित्यापासून बाजारात मिळणारी अशी सेम टू सेम बालुशाही तुम्ही घरी बनवू शकता. खुसखुशीत आणि मधूनमधून लागणारी गोड अशी बालुशाही बनवण्यासाठी थोडी मेहनत लागते खरी पण ती होते एकदम परफेक्ट. बालुशाही असे युट्युबवर टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे लाखो व्हिडिओ मिळतील. पण कोणती रेसिपी परफेक्ट काम करते हे तुम्हाला आम्ही आता सांगणार आहोत. चला जाणून घेऊया बालुशाही आणि त्याच्या रेसिपीबद्दल
बालुशाहीचा शोध
बालुशाहीचा उल्लेख हा पारंपरिक मिठाईंमध्ये केला जातो. बालुशाही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. यामध्ये बधुशा, बादुशा,भादुशाह अशा वेगवेगळ्या नावांनी त्याची ओळख आहे. दिल्ली ही बालुशाहीचे मूळ आहे असे मानले जाते. दिल्लीच्या रस्त्यांवर बालुशाही पूर्वीपासून विकली जायची. इतर राज्यांनी विकताना त्याच्या नावाचा आणि त्याच्या दिसण्यामध्ये थोडा थोडा बदल केला. दिल्लीतून भारताच्या नकाशात खाली खाली उतरत हा पदार्थ सगळीकडे बनवला जातो. याला ‘मक्खन वडा’ असे देखील म्हणतात. खूप ठिकाणी याच्यावर डोनट प्रमाणे क्रिम लावले जाते. त्यामुळे हा पदार्थ थोड्या फार प्रमाणात वेगळा दिसू लागतो.
बालुशाही रेसिपी
बालुशाही बनवण्यासाठी साहित्य फार लागत नाही. पण थोडी मेहनत नक्की लागते. बालुशाही नेमकी कशी बनवायची ते जाणून घेऊया.
साहित्य: १ वाटी मैदा, १ चमचा तूप, आवश्यकतेनुसार पाणी, साखर, तळण्यासाठी तेल, सजावटीसाठी बदाम- पिस्त्याचे काप, वेलची पूड- केशर
कृती :
- एका मोठ्या भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये १ चमचा तूप घाला. अगदी अलगद हाताने मैद्याला तूप चोळून घ्या.
- मैदा आणि तूप एकत्र झाल्यानंतर आता मैद्यात लागेल इतके पाणी घालून ते हलक्या हाताने मळून घ्या. मैदा मळताना तो अजिबात इतर कणकेप्रमाणे जोरजोरात किंवा खालीवर करुन मळता कामा नये. हळुवार हातानेच पीठ एकजीव व्हायला हवे.
- मैद्याचा गोळा तयार झाला की, तो थोडा वेळ तसाच तिंबायला ठेवून द्या.
- दुसरीकडे कढईमध्ये पाणी गरम करुन त्यामध्ये साखर घाला. यासाठी एकतारी पाक गरजेचा असतो. पाक बनवण्याची पद्धत जाणून घेत पाक तयार करा. पाक तयार झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये केशराच्या काड्या आणि वेलची पूड घाला.
- आता मैद्याचा गोळा घेऊन तो काहीही न करता अलगद गोलाकार करुन घ्या. त्याला मध्ये भोक पाडून घ्या. (याला पदर सुटायचे असतील तर तयार गोळा बाहेरच्या बाजूने थोडे थोडे पीठ घेऊन ढकलत राहा.
- आता तेल मंद आचेवर गरम करुन मंद आचेवरच बालुशाही तळायला घ्या. हीच खरी कसोटीची वेळ असते ज्यावेळी तुम्हाला बालुशाही अगदी मंद आचेवर तळायची असते. त्यामुळे त्याला बराच वेळ जातो.
- बालुशाहीला छान गोल्डन असा रंग आल्यानंतर आणि तेलाची बुडबुड थांबल्यानंतर ती निथळून थेट पाकात टाका.
- पाक चांगला लागला की, एका प्लेटमध्ये काढून त्यावर चांदीचा वर्ख, ड्रायफ्रुट्सचे काप घाला.
बालुशाही तयार! आता ही रेसिपी नक्की ट्राय करा
अधिक वाचा
Khekada Khanyache Fayde | जाणून घ्या खेकडा खाण्याचे फायदे