सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांचा ‘वेलकम होम’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. नक्की या चित्रपटामध्ये काय वेगळं आहे आणि या चित्रपटातील भूमिका मृणाल कुलकर्णीने का साकारली हे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रमुख भूमिका केलेल्या मृणाल कुलकर्णीने संवाद साधत सांगितलं…
वेलकम होम हा चित्रपट का करावासा वाटला?
सुमित्रा मावशींनी आठ दहा वर्षांपूर्वी मला ही कथा ऐकवली होती. त्यांची इच्छा होती, की मी या चित्रपटात काम करावं. माझ्यासाठी अत्यंत चांगली भूमिका आहे, असं त्यांना वाटत होतं. सुमित्रा मावशींबरोबर काम करण्याची खूप मनापासून इच्छा होती. माझ्यासाठी संहिता तुमच्याकडे का नाहीये, कथा का सुचत नाही, अशी मी प्रेमळ तक्रार त्यांच्याकडे अनेकदा करत असे. प्रत्येकवेळी मला त्या याच कथेची आठवण करून द्यायच्या. त्यामुळे त्यांच्या मनात या कथेसाठी माझाच विचार होता. पण काही वेळा योग जुळून यावे लागतात. तसा हा योग जुळून आला आणि अप्रतिम चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली. सुमित्रा मावशी आणि सुनील सुकथनकर ही खूप वेगळी जोडी आहे. सुमित्रा मावशी ज्या पद्धतीनं विषयाचा विचार करतात आणि लेखनात उतरवतात. त्यासाठी त्यांना खरोखरच मनापासून सलाम करावासा वाटतो. मी त्यांचे सर्व चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिलेले आहेत. एखादा विषय संवेदनशीलतेनं कसा मांडावा हे खरोखरच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. एक अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणूनही त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे. म्हणूनच ही वेलकम होमचा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी खास आहे.
आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या भूमिका आणि ही भूमिका यात काय आव्हान वाटलं?
मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. अलीकडे काही हलकेफुलके चित्रपटही केले. पण माझा मूळ पिंड संवेदनशील विषयांचा आहे. त्यामुळेच वेलकम होमची कथा मला भावली. मला वाटतं, प्रत्येक स्त्रीने हा चित्रपट बघायलाच हवा. केवळ स्त्रीनेच नाही, तर पुरुषांनीही.. जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता या विषयावर अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी बोलतो, त्यावेळी आपण या विषयात किती मागे आहोत, त्याची जाणीव या चित्रपटात होत राहाते. सुमित्रा मावशींचे चित्रपट कधीच एकांगी नसतात. त्याला नेहमी अनेक पदर असतात. प्रत्येक व्यक्तिरेखेचे या विषयाबाबत असलेला विचार आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रत्येक माणसाला लागू होईल, प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब दिसेल असा हा चित्रपट आहे. म्हणून माझ्यासाठी हा चित्रपट, ही भूमिका महत्त्वाची आहे. फार कमी वेळा इतकी खरी भूमिका, व्यक्तिरेखा करायला मिळते. ही भूमिका करायला मिळाली, मला डोळ्यासमोर ठेवून लिहिली गेली याचा मला आनंद वाटतो.
चित्रपटाची कथा आणि आजच्या स्त्रीचं जगणं या विषयी काय सांगाल?चित्रपटातल्यासारखा विचार महिला करतात असं तुम्हाला वाटतं का?
आज आपण म्हणतो, की स्त्री स्वतंत्र झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. सगळं खरं आहे. पण सुशिक्षित, कमावत्या बायकांना तरी याचा अर्थ कळला आहे का, त्यांच्या घरातल्या पुरुषांना त्याचा अर्थ कळला आहे का, हा खूप गंभीर प्रश्न आहे. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक स्तरातल्या स्त्रिया काम करताना बघते, घर सांभाळताना बघते, घर उभं करताना बघते, मुलांवर संस्कार करताना बघते, कुटुंबाला पुढे घेऊन जाताना बघते. तेव्हा मला वाटतं, या स्त्रीचं तिच्या घरातलं स्थान काय असेल, समानता तर पुढचा मुद्दा, किमान मूलभूत हक्क मिळत असेल का, तिची मतं मांडण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं स्वातंत्र्य मिळत असेल का, हा सगळा विचार स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत जोडीनं करण्याचा आहे. जोडीनं जगायचं असतं, त्याला सहजीवन म्हणतात. त्यात एकमेकांचं स्वातंत्र्य, निर्बंध हे दोघांनी मिळून ठरवायला हवेत. एकमेकांविषयी विश्वास पाहिजे. असं सहजीवन आपल्याला किती ठिकाणी दिसतं? कधीकधी अशिक्षित लोकांमध्ये दिसू शकेल सहजीवन, पण सुशिक्षितांमध्ये दिसत नाही. शेवटी पैसा ही अशी गोष्ट आहे, की भल्याभल्यांना नात्याविषयी विचार करायला लावते. बरेच प्रश्न पैशापाशी येऊन थांबतात किंवा सुरू होतात. पण आजच्या स्त्रीचं जगणं व्यामिश्र आहे. त्यामुळे एकमेकांविषयीची संवेदनशीलता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या द्वयीविषयी काय वाटतं? त्यांचे चित्रपट, त्यांची काम करण्याची शैली…
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्यातली सकारात्मकता मला फार आवडते. मला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतं. या जोडीविषयी मला खूप आदर वाटतो. ज्या पद्धतीचे चित्रपट त्यांनी बनवले, त्या विषयीचं त्यांचं आकलन, समज, लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संवेदनशीलतेला आवाहन करण्याची तळमळ त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून दिसते. समाजजागृतीसाठी चित्रपट असं काहीही मोठं नाव त्याला न देता खरोखरच प्रत्येक चित्रपटातून प्रत्येकानं त्या विषयी विचार केलाच पाहिजे असे विषय त्यांनी मांडले आहेत. त्या विषयी विचार केला पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे.
उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. एकूण अनुभव कसा होता?
कलाकारांची उत्तम फौज या चित्रपटात एकत्र आलेली आहे. हे सगळेजण मला सहकलाकार म्हणून लाभले, मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो. त्यांच्याकडून मला शिकता आलं. अनेकांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. आमच्या सगळ्यांचं एक कुटुंब असल्यासारखं सेटवर वातावरण होतं. या विषयाबद्दल असलेलं आकलन, समाजाबद्दल असलेली निरीक्षणं घेऊन आल्यामुळे सगळ्याच्या कामाला अप्रतिम जीवंतपणा आला. मोहनकाका, सेवाताई, उत्तराताई, सुमित, सुबोध यांच्याशिवाय या चित्रपटाची मला कल्पनाही करता येत नाही. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती. या चित्रपटामुळे मी माणूस म्हणून प्रगल्भ झाले.
हेदेखील वाचा –
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकचा चांगला प्रताप
‘मिस यू मिस्टर’ सिद्धार्थ चांदेकर
मराठीतला पहिला वेब सिनेमा ‘संतुर्की’ चा ट्रेलर प्रदर्शित