साडी हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय… मग ती सोळा वर्षांची तरूणी असो वा साठीतील आजी… त्यात पैठणीचं नाव घेताच प्रत्येकीच्या ह्रदयाची जणू स्पंदनच वाढू लागतात. कारण पैठणी म्हणजे साड्यांची महाराणी. मग अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची परंपरा जपणारं हे महावस्त्र आपल्याकडे असावं असं कुणाला नाही वाटणार. मोर आणि पोपटाची नक्षीकामअसलेल्या, पारंपरिक काठाच्या, जरतारी बुट्यांच्या रेशमी पैठणी साड्या तुमच्याकडे नक्कीच असतील पण तुमच्या वॉर्डरोबमध्ये एखादी सुती अथवा कॉटन पैठणी आहे का ? नसेल तर यावर्षी सणासुदीसाठी एकतरी कॉटन पैठणी तुमच्याकडे असायलाच हवी. कारण सुती पैठण्या पुन्हा एकदा सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये आहेत.
कॉटन पैठणीची वाढतेय क्रेझ
पैठणी साडीला जवळजवळ दोन हजार वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी तयार करण्यास सुरूवात झाली असं म्हटलं जातं. औरंगाबादमधल्या पैठणमध्ये पैठणी बनवण्याचा शोध लावला गेला म्हणूनच या महावस्त्राला ‘पैठणी’ असं साजेसं नाव दिलं गेलं. पैठणी हे हातमागावर विणलेले तलम, मऊ महावस्त्र आहे. ज्यात विणताना मोर, मुनिया म्हणजे पोपट, कमळ यांची चित्रे जरीकाम करून विणली जातात. प्राचीन काळात जरीकामासाठी सोन्याचा वापर केला जात असला तरी काळानुसार आता त्यात बदल झालेला आहे. शिवाय पूर्वी पैठणी ही कापूस आणि रेशीम या दोन्ही धाग्यांपासून तयार केली जात असे. मात्र पुढे रेशीम विकसित झालं आणि रेशमी पैठण्यांची मागणी वाढत गेली. सहाजिकच त्यामुळे नंतर फक्त रेशमाच्याच पैठण्या बाजारात मिळू लागल्या होत्या. आता तर बाजारात हॅंडलूमपासून मशिनमेड पर्यंत पैठण्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या बजेटनुसार पैठणी विकत घेऊ शकतो. विशेष म्हणजे आता पुन्हा सुती पैठण्यांनाही चांगली बाजारपेठ मिळत आहे. त्यामुळे प्युअर सिल्कप्रमाणेच सध्या प्युअर कॉटन पैठण्यांची क्रेझही वाढताना दिसत आहे. सणसमारंभ म्हटले की पैठणी साडी खरेदी करण्याला पहिला मान दिला जातो. लग्नकार्यांसाठी जरी रेशमी पैठणी पसंत केली जात असली तरी सुती पैठणी तुम्ही घरात सणसमारंभांना नक्कीच वापरू शकता. कारण सणासुदीला घरातील कामं आवरताना तुम्हाला या साड्या नेसून मुळीच थकायला होणार नाही.
सुती पैठणी असते हलकी आणि आरामदायक
पूर्वीच्या काळी राण्या, महाराण्या पैठणीचेच महावस्त्र सतत परिधान करत असत. त्यामुळे आता आपल्या मनात सहज विचार येऊ शकतो की या रेशमी आणि जरीकामामुळे जड झालेल्या भरजरी साड्या, भरीव दागदागिने त्या राण्या दिवसभर कशा वापरत असतील. मग आराम करताना अथवा रात्रीच्या वेळीपण ते अशी जड वस्त्र परिधान करूनच झोपत असतील का? पण मग नंतर सहज मनात आलं अरे तेव्हा सुद्धा त्यांच्यासाठी खास सुती कापडातील महावस्त्र देखील विणली जात असतीलच की… असो असे तर्क वितर्क लावण्यापेक्षा आपण ही सुती पैठणी वापरून नक्कीच पाहायला हवी. कारण ती फारच हलकी आणि आरामदायक असते. नवीन साडी नेसणाऱ्या एखाद्या तरूण मुलीसाठी अथवा वयोमानानुसार थकलेल्या आजीसाठी तर हा एक बेस्ट पर्याय ठरेल. कारण त्यामुळे त्यांना पैठणीसारखे महावस्त्र नेसल्याचा आनंदही यातून मिळू शकेल. शिवाय या साड्या दिसायला हुबेहुब रेशमी पैठणीसारख्याच असतात त्यामुळे त्यामुळे त्या रेशमाच्या आहेत की कॉटनच्या हे पाहणाऱ्याला पटकन समजतही नाही. या साड्यांवर केलेली कलाकुसरदेखील अगदी पारंपरिकच असते. थोडक्यात कॉटन पैठणीमध्येही विविध प्रकार तुम्हाला मिळू शकतात. सध्या सुरू असलेल्या ट्रेंडनुसार या पैठण्यांमध्ये सोनेरी आणि चंदेरी असे दोन्ही काठ उपलब्ध आहेत. चंदेरी काठावर ऑक्सिडाईझ ज्वैलरी घालण्याची सध्या फॅशन इन आहे. शिवाय यंदा कॉटनच्या पैठणीला खूप मागणीदेखील आहे. सुती असल्यामुळे त्यात निरनिराळे रंगही उपलब्ध आहेत. तेव्हा यंदा फेस्टिव्ह सीझनसाठी एक मस्त कॉटन पैठणी घेण्यास काहीच हरकत नाही.
सणाला पैठणी नेसून मस्त तयार झाल्यावर मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट वापरा आणि ग्लॅम दिसा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सणासुदीला ट्राय करा खणापासून तयार केलेले हे हटके आऊटफिट
‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल