दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडींसह सतत नवनवीन सामाजिक विषय हाताळणारी ‘हम बने तुम बने’ मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. आता ही मालिका एक वेगळाच विषय पुढील एपिसोडमध्ये मांडणार आहे. आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांनी सर्वच क्षेत्रात अव्वल असावं अशी पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे हल्ली मुलांना शाळा आणि त्या व्यतिरिक्त विविध क्लासेससाठी घराबाहेर जावं लागतं. या निरनिराळ्या क्लासेसच्या चक्रात अडकल्यामुळे मुलांचं बालपण मात्र कधीच हरवून जातं. शिवाय क्लासेच्या या चक्रात अडकून जर मुलं पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू नाही शकली तर घरात आरडाओरडा होतो तो वेगळाच. अशा वेळी नेमकं कसं वागावं हा मोठा गहन प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो आणि त्यातूनच मुलं पालकांशी गैरवर्तन करू लागतात. पालकांच्या या अशा वागण्यामुळे मुलं आणि पालक यांच्यात एक दरी निर्माण होत जाते जी पार करणं नंतर पालकांना कठीणच नाही तर अशक्य होवून बसते.
हम बने तुम बने मालिकेमध्ये पालकत्वाचे धडे
सतत निरनिराळे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ‘हम बने तुम बने’ या मालिकेतील पुढील एपिसोडमध्ये पालकत्वावर आधारित एका कठीण आव्हानाला तोंड देणारा प्रसंग दाखवण्यात येणार आहे. या भागात कमी मार्क मिळाल्याने रेहा सईच्या रिपोर्ट कार्डवर तिच्या बाबांची खोटी सही करते. मात्र पुढे ही गोष्ट लक्षात आल्याने तुलिका सईवर चिडते. या सर्व गोष्टींमुळे हर्षदाचा संताप अनावर होतो आणि ती रेहावर हात उगारते. या सर्व गडबडीत मुलांवर हात उगारल्यामुळे आईसाहेब आपल्या दोन्ही सुनांवर रागवतात हे दाखवलं जाणार आहे. घरोघरी घडणाऱ्या या साध्या पण तितक्याच गंभीर विषयातून या मालिकेत प्रेक्षकांना पालकत्वाचा धडा मिळणार आहे. खरंतर असे प्रसंग अनेकांच्या घरी घडत असतात मात्र अशा प्रसंगाना तोंड देणं पालकांना बऱ्याचदा जमत नाही. पालकत्व हा विषय अतिशय नाजूक आणि गंभीर आहे. कारण पालकांची छोटीशी चुक मुलांच्या भविष्याला विपरित वळण देऊ शकते. यासाठी मुलांसोबत दररोज अचूक संवाद साधणं फार गरजेचं आहे. मुलांच्या चुकांना प्रत्येक वेळी शिक्षा करणं हाच उपाय असू शकत नाही. कारण शिक्षेने मुलं सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त शक्यता असते. शिवाय मुलं आपलं ऐकण्यापेक्षा आपण कसं वागतो हेच पाहून मोठी होतात. त्यामुळे पालक कसे वागतात यांचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. या मालिकेत मुलांना पालकांशी खोटं का बोलावं वाटलं ? आईवडीलांशी संवाद साधणं मुलांना आजकाल कठीण का जातं ? आणि काही कारणाने असे प्रसंग घरात घडले तर त्यांना तोंड देताना पालकांची भूमिका नेमकी कशी असावी ? यावर प्रकाश टाकला जाणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर 7 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता हा एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. यापूर्वीही असे अनेक अनोखे विषय या मालिकेत मांडण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मासिक पाळी या विषयावर वडील आणि मुलीचा संवाद या मालिकेत दाखवण्यात आला होता. अतिशय कमी कालावधीत विविध नाविन्यपूर्ण विषय आणि अगदी हलक्या-फुलक्या विनोदी संवादांतून ही मालिका आज घराघरात आपलं स्थान हटके स्थान निर्माण करत आहे.
अधिक वाचाः
रोहित शेट्टीच्या कुटुंबामध्ये झालं नव्या पाहुण्याचं आगमन
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम